ज्या देशाची न्याय प्रक्रिया तसेच सुरक्षा व्यवस्था चोख आणि दक्ष असते, त्या देशात लोकशाही खऱ्या अर्थाने टिकून राहते असे म्हटले जाते. आपली घटना ही एक सर्वंकष घटना आहे असे मानले जाते. या घटनेमध्ये समाजातल्या प्रत्येक घटकातल्या, वर्गातल्या नागरिकाचे आयुष्य सुखकर राहावे यासाठी नागरिकांची सर्व हक्क आणि कर्तव्य लिहिलेली आहेत. या घटनेतील कायद्याप्रमाणे राज्य चालत असेल, तर प्रत्येक नागरिकाचे जीवन सुकर आणि सुरळीत चालू शकते; परंतु नागरिकांना सर्व कायद्यांचे सखोल ज्ञान नसते आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळेच या कायद्याचे ज्ञान असलेल्या कायदे तज्ज्ञांची आज खूप गरज भासते आहे. आज कायदेतज्ज्ञ तसेच वकिलांची खूप कमतरता दिसून येते. त्यात २१व्या शतकाच्या सुरुवातीला मुंबईच्या मध्यवर्ती भागात ५ वर्षे कायद्याचे शिक्षण देणारी महाविद्यालये खूपच कमी होती हे लक्षात घेऊन २०१० साली दादरमध्ये विधी महाविद्यालय सुरू करावे असे पीपल्स एज्युकेशन सोसायटी संस्थेने ठरवले आणि २०१२ साली बारावीनंतर ५ वर्षे विधी अभ्यासक्रम चालवणारे महाविद्यालय सुरू करण्यात आले. ते लक्षात घेऊन दादरसारख्या मध्यवर्ती भागात कार्यकर्ते चालवत असलेल्या ९० वर्षे जुन्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीतील कार्यकर्त्यांना असे वाटले की आपण कायदेविषयक महाविद्यालय का स्थापन करू नये? विचार पक्का झाल्यानंतर २०१२ साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आवारामध्येच विधी महाविद्यालयाचे बांधकाम सुरू झाले. त्या दरम्यानच्या काळातच दुर्दैवाने ज्यांच्या विचाराने प्रेरित होऊन या महाविद्यालयाची स्थापना कार्यकर्ते करत होते, त्या अॅड. बाळासाहेब आपटे यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे साहजिकच या महाविद्यालयाला अॅड. बाळासाहेब आपटे यांचे नाव देण्याचे सर्वानुमते ठरले आणि अॅड. बाळासाहेब आपटे लॉ कॉलेजची स्थापना झाली. बाळासाहेब आपटे अतिशय प्रसिद्ध वकील तसेच कायदे तज्ज्ञ होते. तसेच ॲडिशनल अॅड. जनरल राहिले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले होते. तसेच ते माजी खासदार होते. बाळासाहेब आपटे सुद्धा दादर-माहीम भागातच राहत असत. त्यामुळे महाविद्यालयाला बाळासाहेब आपटे यांचे नाव देणे यथोचितच होते.
ॲड. बाळासाहेब आपटे लॉ कॉलेज हे सुरुवातीपासूनच मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे. तसेच बार कौन्सिल ऑफ इंडियाची कॉलेजला अनुमतीही मिळाली आहे. या कॉलेजमध्ये तीन वर्षांचा एलएल. बी. डिग्री तसेच बारावीनंतर पाच वर्षांची एलएल. बी. डिग्री असे दोन्ही पदवी अभ्यासक्रम चालवले जातात.
मुंबईतल्या दादर पश्चिमेकडेच्या मध्यवर्ती भागात कॉलेजची अद्ययावत आणि आधुनिक इमारत उभी आहे. कॉलेज सुरू होऊन बारा वर्षे झाली असली तरीही कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्षापासूनच विद्यापीठात विविध पारितोषिके पटकावली आहेत.
कायदेविषयक शिक्षण म्हणजे खूपच कोरड किंवा क्लिष्ट समजले जाते; परंतु हे शिक्षण घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होणेही गरजेच आहे ते लक्षात घेऊन अभ्यासा व्यतिरिक्त त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त वेगवेगळे उपक्रम राबवले जातात.
हे सर्व वैविध्यपूर्ण उपक्रम आणि शिक्षणाचा दर्जा पाहून गेल्या वर्षी महाविद्यालयाला बी ++ ॲक्रीडिशनही मिळाले आहे. महाविद्यालयात शिकवणारे सर्वच शिक्षक कायद्याचे सखोल ज्ञान असणारे आहेतच, शिवाय कायद्याच्या विविध शाखेतील नामवंत वकील, न्यायाधीश या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वारंवार येत असतात.
कॉलेजतर्फे दरवर्षी राष्ट्रीय स्तरावरची मॉक ट्रायल, मॉक कोर्ट तसेच लेखन स्पर्धा आयोजित केली जाते. देशभरातल्या विविध कायदे महाविद्यालयातील विद्यार्थी या स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. दरवर्षी या स्पर्धांसाठी वेगवेगळे विषय घेतले जातात. गेल्यावर्षी मंजूर झालेल्या तीन नव्या क्रिमिनल विधेयकांवर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे नव्या कायद्यासंदर्भात विद्यार्थ्यांच्या मनात जागृती निर्माण झाली तसेच त्याचा अभ्यास झाला होता.
या कॉलेजचे वैशिष्ट्य म्हणजे कायदेविषयक महाविद्यालय असून सुद्धा विद्यार्थ्यांसाठी साहित्य, भाषा, नाटक, क्रीडाविषयक समित्या स्थापन केल्या असून मराठी वाङ्मय मंडळ देखील चालवले जाते.
या समित्यांतर्फे वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि विद्यार्थ्यांना समाजात घडणाऱ्या सांस्कृतिक, सामाजिक घडामोडींसाठी अपडेट केले जाते. इतकेच नाही तर कोरोना काळानंतर उद्भवलेल्या परिस्थितीतील समस्या लक्षात घेऊन मानसिक आरोग्याबाबत कौन्सिलिंग केले गेले होते. तसेच भविष्यातील वकिलांमध्ये सामाजिक जाण रुजावी यासाठी देखील कॉलेजमध्ये गट स्थापन करण्यात आला आहे. याच्या माध्यमातून आपटे महाविद्यालयातील विद्यार्थी रक्तदान शिबीर, समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, गरीब विद्यार्थ्यांना शिकवण, वृक्षारोपण असे सामाजिक उपक्रम राबवतात. सामाजिक जाण रुजावी यासाठी कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना (NSS)च्या गटाची स्थापना करण्यात आली आहे. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी मोठ्या उत्साहात वार्षिक उत्सव साजरा केला जातो. यात विद्यार्थी एकांकिका, नृत्य, गाणी असे मनोरंजनाचे कार्यक्रम बसवतात. त्याशिवाय वेगवेगळ्या स्पर्धांत पारितोषिक पटकावणाऱ्या मुलांचा पारितोषिक वितरण समारंभ होतो. या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू असे प्रमुख पाहुणे म्हणून येत असतात.
आपटे महाविद्यालयात दरवर्षी साधारण ८५० विद्यार्थी कायद्याचे शिक्षण घेत आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांना कॅम्पसमधून शिक्षण पूर्ण झाल्याबरोबरच नोकरी व्यवसायही मिळतो.
गेली बारा वर्षे एलएल.बी. या पदवीचे शिक्षण देत असताना एल एल एम या पदव्युत्तर पदवीसाठी महाविद्यालयाने आवेदन केले आहे. आज कायद्यामध्ये विविध शाखा तयार झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना एखाद्या ठरावीक शाखेच्या कायद्याचे संपूर्ण प्रशिक्षण मिळावे यासाठी छोटे छोटे प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याचाही महाविद्यालयाचा विचार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची थियरी आणि प्रॅक्टिकलमधील दरी भरून काढायला मदत होऊ शकेल. रेरा, सायबर गुन्हे, मेडिएशन, फोरेन्सिक सायन्स हे नव्याने आलेले कायदे नीट समजण्यासाठी या छोट्या पाठ्यक्रमांचा उपयोग विद्यार्थ्यांना होऊ शकतो हे लक्षात घेऊन अशा प्रकारचे छोटे पाठ्यक्रम सुरू करण्याचा कॉलेजचा विचार आहे. रेरा सारखे कायदे नव्याने अस्तित्वात आले. त्या केसेस हातात आल्या तर त्यासाठी केवळ वकील नाही, तर त्यांना आर्किटेक्ट, बिल्डर, वकील अशा सगळ्यांचे एकत्रिकरण करून जर काही सत्र घेता आली तर तसा घ्यायचा विचार आहे. कायदा क्षेत्राशी निगडित रिसर्च सेंटर सुरू करण्याचाही आपटे महाविद्यालयाचा विचार आहे.
संस्थेने ज्यांना आधारस्तंभ मानले आहे असे अॅड. बाळासाहेब आपटे यांचे एक ध्येय होते ते म्हणजे राष्ट्र निर्माणसाठी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून न्यायदानाच्या क्षेत्रात काम करणारे युवक घडवणे. स्वर्गीय अॅड. बाळासाहेब आपटे यांच्या या विचारांना धरूनच आपटे विधी महाविद्यालयाचे काम सुरू आहे.
joshishibani@yahoo. com
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…
मुंबई : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन मोबाईल घेऊ पाहत असाल तर, ओप्पोने भारतीय बाजारात नवा…