मुंबई : मापात पाप करणाऱ्या बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीविरोधात वजन नियामक विभागाने कारवाई केली असून या प्रकरणात कंपनीला सुमारे सव्वा लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही घटना इंदूर येथील डी-मार्टमध्ये उघडकीला आली आहे.
नोव्हेंबर २०२३ मध्ये महेंद्र जाट नावाच्या ग्राहकाने कनाडिया येथील डी मार्ट या स्टोअरमधून ८०० ग्रॅमचा पतंजलीचा बिस्कीटाचा पुडा खरेदी केला होता. त्यासाठी १२५ रुपयेही मोजले होते. मात्र, शंका आल्याने जाट यांनी संबंधित पुड्याचं वजन केल असता ते कमी असल्याचे दिसून आले. यामुळे कनाडिया यांनी ग्राहक न्यायालयात तक्रार केली.
ग्राहक समिती न्यायालयाने हे प्रकरण वजन नियामक विभागाकडे वर्ग केलं. तपासणीअंती ८०० ग्रॅम असं छापील वजन असणाऱ्या पुड्याचं वजन प्रत्यक्षात ७४६.७० ग्रॅम इतकंच भरलं. पुड्याचं वजन तब्बल ५३ ग्रॅमने कमी भरलं होतं, त्याची किंमत ७ रुपये इतकी होती. त्यानंतर विभागाने पतंजली आणि डी-मार्टला नोटीस बजावली. त्यानंतर पतंजली आणि डी-मार्टने वजन कमी असल्याचं मान्य केलं. त्यामुळे विभागाने पतंजली कंपनीवर एक लाख २० हजार रुपयांचा तर डीमार्टवर २० हजार रुपयांचा दंड ठोठावला.