Saturday, July 13, 2024
Homeनिवडणूक २०२४कोकणच्या विकासासाठी महायुतीला साथ द्या

कोकणच्या विकासासाठी महायुतीला साथ द्या

आपल्या हक्काचा खासदार केंद्रात पाठवण्याचे नारायण राणे यांचे आवाहन

संगमेश्वर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक विकसित राष्ट्र म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर आणि विकसित भारत निर्माण होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि प्रगतशील आणि लोककल्याणकारी भारतासाठी पुन्हा एकदा मोदींना साथ द्या, असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संगमेश्वर येथे केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर येथे आयोजित महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात राणे बोलत होते.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर येथे आयोजित मेळाव्याप्रसंगी व्यासपीठावर भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार बाळ माने यांच्यासह भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नारायण राणे पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी अबकी बार ४०० पारचा नारा दिला आहे आणि म्हणूनच या ४०० पारच्या सरकारमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून आपल्या हक्काचा खासदार केंद्रात गेला पाहिजे. ते पुढे म्हणाले की, इथला खासदार कोण आहे? त्याने दहा वर्षात काय आणले? किती प्रकल्प आणले? किती बेरोजगारांना रोजगार दिला? किती शाळा, कॉलेज, मेडिकल कॉलेज आणली? यासाठी किती प्रयत्न केले? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मराठी माणूस मुंबईतून झालाय हद्दपार

उलट पक्षी मी आणलेल्या सर्वच विकासकामांना खो घालण्याचे काम या खासदार आणि शिवसेनेने केले आहे. मराठी माणूस नाही तर मातोश्री सक्षम केली आहे आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर ही उबाठा शिवसेना मराठी माणसांच्या मुळावर उठली आहे. यांनी मराठी माणसांसाठी काय केले? किती नोकऱ्या आणल्या? आज मराठी माणसे लालबाग, परळ माटुंगा येथून हद्दपार झाली. मराठी माणूस केव्हाच मुंबईतून हद्दपार झाला आहे आणि तो वसई बदलापूर असा मुंबई बाहेर गेला आहे. दहा ते पंधरा टक्केच मराठी माणूस हा लालबाग परळ व या ठिकाणी राहिला आहे. आणि म्हणूनच प्रगतशील आणि आत्मनिर्भर भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा साथ देणे आवश्यक असल्याचे राणे यावेळी म्हणाले.

कोणत्या शिवसैनिकाला औषधासाठी पैसे दिले का?

मराठी माणसाला या शिवसेनेने सक्षम केले नाही. उलट पक्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या काळात ८० कोटी गोरगरीब जनतेला मोफत धान्य दिले आणि पुढील पाच वर्षे मोफत धान्य मिळणार आहे. देशातील चार कोटी गरिबांना मोफत घरे दिली आणि उद्धव मुख्यमंत्री असताना एखाद्या शिवसैनिकाला मोफत घर दिले का? कधी कोणत्या शिवसैनिकाला औषधासाठी पैसे दिले का? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.

मोदींच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे

मराठी माणसांच्या जीवावरती सत्तेवर गेले. हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या शिवसेनेचे उध्दव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार यांच्याशी तडजोड करून मुख्यमंत्री झाले. भविष्यातील विकासासाठी आणि भारत एक महासत्ता बनण्यासाठी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देशाचे नेतृत्व आपल्याला द्यावयाचे आहे. एक प्रगतशील भारत, बलशाली भारत आपल्याला बनवायचा असून लोककल्याणकारी भारत निर्माण करण्यासाठी आपण सगळ्यांनी मोदींच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे, असेही राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -