अयोध्या: राम मंदिर बनल्यानंतर अयोध्येत पहिल्यांदा रामनवमी साजरी केली जात आहे. अयोध्या नगरीमध्ये रामनवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशातील कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने भक्तगण तेथे पोहोचत आहेत.
अशातच दर्शनाची सुविधेबाबत खास व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिर फुलांनी सजवण्यात आले आहे. आज सर्वांची नजर तिलक वर आहे. दुपारी १२ वाजून १६ मिनिटांनी सूर्य तिलक असेल जे साधारण चार मिनिटांपर्यंत राहील.
प्रभू श्री रामांचा जन्मोत्सव रामनगरी अयोध्येत मोठ्या धामधुमीत साजरा केला जात आहे. राम जन्मभूमीचा परिसर फुलांनी सुंदर सजवला आहे. सुंदर रोषणाईनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. भक्तांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. चपला-बूट ठेवण्यासोबतच भक्तांना पिण्याचे शुद्ध पाणी आणि मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी खास सोय करण्यात आली आहे.
इतर दिवसांच्या तुलनेत आज मोठ्या संख्येने भक्तगण अयोध्येत येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दुपारी १२ वाजता रामाचा जन्मोत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जाणार आहे. राम जन्मभूमी परिसरात जागोजागी बॅरियर लावून भक्तांना रांगेत दर्शन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन चाकी आणि चार चाकी वाहनांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. दर्शनाची वेळ वाढवून १९ तास करण्यात आली आहे.
श्रीरामांच्या जन्मोत्सावाचे प्रसारण अयोध्या नगरीत साधारण शंभर एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून दाखवले जाणार आहे.