Saturday, December 14, 2024
Homeताज्या घडामोडीयंदाची निवडणूक देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची : फडणवीस

यंदाची निवडणूक देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची : फडणवीस

खा. रणजितसिंह निंबाळकर, आ. राम सातपुते यांचे उमेदवारी अर्ज दाखल

सोलापूर : यंदाची निवडणूक ही देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. ही निवडणूक विश्वगौरव विकासपुरूष नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी भाजपा उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. विकसित भारताचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी नरेंद्र मोदींच्या पारड्यात मोठ्या संख्येने मतांचे दान टाका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सोलापूर येथे व्यक्त केला. सोलापूर मतदारसंघातील भाजपा – महायुतीचे उमेदवार आ.राम सातपुते व माढा मतदारसंघातील उमेदवार खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेल्या सभेत श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी खा. जयसिद्धेश्वर महास्वामी, आ. सुभाष देशमुख, आ. विजकुमार देशमुख, आ. बबनदादा शिंदे, आ. जयकुमार गोरे, आ.सचिन कल्याणशेट्टी, आ. संजय शिंदे, आ. समाधान आवताडे, आ. यशवंत माने, आ. शहाजीबापू पाटील, माजी आ. प्रशांत परिचारक आदी मंचावर उपस्थित होते.

यावेळी फडणवीस म्हणाले की एनडीए म्हणजे विकासाच्या गाडीचे पॉवरफुल इंजिन असून त्याला आमच्या घटक पक्षांचे डबे जोडले गेले आहेत. या प्रत्येक डब्यात दुर्बल, वंचित, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला, शेतकरी या सर्वांसाठी जागा आहे. मात्र याउलट विरोधकांकडे २६ पक्ष असून प्रत्येक नेताच स्वत:ला इंजिन समजतो त्यामुळेच त्यांच्या इंजिनाला डबेच नसल्याने त्यात सर्वसामान्यांना जागाच नाही, त्या इंजिनात केवळ त्यांचा परिवार बसणार आहे अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली. कमळाचे बटन दाबले की थेट मत उमेदवाराला नव्हे तर मोदींना जाईल असे सांगताना विरोधकांचे मात्र प्रत्येक मत हे राहुल गांधींना जाणार आहे हे अधोरेखित केले.

मागच्या १० वर्षांत देशाची अर्थव्यवस्था मोदी सरकारमुळे जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था बनली आहे. अर्थव्यवस्था मजबूत असेल तरच पायाभूत सुविधा विकास आणि विशेषत्वाने गरीब कल्याणाचा अजेंडा प्रभावीपणे राबवता येतो असे फडणवीस म्हणाले. काँग्रेसच्या काळात पायाभूत सुविधांसाठी केवळ एक लाख कोटी खर्च व्हायचा मात्र मोदी सरकारच्या काळात १३ लाख कोटी खर्च करून सर्वांगीण विकास साधला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. भ्रष्टाचाराला पायबंद घालून गोरगरीबांचा हक्काचा पैसा त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा असेल तर खा. निंबाळकर व आ.सातपुते या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -