
दीनानाथ नाट्यगृहात २४ एप्रिलला पार पडणार सोहळा
मुंबई : मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति प्रतिष्ठान विश्वस्त संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा मंगळवारी करण्यात आली. मागील ३४ वर्षांपासून या संस्थेच्या वतीने पुरस्कार प्रदान केले जातात. तर गेल्या तीन वर्षांपासून लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानेही मान्यवरांचा गौरव केला जातो. या वर्षी या विशेष पुरस्कारासाठी पद्मविभूषण अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या वर्षी हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी तर दुसऱ्या वर्षी आशा भोसले यांना प्रदान करण्यात आला होता. या पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. त्यासाठी महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा ८२ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित पुरस्कार सोहळा २४ एप्रिल रोजी पार पडणार आहे. मुंबईतील दीनानाथ नाट्यगृह येथे हा सोहळा पार पडणार आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति प्रतिष्ठान ही विश्वस्त संस्था गेली ३४ वर्षे पुणे येथे कार्यरत आहे. ही संस्था मंगेशकर कुटुंबियांनीच स्थापन केली असून त्याचा मुळ उद्देश हा दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा स्मृतिदिन (दि. २४) एप्रिल रोजी प्रतिवर्ष साजरा करणे हा आहे. मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारीता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो व त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
आत्तापर्यंत सुमारे २१२ व्यक्तींना गेल्या ३४ वर्षात हे पुरस्कार प्रदान केले आहेत. तसेच या दिवशी पुरस्कार सोहळ्यानंतर संगीत तथा नाट्य, नृत्य असे कलाक्षेत्रातील विविध कार्यक्रम केले जातात. तसेच २०२२ वर्षापासून भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ एक विशेष म्हणजे ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ प्रदान करण्याचे सर्व विश्वस्तांनी ठरविले आहे. त्यानुसार २४ एप्रिल २०२२ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान केला होता व २४ एप्रिल २०२३ रोजी आशा भोसले यांना हा पुरस्कार दिला होता. हा पुरस्कार दरवर्षी फक्त एकाच अशा व्यक्तीला दिला जातो की ज्याने आपल्या राष्ट्रासाठी, लोकांसाठी आणि समाजासाठी अतुलनीय, नेत्रदीपक आणि अनुकरणीय योगदान दिले आहे.
इतर पुरस्कारांमध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा प्रदीर्घ संगीत सेवा साठी ए आर रेहमान, मोहन वाघ उत्कृष्ट नाट्य निर्मिती साठी पुरस्कार गालिब या नाटकाला, समाजसेवेसाठीचा आनंदमयी पुरस्कार पुरस्कार दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबलला, वाग्विलासीनी प्रदीर्घ साहित्य सेवा पुरस्कार मंजिरी फडके यांना, मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार अशोक सराफ, मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदीर्घ चित्रपट सेवा पुरस्कार पद्मिनी कोल्हापूरे, मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदीर्घ संगीत सेवा पुरस्कार रुपकुमार राठोड, मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदीर्घ पत्रकारिता पुरस्कार भाऊ तोरसेकर, मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार अतुल परचुरे आणि मास्टर दिनानाथ मंगेशकर उत्कृष्ट चित्रपट निर्मिती विशेष पुरस्कार रणदीप हुडा यांना देण्यात येणार आहे.