
मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रांचने मंगळवारी सांगितले की दोन्ही आरोपींना गुजरातच्या भुज जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे विक्की गुप्ता आणि सागर पाल आहे. विक्की आणि सुनीलने रविवारी सलमान खानच्या वांद्रेस्थित अपार्टमेंटच्या बाहेर गोळीबार केला होता.
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्याच्या आधी दोघेही मुंबईच्या जवळील पनवेल परिसरातील सोसायटीमध्ये गेल्या एका महिन्यापासून भाड्याच्या घरात राहत होते. या दोघांनी बॉलिवूड स्टारच्या घराची रेकी केली आणि गोळीबार केला. दोन्ही आरोपींना क्राईम ब्रांचने सोमवारी रात्री भुज येथून अटक केली. आरोपी बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात राहणारे आहेत. त्यांना पुढील कारवाईसाठी भुजवरून मुंबईत आणले जाईल.
सकाळी ५ वाजता केला होता गोळीबार
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान खानच्या वांद्रेस्थित गॅलॅक्सी अपार्टमेंटच्या बाहेर बाईकवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी चार राऊंड गोळीबार केला होता. ही घटना रविवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली होती. गोळीबारानंतर दोनही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. पोलिसांच्या माहितीनुसार गोळीबाराची घटना घडली तेव्हा सलमान खान घरातच होता. दरम्यान, या हल्ल्यात कोणतीही हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला.
बाईक सोडून पळाले होते हल्लेखोर
तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार गोळीबारानंतर हल्लेखोरांनी मोटारसायकल सलमानच्या घरापासून साधारण एक किमी अंतरावर सोडून दिली होती. त्यानंतर हल्लेखोर काही वेळ चालत गेले आणि वांद्रे स्टेशनसाठी त्यांनी एक ऑटोरिक्शा केली. तेथून आरोपी बोरिवलीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढले मात्र सांताक्रुझ स्टेशनवर उतरले आणि तेथून बाहेर पडले. यानंतर ते मुंबईतून फरार होत गुजरातच्या भुज येथे जाऊन लपले.