विशेष – भालचंद्र ठोंबरे
त्रेतायुगात एक राक्षस होता दंबोधव. त्याने सूर्यदेवतेची कठोर उपासना केली. सूर्यदेव प्रसन्न झाले. दंबोधवाने त्यांना अमरत्वाचे वरदान मागितले. मात्र सूर्यदेवतेने त्याऐवजी दुसरा वर मागण्यास सांगितले. दंबोधवाने सहस्र सुरक्षा कवचाची मागणी केली. तसेच “जो एक हजार वर्षे तप करेल तोच त्यातील एक सुरक्षाकवच छेदू शकेल मात्र ते छेदताच त्याला मृत्यू यावा असा वर मागितला. दंबोधव याद्वारे इतरांना त्रास देणार हे दिसत असूनही त्याच्या तपस्येमुळे सूर्यदेवाला हे वरदान द्यावे लागले. या कवचामुळे तो ‘‘सहस्त्रकवच’’ म्हणूनही ओळखला जावू लागला व आपण अमर झाल्याच्या भावनेने अनन्वित अत्याचार करू लागला.
दक्ष प्रजापतीच्या रूची (काही ठिकाणी मूर्ती असाही उल्लेख आहे) नामक मुलीचा विवाह ब्रह्मदेवाचा मानसपूत्र धर्माशी झाला. तिने विष्णूची आराधना केली व दंबोधवाच्या नाशासाठी येण्यास विनंती केली. भगवान विष्णूंनी तिच्या पोटी जुळ्या मुलांच्या रूपात जन्म घेतला. तेच नर व नारायण. त्याचे शरीर वेगळे असले तरी दोन्हीमध्ये प्राण एकच होता. जन्मापासूनच त्यांना जप-तपाची आवड असल्याने ते तपासाठी निघून गेले.
एके दिवशी दंबोधवाला एक तेज:पूंज पुरुष आपल्याकडे येत असलेला दिसला. त्याने नर म्हणून आपली ओळख देऊन दंबोधवाला युद्धाचे आव्हान केले. दंबोधवाने त्याला वास्तविकतेची कल्पना देऊन १००० वर्षं तप करणाराच आपल्या समोर थोडाफार टिकू शकतो असे सांगितले. तेव्हा माझा भाऊ व मी एकच असून तो तिकडे तप व मी इकडे युद्ध करणार असल्याचे सांगितले. दोघात युद्धाला सुरुवात झाली. इकडे जसजसे नारायणाचे तपाचे वर्ष वाढत जात तसतशी नराची ताकत वाढू लागली व नारायणाची १००० वर्षं पूर्ण होताच नराने दंबोधवाचे एक सुरक्षाचक्र तोडले. मात्र ते तुटताच नर मरण पावला. तोच नारायणाने येऊन संजीवनी मंत्राने नराला जिवंत केले व नर तपश्चर्येला गेला आणि नारायण लढू लागला. नराचे तपाचे १००० वर्षं होताच नारायणाने दुसरे सुरक्षा कवच तोडले. मात्र तो मरण पावला. तेव्हा नराने येऊन नारायणाला जिवंत केले. नारायण तपश्चयेला गेला व नर लढू लागला. ही क्रिया ९९९ चक्रतुटेपर्यंत झाल्यावर दंबोधवाला मरणाची भीती वाटू लागली. तेव्हा तो सूर्यदेवाकडे आश्रयाला गेला. नर व नारायणानी सूर्याला दंबोधवाला परत करण्याची विनंती केली. सूर्याने परत न केल्याने नारायणानी दंबोधवाच्या कर्माची फळे तुलाही भोगावी लागतील, असा सूर्याला शाप दिला.
त्रेतायुग संपल्यानंतर द्वापारयुग सुरू झाले. कुंतीला तिला मिळालेल्या वरदानाच्या साहाय्याने सूर्यापासून पुत्र झाला. हाच कर्ण. त्याला जन्मजातच कवच कुंडले होती. सूर्यपूत्र असल्याने पराक्रमी, तर नारायणाच्या शापामुळे दंबोधवाचे आसुरी असे दोन्ही गुण कर्णात होते. नर व नारायणापैकी नर अर्जुनाच्या रूपात तर नारायण स्वत: कृष्ण भगवान झाले. अर्जुनाने कर्णाची कवच कुंडले छेदली असती, तर तो मरण पावला असता म्हणूनच इंद्राने ती दानाच्या रूपात मागून नेली.