संजय राऊतांनी पीएम फंडाच्या चौकशीच्या केलेल्या मागणीवर आमदार नितेश राणे यांची सणसणाटी टीका
मुंबई : ‘संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सकाळच्या पत्रकार परिषदेत पीएम फंडाची चौकशी व्हावी, अशी मुक्ताफळे उधळली. ज्या पीएम फंडमुळे कोरोनामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची मदत झाली, समाजातल्या लोकांना ज्याचा मोठा आधार आहे, त्या पीएम फंडवर बोट उचलण्याअगोदर उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पीएम फंडाची देखील चौकशी व्हावी’, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी संजय राऊतांवर घणाघाती टीका केली.
नितेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंचा पीएम फंड म्हणजे पाटणकर मातोश्री फंड. त्याचं मुख्य कार्यालय हे कलानगरमध्ये असलेल्या वैभव चेम्बर्सच्या चौथ्या माळ्यावर आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळात या पाटणकर मातोश्री फंडमध्ये किती पैसा आला, कुठून आला, नंदकिशोर चतुर्वेदींकडून किती पैसा आला, त्याचीही चौकशी व्हायला हवी. संजय राऊतने स्वतःच्या एक्स अकाऊंटवर ‘चंदा दो और धंदा करो’ असं लिहिलं आहे. मग तुझ्या मालकाने कुठून चंदा गोळा केला? कुठला काळा धंदा चालू होता? असा खडा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.
पुढे नितेश राणे म्हणाले, वैभव चेम्बर्सच्या चौथ्या माळ्यावर कुठल्या वहिनी आपल्या भावाबरोबर बसतात आणि कोणत्या मोठमोठ्या डिलींग्ज तिथे होतात? या फंडातला पैसा उद्धव ठाकरेंच्या कर्जतच्या फार्महाऊसमध्ये कुठे कुठे ठेवला आहे? किती जमिनीच्या खाली खोदून ठेवला आहे? या सगळ्या गोष्टींची चौकशी व्हायला हवी. लोकांकडून जमवलेल्या चंदावर तुझ्या मालकाची मातोश्री चालते. त्यामुळे आमच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याअगोदर आधी स्वतःच्या मालकाच्या पीएम फंडाची चौकशी करा, असं नितेश राणे म्हणाले.
संजय राऊतने आरोप स्वतः आरशात बघून मातोश्रीवर केले आहेत?
निवडणूक रोख्यांबाबत संजय राऊतांनी भाजपवर केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, संजय राऊतने हे आरोप नेमके भाजपावर केले आहेत की स्वतः आरशात बघून मातोश्रीवर केले आहेत? कारण मातोश्रीवर येणारा चंदा जो पाटणकर मातोश्री फंडच्या माध्यमातून तिथे पोहोचतो, त्यात किती दारुच्या कंपन्या, रिअल इस्टेट कंपन्या आहेत, यांचीही चौकशी झाली पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले.
संजय राऊतला सगळेच दबावाखाली वाटतात
धर्मादाय आयुक्त राजीनामा द्यायच्या मनस्थितीत आहेत, त्यांच्यावर दबाव आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. त्यावर नितेश राणे म्हणाले, धर्मादाय आयुक्त असो, विधीमंडळाचे अध्यक्ष असो किंवा आमचं न्यायमंडळ असो, याला सगळेच दबावाखाली वाटतात. जसं काय त्यांच्या घरात चहा पाजायला, भांडी धुवायला पहिला हाच जातो. कोणीही दबावाखाली नाही, त्याची चिंता संजय राऊतने करु नये.