नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय निवडणूक आयोगाने दिली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून आतापर्यंत अधिकाऱ्यांनी ४ हजार ६५० कोटी रुपये जप्त केले आहेत. यापूर्वी, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या एकूण जप्त रकमेपेक्षा ही अधिक रक्कम आहे, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे. ‘सार्वत्रिक निवडणुका २०२४ दरम्यान जप्त केलेली रक्कम ही देशातील लोकसभा निवडणुकीच्या ७५ वर्षांच्या इतिहासात नोंदवलेली सर्वाधिक रक्कम होण्याच्या मार्गावर आहे,’ असे निवडणूक आयोगाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
२०१९ मधील संपूर्ण लोकसभा निवडणुकीदरम्यान ३ हजार ४७५ कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. मात्र २०२४ मधील निवडणुकीच्या मतदानाआधीच जप्त केलेली रक्कम याहून अधिक आहे.
Rs 100 crore have been seized each day since 1st March, says Election Commission of India
Rs 4,650 crores seized even before polling begins, higher than total seizures in 2019 polls: ECI pic.twitter.com/KjcJjvw8WS
— ANI (@ANI) April 15, 2024
सर्वसमावेशक नियोजन, सहकार्य आणि एजन्सींकडून एकत्रित प्रतिबंधात्मक कारवाई, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि तंत्रज्ञानामुळे ही कारवाई शक्य झाली असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
१२ एप्रिल रोजी, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांच्या आयोगाने १९ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात तैनात केलेल्या सर्व केंद्रीय निरीक्षकांचा आढावा घेतला. यावेळी प्रलोभनमुक्त निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक यंत्रणा मजबूत करणे, देखरेख करणे आणि तपासणी यावर भर देण्यात आला.