ना बॉलर आहेत ना बॅट्समन, विरोधकांमध्ये जे आहेत ते सगळे राखीव खेळाडू
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल
नागपूर : सध्या देशभरात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. अनेक राजकीय नेत्यांनी (Political leaders) प्रचारासाठी सभांचा धडाका लावला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) देखील शिवसेनेच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करत आहेत. आज ते सावनेर (Saoner) येथे महायुतीचे उमेदवार राजू पारवे (Raju Parve) यांच्या प्रचारार्थ गेले होते. या सभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ‘विरोधकांकडे ना झेंडा, ना अजेंडा. ते फक्त कमिशन आणि करप्शनसाठी काम करतात’, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
मुख्यमंत्री म्हणाले, मागील १० वर्षे आपण मोदींची बॅटींग पाहिली. त्यांनी देशाचा विकास केला. आता पुढची पाच वर्षे पंतप्रधान मोदी चौकार, षटकार मारुन विरोधकांना झोडपल्याशिवाय राहणार नाही. मोदींसाठी नेशन फर्स्ट हा अजेंडा आहे. विरोधकांकडे झेंडा नाही आणि अजेंडा नाही. विरोधक कमिशन, करप्शन फर्स्टसाठी काम करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात केलेले काम आणि काँग्रेसने ५० ते ६० वर्षांत केलेले काम जनतेसमोर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म राजनीतीसाठी नाही तर राष्ट्रनीतीसाठी झाला आहे. त्यांनी संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केलंय असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं.
महायुतीला मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत
पुढे ते म्हणाले, परदेशात जाऊन देशाची बदनामी करणाऱ्यांना मतदान करणार की अविरत देशसेवा करणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणार, हा विचार मतदारांनी करायचा आहे. विरोधकांकडे अहंकार आहे. मोदींकडे आत्मविश्वास आहे. अहंकार विनाशाकडे नेतो तर आत्मविश्वास विजयाकडे नेतो. देशात राममंदिर उभे राहिले. सरकारने हिंमत दाखवून ३७० कलम हटवले. देशातील प्रत्येक नागरिकाला प्रगतीकडे नेण्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवला आहे. महायुतीला मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत. रामटेक पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र १९९६ साली हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली आणि तेव्हापासून रामटेकवर भगवा फडकत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुँह मे राम बगल में छुरी
दरम्यान, प्रभू रामाची निशाणी धनुष्यबाण आणि महायुतीची निशाणी धनुष्यबाण आहे. काहीजण राम राम करतात मात्र त्यांची अवस्था म्हणजे मुँह मे राम बगल में छुरी अशी आहे. शिवसेना नेते खासदार कृपाल तुमाने यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल अशीही यावेळी एकनाथ शिंदेंनी ग्वाही दिली.
निवडणुकीत इंडिया आघाडी नावाच्या राक्षसाचा नाश करा
रामटेकमध्ये प्रभू रामचंद्रांनी चार महिने वास्तव्य केले होते. या काळात ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या राक्षसांचा प्रभूंनी नाश केला होता. आताही तशीच वेळ आली आहे. येत्या निवडणुकीत इंडिया आघाडी नावाच्या राक्षसाचा नाश करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांना केले.