Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Raj Thackeray : 'शाळांना सुट्टी जाहीर करा!' राज ठाकरेंचं सरकारला पत्र

Raj Thackeray : 'शाळांना सुट्टी जाहीर करा!' राज ठाकरेंचं सरकारला पत्र

आचारसंहितेच्या काळात तातडीने निर्णय घेण्याची का केली विनंती?


मुंबई : उन्हाळ्याचे दिवस (Summer) म्हटले की शाळांना सुट्ट्या (Vacation) सुरु होतात. राज्यात काही शाळांच्या परीक्षा आटोपून सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. मात्र, काही शाळा अद्याप सुरु आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे यंदा वेळेआधीच वातावरणात प्रचंड उकाडा भासत आहे. एप्रिल महिन्यातच उन्हाच्या इतक्या झळा बसत आहेत की मे महिन्यात आणखी तापमान वाढण्याची शक्यता आहे. शाळेत जाणार्‍या मुलांनाही याचा त्रास सहन करावा लागतो आहे. तसंच आरोग्याच्या समस्याही (Health problemes) जाणवत आहेत. त्यामुळे सुट्टी सुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शाळांना लवकर सुट्टी जाहीर करण्याची विनंती करणारं पत्र राज्य सरकारला लिहिलं आहे.


राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे की,
सस्नेह जय महाराष्ट्र,
गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण ह्या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास ४० अंशांपर्यंत गेलं आहे. अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाहीये. उष्णतेची लाट आली आहे असं जाहीर झालं आहे. मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही?, हा मुद्दा आहे. असो.



शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करा


अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु व्हायला अजून काही काळ असल्यामुळे त्यांना शाळेत जावं लागत आहे. ह्याबाबतीत, जरी आचारसंहिता असली, तरी सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी. तसंच उन्हाळ्याचा दीर्घकाळ शिल्लक आहे, त्यामुळे हवामानात काय बदल होऊ शकतील ह्याचे अचूक अंदाज आले तर एकूणच लोकांना त्यांच्या कामांचं नियोजन करता येईल.



मनसैनिकांना विनंती


माझी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना पण विनंती आहे की, तुम्ही पण उष्णतेच्या लाटेत स्वतःची काळजी घ्या. तसंच ह्या भीषण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त हाल होतात प्राण्यांचे आणि पक्षांचे (राजकीय नव्हेत) आणि निराधार आणि बेघर लोकांचे. त्यांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल ह्याची तजवीज करा. प्राणी आणि पक्षी तर बिचारे पाणी मागू शकत नाहीत, त्यामुळे, त्यांना सहज पाणी मिळेल आणि सहज पिता येईल अशा पद्धतीने गॅलरीत, गच्चीत पाणी ठेवा.


आपला नम्र,
राज ठाकरे.





राज ठाकरेंनी ही विनंती पत्र लिहून केली आहे. आता या मागणीचा सरकार विचार करणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


Comments
Add Comment