Wednesday, July 9, 2025

उष्माघाताचा पालघर जिल्ह्यात पहिला बळी, विद्यार्थीनीचा मृत्यू

उष्माघाताचा पालघर जिल्ह्यात पहिला बळी, विद्यार्थीनीचा मृत्यू

पालघर : महाराष्ट्र राज्य उकाड्याने हैराण झालेले असतानाच उष्माघाताने पालघर जिल्ह्यात पहिला बळी घेतला. विक्रमगड तालुक्यातील केव (वेडगेपाडा) येथे राहणारी अश्विनी विनोद रावते (१६) या अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा उष्माघाताने सोमवारी दुपारी बळी घेतला.


विक्रमगड येथे राहणारी अश्विनी रावते मनोर येथील एस. पी. मराठे ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावीत शिकत होती. सोमवार १५ एप्रिलला दुपारी परीक्षा देऊन घरी आली होती. अश्विनी घरी परतली तेव्हा आई कपडे धुण्यासाठी नदीवर गेली होती. तर वडिल मनोर येथील बाजारात गेले होते. त्यामुळे घरात कुणीच नसल्याने ती आई-वडिलांना शोधण्यासाठी शेतावर गेली होती. शेतावर जात असतानाच उन्हाच्या तडाख्याने भोवळ येऊन ती शेतातच पडली होती. प्रचंड ऊन असल्याने पाड्यावरच कुणीच आजूबाजूच्या शेतावर नसल्याने अश्विनी तब्बल दोन तास बेशुध्दावस्थेतच पडून होती.


इकडे, घरी आलेल्या आईने अश्विनीची बॅग बघितली. पण, अश्विनी घरात दिसत नसल्याने आई तिला शोधत शेतावर पोचली. तेव्हा अश्विनीला बेशुध्दावस्थेत पडलेली पाहून आईला धक्का बसला. गावकऱ्यांच्या मदतीने अश्विनीला उपचारासाठी मनोर येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. उष्माघाताने अश्विनीचा बळी घेतल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


दरम्यान, राज्यभर उन्हाचा तडाखा वाढला असून विक्रमगड तालुक्यात तापमान ३९ अंश सेल्सिअपर्यंत पोचले आहे. पालघर जिल्ह्याचे तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हात बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा