Tuesday, July 23, 2024
Homeनिवडणूक २०२४Narayan Rane : महायुतीचा उमेदवार अडीच लाखांच्या मताधिक्क्याने जिंकणार

Narayan Rane : महायुतीचा उमेदवार अडीच लाखांच्या मताधिक्क्याने जिंकणार

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा आत्मविश्वास

उबाठा सेनेच्या उमेदवाराचे डिपॉझिट करणार जप्त

चिपळूण : सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याचा विकास करण्याचा आपला मानस आहे. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग खात्यामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांना रोजगाराची संधी मिळवून देण्याचे काम झाले आहे. इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, यासाठी उद्योग आले पाहिजेत. चिपळूणमध्ये विमानतळ होण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न राहतील. तरी भाजपच्या महायुती उमेदवाराला अडीच लाखांहून अधिक मताधिक्य मिळाले पाहिजे, यामध्ये चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचा जास्तीत जास्त वाटा असेल, अशी अपेक्षा केंद्रीय सूक्ष्म लघु, उद्योग, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पेढांबे येथील महायुतीच्या मेळाव्याप्रसंगी व्यक्त केली.

यावेळी माजी आमदार मधुकर चव्हाण, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप नेते माजी खासदार निलेश राणेयांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व मुख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी नारायण राणे म्हणाले की, जनतेच्या आशीर्वादामुळे आपल्याला नगरसेवक ते केंद्रीय मंत्री पदापर्यंत काम करण्याची संधी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशाला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. देशाला विकासाच्या दिशेने नेण्याचे मोठे काम केले आहे. भारत अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हॅट्ट्रिक करण्यासाठी तुम्ही सर्वांनी साथ द्या. यामध्ये रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचा खासदार अडीच लाखांच्या मताधिक्याने विजयी झाला पाहिजे. यामध्ये चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे मोठे योगदान असेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

खासदार राऊत यांच्यावर टीका करताना नारायण राणे म्हणाले की, या भागातील विद्यमान खासदाराने आपला ५७ % खासदार निधी खर्च केलेला नाही. तर १० टक्के कमिशन ठेकेदारांकडून मागत असल्याचा आरोप यावेळी केला. या खासदाराकडून विकासात्मक काम शून्य झाले आहे, अशी टीका राऊत यांच्यावर राणे यांनी केली. तर दुसरीकडे मोदींसारख्या नेतृत्वाला ‘अब की बार भाजप तडीपार’ अशी भाषा उद्धव ठाकरे करीत आहेत. मात्र, तुमची कुवत काय? तुमचे सध्या ५ खासदार उरले आहेत. या निवडणुकीत तो आकडा शून्यावर येईल, असा टोला उद्धव ठाकरे यांना हाणला.

या मेळाव्याचे सूत्रसंचालन भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस रामदास राणे यांनी केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. या मेळाव्याला महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

रत्नागिरीचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी सर्वांची साथ हवी

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आज २ लाख लाख ४० हजार दरडोई उत्पन्न आहे. तर रत्नागिरी जिल्ह्याचं थोडं कमी आहे. मात्र, ते वाढविण्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याचा विकास करण्याचा आपला मानस आहे. परंतु यासाठी तुम्हा सर्वांची साथ आवश्यक आहे, अशी अपेक्षा नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केली.

मोदींचे हात बळकट करुया

नारायण राणेपुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या योजनांमुळे शेवटच्या घटकांपर्यंत लाभ झाला आहे, असे सांगताना या योजनांचा आढावा घेतला. तसेच लघु, सूक्ष्म, मध्यम उद्योग या खात्यामार्फत अनेकांना रोजगार मिळू शकतो. कोकणातील तरुणांनी नोकरीपेक्षा व्यवसायाकडे वळले पाहिजे असे आवाहन केले. २०४७ पर्यंत स्वतंत्र भारत देशाला १०० वर्षे पूर्ण होतील, तेव्हा जगात विकसित देश म्हणून भारताची ओळख असेल. भारताला जागतिक अर्थसत्ता बनवण्यासाठी आपण मोदींचे हात बळकट करूया, असे शेवटी नारायण राणे यांनी आवाहन केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -