
आज घोषणा होण्याची शक्यता
सातारा : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सातारा मतदारसंघातील (Satara Loksabha) उमेदवारीचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. भाजपने या ठिकाणी आपला उमेदवार ठरवला आहे. आजच सातार्याच्या जागेवर भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांच्या (Udayanraje Bhosale) नावाची घोषणा होऊ शकते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) पत्रकार परिषदेतच ही घोषणा केली जाईल, अशी शक्यता आहे. तर दुसरीकडे साताऱ्याची जागा आम्हाला मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी केली आहे.
महायुतीत साताऱ्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा अजूनही कायम आहे. एकीकडे, ही जागा भाजपकडे जाईल आणि उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे, मात्र दुसरीकडे, राष्ट्रवादीचा दावा कायम आहे. तर आजच सातारच्या जागेवर भाजपकडून उदयन राजेंच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
उदयनराजेंचा प्रचार सुरुच
सातारा लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा कायम असताना उदयनराजेंनी नाव जाहीर होण्याची वाट न बघता प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला आहे. त्यांनी काल महाबळेश्वर, पाचगणीचा दौरा केल्यानंतर मतदारसंघात भेटीगाठींचा सिलसिला सुरुच ठेवला आहे.
आज सातारा जाहीर करून नाशिकचे नंतर बघू
नाशिक लोकसभा मतदारसंघ देणार असाल तर साताऱ्याची जागा भाजपला सोडू अशी भूमिका अजित पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. नाशिकच्या जागेचा तिढा अजूनही न सुटल्याने सातारा जागा देखील जाहीर झाली नव्हती. मात्र आज सातारा जाहीर करून नाशिकचे नंतर बघू, असा विचार करून उदयन राजे यांचे नाव जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.