भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांचे महायुतीच्या मेळाव्यात आवाहन
चिपळूण : सध्याच्या खासदाराने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कोणतेही काम केले नाही. या निष्क्रिय खासदाराला पुन्हा निवडून देऊ नका. तर मोदींच्या ४०० पारच्या खासदारांच्या यादीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील आपला हक्काचा महायुतीचा खासदार देशाच्या संसदेत पाठवूया, असे आवाहन माजी खासदार व भाजप नेते निलेश राणे यांनी पेढांबे येथील महायुतीच्या मेळाव्यात करताना ‘जनतेचे पाणी पळवणारा खासदार’ अशा शब्दांत खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली.
यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, माजी आमदार मधुकर चव्हाण, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, राष्ट्रवादी काँग्रेस चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, युवक तालुका अध्यक्ष निलेश कदम, भाजपा प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष चित्रा चव्हाण, भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, शहर मंडल अध्यक्ष श्रीराम शिंदे, खेड शहराध्यक्ष अनिकेत कानडे, माजी नगरसेवक परिमल भोसले, विजय चितळे, आशिष खातू, खेर्डीचे माजी उपसरपंच विनोद भुरण, स्नेहा मेस्त्री, मनसे माजी चिपळूण तालुकाध्यक्ष राजेंद्र राजेशिर्के, भाजपा कामगार मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विनोद कदम, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले की, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील जनतेने सन २००९ च्या निवडणुकीत भरघोस मताने निवडून दिले अवघ्या २८ व्या वर्षी देशाच्या संसदेच्या माध्यमातून आपली सेवा करण्याची संधी मिळाली. सत्तेत असताना देखील जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलने केली. असुर्डे येथे रेल्वे स्टेशन व्हावे, यासाठी सुमारे तीन तास राजधानी एक्सप्रेस रोखून धरली. चिपळूणमधील हातपाटी वाळू व्यवसायिकांच्या प्रश्नासाठी उपोषण आंदोलने केली. यामुळे चिपळूण मधील जनता आपल्यावर टोकाचे प्रेम करते. आपण सहसा कोणावर टीका करत नाही. मात्र, अंगावर आल्यावर देखील सोडत नाही. चिपळूण तालुक्याने आपल्याला खरी ओळख करून दिली, असे निलेश राणे यांनी यावेळी नमूद केले.
खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका करताना हा खासदार महापुरात देखील फिरला नाही. नदीतील गाळ काढण्यासाठी कोणतेही योगदान नाही. तर उलट नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर यांनी गाळ काढण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. कोयना अवजलाचा प्रश्न सोडवू शकला नाही. गेल्या दहा वर्षात या लोकसभा मतदारसंघाला विकासात्मक दृष्टीने मागे नेण्याचे काम केले. नेहमीच नकारात्मक भूमिका ठेवली. इथे कोणतेही उद्योग आणले नाहीत. तर उलट येणाऱ्या उद्योगांना नेहमीच विरोध केला. इथल्या तरुणांच्या हाताला काम दिले नाही. कोकण रेल्वेचे डबल ट्रॅक नाही. महिला बचत गटांना आर्थिकदृष्टीने सक्षम करण्यासाठी कोणतेही प्रयत्न नाहीत, मग हा खासदार पुन्हा कशासाठी पाहिजे, असा सवाल निलेश राणे यांनी सवाल उपस्थित करीत आपल्या हक्काच्या महायुतीच्या खासदाराला निवडून देण्याचे आवाहन शेवटी निलेश राणे यांनी यावेळी केले.
या खासदाराला आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी कोणतंही देणंघेणं नाही, अशा या निष्क्रिय खासदाराला पुन्हा निवडून देऊ नका. लांजा येथील जलजीवन मिशन योजनेतील गैरकारभाराची माहिती देताना या खासदाराने जनतेचे पाणी पळवले आहे, या शब्दात राऊत यांच्यावर टीका केली.
या मेळाव्याप्रसंगी माजी आमदार मधुकर चव्हाण, भाजपा चिपळूण तालुका अध्यक्ष वसंत ताम्हणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, प्रमोद अधटराव आदींनी मनोगते व्यक्त केली. या मेळाव्याचे सूत्रसंचालन भाजपा उतरत्नागिरी जिल्हा सरचिटणीस रामदास राणे यांनी केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. या मेळाव्याला महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.