उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
मुंबई : सध्या देशभरात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) वारे वाहत आहेत. राज्यात अनेक पक्ष असले तरी देशपातळीवर ही लढाई मुख्यत्वे भाजपा आणि काँग्रेस (BJP Vs Congress) पक्षात आहे. हा लढा जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष कंबर कसून प्रचार करत आहे. राजकीय पक्षांचे मोठमोठे नेते देशाच्या कानाकोपर्यात जाऊन प्रचार करताना दिसत आहेत. त्यातच भाजपाने ‘अब की बार, ४०० पार’चा नारा दिला असताना देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आघाड्या (Alliances) ही काळाची गरज असल्याची बाब अधोरेखित केली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी विद्यमान राजकीय स्थिती आणि भविष्यातील वाटचाल याबाबत विविध प्रकारच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी महाराष्ट्रातील सध्याचं राजकारण आणि भाजपासह महायुतीत जोडले जाणारे पक्ष, यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी ‘आघाड्या ही आता काळाची गरज झाली असून या वास्तवाबरोबर जगणं आपण सगळ्यांनी शिकून घेतलं पाहिजे’, असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
सत्तेचा मार्ग आघाड्यांच्याच मदतीने पार होऊ शकेल
‘भाजपासोबत महायुतीत अनेक पक्ष सामील झाले. सुरुवातीला एकनाथ शिंदे, मग अजित पवार आणि आता राज ठाकरेंनीही भाजपाची वाट धरली आहे. असं असताना अनेक भाजपा नेते त्यांच्या संधी विभागल्या जात असल्याबाबत नाराज आहेत, यावर नेमकी भूमिका काय?’ अशी विचारणा देवेंद्र फडणवीसांना करण्यात आली होती. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिलं.
“कुणालाही महत्त्वाकांक्षा असणं यात गैर काहीही नाही. पण आता सत्तेचा मार्ग आघाड्यांच्याच मदतीने पार होऊ शकेल, या राजकीय वास्तवाबरोबर जगणं आपण सगळ्यांनी शिकून घ्यायला हवं. आघाड्या या निवडणूक राजकारणाची गरज असतात. प्रत्येकाने या सत्याचा स्वीकार करायला हवा. महाराष्ट्रात भाजपाकडे सुरुवातीला १६ टक्के मतांचा हिस्सा होता. तो वाढून २८ टक्के झाला. आता तो ४२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. जर आम्हाला ५० टक्क्यांचा टप्पा ओलांडायचा असेल, तर नवीन मित्र बनवावेच लागतील. त्यासाठी तडजोडी करणं ही काळाची गरज आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्यात भाजपाचा वाटा आकुंचित होत चाललाय का?
दरम्यान, महायुतीत जेवढे मित्रपक्ष येतील, तेवढा भाजपाचा वाटा कमी होत जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत विचारणा केली असता देवेंद्र फडणवीसांनी ही शक्यता फेटाळून लावली. “भाजपाचा वाटा कमी होत असल्याच्या मुद्द्याशी मी असहमत आहे. तुम्ही असं म्हणू शकता की आमची राज्यात वाढ झालेली नाही. आमचा वाटा तेवढाच राहिलाय. अजित पवारांच्या येण्यामुळे फक्त ज्या जागा मूळ शिवसेनेनं लढवल्या असत्या, त्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर वाटल्या गेल्या आहेत इतकंच”, असं ते म्हणाले.