- गुंतवणुकीचे साम्राज्य : डॉ. सर्वेश सुहास सोमण
शेअर बाजार हा भावनाप्रधान असतो. कोणत्याही महत्त्वाच्या घटनांवर लगेच आपली प्रतिक्रिया देतो. शेअर बाजाराचा गेल्या दशकाचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल, मागील दहा वर्षांत अनेक छोट्या आणि मोठ्या घटनांवर शेअर बाजाराने तेजी किंवा मंदी यापैकी कोणती ना कोणती प्रतिक्रिया नक्कीच दिलेली आहे. शेअर बाजाराच्या निर्देशांकात गेल्या १० वर्षांत लक्षणीय वाढ झालेली आहे. मागील महिन्यात तर भारतीय शेअर बाजाराने उच्चांक नोंदविलाच पण त्याचसोबत जगातील शेअर बाजाराच्या मूल्यात आपला भारतीय शेअर बाजार हा हाँगकाँगच्या बाजाराला मागे टाकत जगात मार्केट कॅपिटल बाबतीत चौथ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. आता पुन्हा एकदा शेअर बाजारासाठी सर्वात मोठा ट्रिगर आहे, तो म्हणजे येऊ घातलेली लोकसभा निवडणूक. गेल्या सलग दोन टर्ममध्ये एकहाती सत्ता आल्यानंतर आता पुन्हा एकदा मोदी सरकार येणार का? याकडे देशाचेच नाही तर शेअर बाजाराचे देखील लक्ष लागून राहिलेले आहे.
सध्या निर्देशांक निफ्टी आणि सेन्सेक्स हे उच्चांकाला आहेत. यावेळी पुन्हा एकदा जर बहुमताने आत्ताचेच सरकार आले तर निर्देशांकात आणखी मोठी होऊ शकते किंवा सत्ता बदल झाला पण त्रिशंकू स्थिती न होता स्थिर आणि बहुमताने सरकार आले, तरी देखील निर्देशांकात पुढील पाच वर्षात आणखी मोठी वाढ होऊ शकते. सत्ता कोणाची येते त्यापेक्षा कोणत्याही देशाला विकासासाठी स्थिर सरकार आवश्यक असते. त्रिशंकू स्थिती असेल किंवा स्पष्ट बहुमत नसेल तर अशा स्थितीत तयार होणारे सरकार हे कसे काम करेल? आपली पूर्ण ५ वर्षांची टर्म पूर्ण करेल का असे अनेक प्रश्न असतात. शेअर बाजार हा जसा आपल्या भारतीय गुंतवणूकदारांवर अवलंबून असतो तसा तो विदेशी गुंतवणूकदार आणि विदेशी संस्थागत निवेशक यांवर देखील अवलंबून असतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी बहुमताने स्थिर सरकार येणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक हा शेअर बाजारासाठी सर्वात मोठा ट्रिगर आहे. आता टेक्निकल बाबतीत बघायचे झाल्यास निर्देशांक हे उच्चांकात आहेत. त्यामुळे जरी स्थिर सरकार आले आणि निकालानंतर तेजी आलीच, तरी लगेच मध्यम मुदतीसाठी फार मोठी तेजी येणार नाही. निर्देशांकांच्या चार्टनुसार मोठी तेजी येण्यापूर्वी तेजी पूर्वीची मंदी अर्थात करेक्शन येणे अपेक्षित आहे.
निवडणुकांच्या निकालात स्पष्ट बहुमत आले नाही, तर मात्र लगेचच फार मोठी घसरण भारतीय शेअर बाजारात आपणास पाहावयास मिळू शकते. मूलभूत विश्लेषणानुसार आत्ता निर्देशांक निफ्टीचे पीई अर्थात किंमत उत्पादन गुणोत्तर हे २२.३८ आहे. पीई गुणोत्तर विचारात घेतल्यास निर्देशांक आत्ता थोडे महाग आहेत. त्यामुळे निवडणुकीनंतर गुंतवणूक करीत असताना एकदम गुंतवणूक न करता टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करता येईल. शेअर बाजारात गुंतवणूक करीत असताना आपण आपला गुंतवणुकीचा कालावधी ठरविणे अत्यंत आवश्यक आहे. इतिहासाचा विचार करता शेअर बाजारात इक्विटी मार्केटमध्ये लाँग टर्म गुंतवणूक ही नेहमी चांगला परतावा देत आलेली आहे. लाँग टर्म गुंतवणूक करीत असताना संयम अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे घाईघाईने शेअर्स खरेदीचे धोरण न ठेवता शांतपणे नियोजन करून त्यानंतरच गुंतवणूक करावी.
(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही.)