Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीMahesh Manjarekar : 'एकतर रणदीप हुडा किंवा मी!' महेश मांजरेकरांवर का आली...

Mahesh Manjarekar : ‘एकतर रणदीप हुडा किंवा मी!’ महेश मांजरेकरांवर का आली सावरकर चित्रपट सोडण्याची वेळ?

मुंबई : भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांच्या जीवनावर आधारलेला ‘वीर सावरकर’ हा चित्रपट यावर्षी २२ मार्चला प्रदर्शित झाला. यातील सावरकरांची भूमिका साकारणारा अभिनेता रणदीप हुडाचं (Randeep Hooda) प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक होत आहे. या चित्रपटाचं संवाद लेखन व दिग्दर्शन देखील रणदीपनेच केलं आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वी जेव्हा या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) हा चित्रपट दिग्दर्शित करणार असल्याचे सांगण्यात आले होते. मग अचानक त्यांचं नाव चित्रपटातून गायब कसं झालं? यावर माध्यमांनी अनेक तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली. यावर आता चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर महेश मांजरेकरांनी स्वतः भाष्य केलं आहे. ‘त्यावेळी इतकी नकारात्मक परिस्थिती निर्माण झाली की एकतर रणदीप हुडा किंवा मी असं निर्मात्याला सांगावं लागलं’, असं महेश मांजरेकर म्हणाले आहेत.

या सिनेमाचं शेड्युल लांबलं, त्यानंतर हा सिनेमा घर, मालमत्ता गहाण ठेवून करावा लागला हे अभिनेता रणदीप हुडाने मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. शिवाय सावरकरांच्या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली असल्याचं देखील त्याने सांगितलं आहे. मात्र महेश मांजरेकरांनी हा सिनेमा का सोडला त्याचं कारण सांगणं हे रणदीप हुडाने टाळलं आहे. त्यावेळी झालेल्या वादांबाबत विचारलं असता जे झालं ते झालं आता सिनेमाही बनला आहे, त्यामुळे जुन्या गोष्टींबाबत बोलायचं नसल्याची प्रतिक्रिया रणदीपने अनेक मुलाखतींमधून दिली होती. यावर महेश मांजरेकरांनी खुलासा केला आहे.

महेश मांजरेकर म्हणाले, “मी ‘वीर सावरकर’ हा चित्रपट सोडला वगैरे वगैरे चर्चा माझ्याबद्दल खूप झाली. सिनेमा प्रदर्शित झाला आहे, आता मी त्यावर बोलतो. वीर सावरकरांचे विचार वगैरे पटत नाहीत अशी टीका झाली. मी काहीच बोललो नाही कारण लोकांना तेच हवं होतं. त्यामुळे मी ही सगळी चर्चा होऊ दिली. ‘वीर सावरकर’ यांच्याबद्दल मला प्रचंड आकर्षण आहे. खरं सांगायचं तर ज्यांनी सिनेमा केला आहे, त्यांना काही घेणंदेणंही नव्हतं. कायम वाटायचं की वीर सावरकरांवर चित्रपट करायचा. संदीप सिंग निर्माता होता तो आला, सिनेमा करायचं ठरलं. रणदीप हुड्डाला घ्यायचं ठरलं. त्याला (रणदीप हुड्डाला) सावरकर काळे की गोरे माहीत नाहीत. मात्र त्याचं श्रेय हे आहे की त्याने सगळा इतिहास वाचून काढला. आधी त्याला वाटलं होतं की वीर सावरकर व्हिलन आहेत. मी त्याला सांगितलं की तू सगळं वाच. चित्रपटातलं ७० टक्के स्क्रिप्ट माझं आहे. पहिल्या वाचनाला त्याने सांगितलं हे हवं आहे, ते हवं आहे. रणदीप हुड्डा हस्तक्षेप करु लागला. स्क्रिप्ट लॉक होईना, शूट थांबलं होतं. बजेट वाढू लागलं होतं. मला तर वाटलं की मी मरेन. कारण चित्रपट वाईट झाला तर लोक मला नावं ठेवतील. वीर सावरकरांवर सिनेमा करायचा आहे तर तो उत्तमच झाला पाहिजे या मताचा मी होतो.”

इतकी नकारात्मक परिस्थिती निर्माण झाली की…

पुढे महेश मांजरेकर म्हणाले, “त्यावेळी जी परिस्थिती निर्माण झाली ती इतकी नकारात्मक होती की मी शेवटी निर्मात्याला सांगितलं की एक तर रणदीप हुड्डाला सिनेमा करु दे किंवा मी तो सिनेमा करतो. तो रोज एखादी नवीन कल्पना घेऊन यायचा. त्याला त्या सिनेमात भगत सिंग, हिटलर सगळी पात्रं हवी होती. मी रणदीपला म्हटलं की तू वीर सावरकरांवर सिनेमा करतो आहेस. त्यामुळे वीर सावरकरांवर फोकस ठेवायला हवा. नंतर नंतर तो लेखनाच्या व दिग्दर्शनाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करायला लागला. अमुक सीन असा करायचा आहे, वगैरे तो सांगू लागला. एक दिवस त्याने माझ्या हातात स्क्रिप्ट ठेवलं आणि म्हणाला की ही सव्वा दोन तासांची स्क्रिप्ट आहे. मी म्हटलं माझ्याकडे साडेचार तासांची स्क्रिप्ट आहे. तो सिनेमासाठी ऑब्सेस्ड झाला होता. रणदीपला भेटायला जावं तर तो वीर सावरकरांच्या वेशात बसलेला असायचा, मी त्याच्यातल्या अभिनेत्याशी संवाद कधी साधायचा? मग मला वाटू लागलं की तो (रणदीप हुड्डा) जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी करत होता. मग निर्मात्याला सांगितलं की तू त्याला निवड किंवा मला निवड कारण मला हवाय तसा चित्रपट याच्याबरोबर (रणदीप हुड्डा) होऊ शकत नाही.”

रणदीप हुड्डाला लोकमान्य टिळकांचं वाक्यही सिनेमात हवं होतं

यानंतर महेश मांजरेकर म्हणाले, “मला त्याच्याबरोबर सिनेमा करता येणार नाही हे मी निर्मात्याला सांगितलं. रणदीप हुड्डा पुन्हा माझ्याशी बोलायला आला. मी त्यानंतर त्याला सांगितलं की तू ‘गांधी’ सिनेमा पाहा त्यात त्यांनी नथुराम गोडसेही फक्त शेवटच्या सीनमध्ये दाखवला आहे. एकदा त्याचा मला फोन आला मला म्हणाला, लोकमान्य टिळकांचं स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे वाक्यही मला त्यात हवं आहे. मी त्याला शेवटी म्हणालो की आपण वीर सावरकरांवर चित्रपट करतो आहे हे विसरु नकोस”.

जर रणदीप हुड्डा त्यात नसता तर मी उत्तम सिनेमा केला असता

मी हा चित्रपट पाहिलेला नाही. पण त्यात काळ्या पाण्याच्या शिक्षेचे सीन त्याने खूप जास्त केले आहेत असं ऐकलं. त्याने मला जेव्हा हे सांगितलं होतं तेव्हा मी त्याला म्हटलं दोन सीन दाखवले तरीही वीर सावरकरांना काय भोगावं लागलं ते कळतं. त्याला चित्रपटात १८५७ चे लोक हवे होते, ‘इन्किलाब जिंदाबाद’ वगैरे म्हणताना. मी रणदीपला हे म्हटलं की हे शक्य नाही. त्याने ते त्याच्या स्क्रिप्टमध्ये लिहिलं होतं. वीर सावरकरांच्या चित्रपटाला जस्टिफाय केलं नाही तर चित्रपट का बनवायचा?. मी उत्तम सिनेमा केला असता जर रणदीप हुड्डा त्यात नसता तर असं महेश मांजरेकर म्हणाले. “रणदीप हुड्डाने वीर सावरकरांबद्दल वाचलं नाही का? तर तसं मुळीच नाही त्याने माझ्या तीनपट सावरकर वाचले आहेत. प्रॉब्लेम हा झाला की त्याने सगळंच वाचलं. मी वीर सावरकर चित्रपट का सोडेन? मला करायचा होता सिनेमा. पण या सगळ्या परिस्थितीमुळे मी तो केला नाही.” असं उत्तर महेश मांजरेकर यांनी दिलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -