तुमची इच्छा होती, मोदीनी ती पूर्ण केली; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चौफेर फटकेबाजी
पूर्णिया : गेल्या १० वर्षात एनडीए सरकारने दमदार कामगिरी केली आहे. आज प्रत्येकजण म्हणत आहे, मोठी कामे करण्याची ताकद केवळ भाजपामध्ये आहे. पूर्वी शेजारचे देश हल्ले करून निघून जायचे. सीमेवर अशांतता होती. लोकांना दुःखासोबतच संतापही व्यक्त करत होते. पण जे पूर्वी अशक्य मानले जात होते की, त्यांच्या घरात घुसून मारायला हवे, असे तुम्हाला वाटत होते. मोदीनी तुमची इच्छा पूर्ण केली. जो देश डोळे वटारत होता, आज कटोरा घेऊन भटकत आहे, अशी चौफेर फटकेबाजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील पूर्णिया येथे एका प्रचार सभेला संबोधित करताना केली.
तुमची इच्छा होती की काश्मीरमधून ३७० हटायला हवे. मात्र, ३७० हटवल्यास काश्मीरात आग भडकेल, रक्ताचे पाट वाहतील, असे अहंकारी आघाडीवाले म्हणत होते. आज कलम ३७० हटले आहे आणि काश्मिरात नाही, तर भारताला तोडू इच्छिणाऱ्यांच्या मनसुब्यांना आग लागली आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.
मोदी म्हणाले, संविधानाच्या नावाखाली जे लोक आम्हाला रात्रंदिवस शिव्या देत आहेत, त्यांच्या हातात स्वातंत्र्यानंतरही आतापर्यंत सत्ता होती. मात्र, बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्याची त्यांची हिंमत नव्हती. तेथे बाबा साहेबांचे संविधान लागू होत नव्हते. हा मोदी आहे, जो संविधानाला समर्पित आहे. आज जम्मू-काश्मीरमध्येही आपले संविधान मोठ्या थाटात लागू झाले. पुढे सीएएला विरोध करणाऱ्यांना इशारा देत मोदी म्हणाले, हा मोदी आहे, ना भितो, ना झुकतो.
मोदी पुढे म्हणाले, ‘देशातील २५ कोटी लोक गरिबीतून तेव्हा बाहेर आले, जेव्हा आम्ही त्यांच्यासाठी रात्रंदिवस काम केले. देशातील ४ कोटी गरीब लोकांना पंतप्रधान आवास तेव्हा मिळाले, जेव्हा तुम्ही मोदींना सेवा करण्याचा आशीर्वाद दिला. भाजपने पुढील ५ वर्षांसाठी आपले संकल्प पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यात मोदीची गॅरंटी आहे. भविष्यातही देशातील सर्व गरजूंना गरीबांना मोफत रेशन मिळेल. गरीब, दलित आणि वंचितांसाठी केलेल्या योजना प्रत्येक गरजूपर्यंत पोहोचवल्या जातील. एवढेच नाही, तर सरकार ३ कोटी नवी पक्की घरेही बांधणार असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.