Saturday, July 13, 2024
Homeसाप्ताहिककोलाजदेदीप्यमान क्वेत्झल

देदीप्यमान क्वेत्झल

निसर्गवेद – डॉ. महालक्ष्मी वानखेडकर

मी कायमच सांगत असते की, सर्व सजीव सृष्टीतील घटकांची निर्मिती ही निसर्ग नियमानुसार झाली आहे. प्रत्येक कीटक, पक्षी हा नैसर्गिक रंग रूपांशी समरूप होणारा आहे. ह्या देदीप्यमान क्वेत्झल पक्ष्याचा रंग गर्द हिरवा, निळा, सोनेरी असल्यामुळे तो जंगलात अगदी सामावून जातो. कोणालाही त्रास न देणारा शांत, लाजाळू असा हा पक्षी. नैसर्गिक संतुलनासाठी त्याचा मोठा वाटा. अतिशय आकर्षक, सुंदर, चमकदार रंगाचा, अप्रतिम सौंदर्यवान असा हा “देदीप्यमान क्वेत्झल”.

देदीप्यमान क्वेत्झल हा मूळ मध्य अमेरिका आणि दक्षिण मेक्सिकोच्या गर्द जंगलात राहणारा. यांच्या पाच प्रजाती आहेत. व्हाईट टिप्ड्, द क्रिस्टेड, गोल्डन हेडेड, पावोनीन आणि देदीप्यमान क्वेत्झल. या पक्ष्याचा कौटुंबिक संबंध ट्रोगोन पक्ष्याशी आहे. याच्या डोक्यावर हिरवट सोनेरी गोलाकार पंखांचा मुकुट घातलाय की काय असंच वाटतं. छातीचा भाग पूर्ण हिरवट सोनेरी असतो तर पाठीवरील पिसं निळी, हिरवी, सोनेरी रंग ज्याचा आतील रंग काळाभोर आहे अशी शालच ओढली आहे असे वाटते. पोट पूर्णपणे लाल, रेशमी चमकदार पंखांचे असते तर लांब शेपूट हिरवी, निळी आकर्षक चमचमती असते. परमेश्वराने या पक्ष्यावर लाल, हिरव्या, निळ्या, काळ्या, चमचमत्या सोनेरी रंगांची जणू काही उधळणच केली आहे असे वाटते. तरुण विकसित पक्ष्याची लांबी जवळजवळ १६ इंच असते. यामधील उपजातीतील काही पक्षांच्या शेपूट लांब असतात. या देदीप्यमान क्वेझलच्या शेपटाची लांबी बऱ्याचदा ३५ इंच सुद्धा लांब असते.

दमट आणि उंच प्रदेशात हे आढळतात. त्यांची चोच सक्षम नसल्यामुळे ज्या झाडाचे खोड ठिसूळ असते त्या झाडावर हे सुतार पक्ष्यासारखे चोचीने खोदून त्यांचे घरटे बनवतात. जेव्हा प्रजनन काळ येतो तेव्हा नर त्याची हिरव्यागार पंखाची शृंखला उघडतो आणि आकाशात उडून पंख हवेत लहेरवून मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. जास्तीत जास्त हे पक्षी दोन अंडी देतात आणि नर मादी दोघे मिळून पिल्लांची काळजी घेतात. आश्चर्य म्हणजे नर एवढ्या लांब शेपटीचा असून सुद्धा स्वतःला त्या घरट्यात बरोबर समाविष्ट करतो आणि पिल्लांची काळजी घेतो.

रिस्प्लेडेंट नावाचा क्वेत्झल हा जंगलात खरंतर फळ खातो. पण हा फळांच्या बिया गिळतो आणि परत काढून जंगलात टाकून देतो. त्यामुळे परत जंगलात अनेक झाडे वाढतात. एका माळ्यासारखे वृक्ष लागवडीचे काम हा अतिशय चोखपणे करतो. अशाप्रकारे निसर्गाचे संवर्धन करणारे अनेक पशु-पक्षी, कीटक आहेत ज्यांना आपले कर्म कळले आहे. फक्त शारीरिक दृष्ट्या परिपूर्ण असणाऱ्या मानवालाच हे कळले नाही. फल फलाहारा शिवाय यांच्या आहारात किडे, छोटे बेडूक, जंगली पाली, माशा, कीटक असेही आहे. यांची आयुमर्यादा तीन ते दहा वर्षांपर्यंत असते.

सोनेरी डोक्याचा क्वेत्झल हा हैती देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे तर देदीप्यमान क्वेत्झल ग्वाटेमालाचा राष्ट्रीय पक्षी आहे. या देशाच्या झेंड्यावर आणि शस्त्रांवर याचे चित्रण आहे. या पक्ष्याचे आध्यात्मिक महत्त्व खूप आहे. मेसो अमेरिकेमध्ये “पंख असणारा साप” असेही या पक्ष्याला म्हणतात. कारण त्याची हिरवीगार लांब शेपूट आणि त्याला असणारे तुरे जेव्हा तो हवेमध्ये लयीत हलवतो तेव्हा ती शेपूट एखाद्या सापासारखी वाटते. एक अशी आख्यायिका आहे की, पृथ्वी निर्मितीमध्ये या पक्ष्याने मदत केली असल्यामुळे त्या काळातील राजे महाराजे यांच्या पंखांना परमेश्वराचा आशीर्वाद समजून ते पंख त्यांच्या मुकुटात वापरत असत. एका आख्यायिकेनुसार माया संस्कृतीचा राजकुमार टेकून उमान स्पेनच्या विरुद्ध लढत असताना तो धारातीर्थी पडला. जेव्हा त्याचा मृत्यू जवळ आला तेव्हा हाच पक्षी येऊन त्याच्या रक्तबंबाळ छातीवर बसला आणि म्हणून या पक्ष्याची छाती आणि पोट पूर्णपणे लाल पंखांचे झाले. मेसो अमेरिकन या पक्ष्यांना मारणे हा गुन्हा समजत असल्यामुळे ते त्यांना मारत नसत पण त्यांचे शेपटीचे पंख घेऊन त्यांना परत उडवून देत असत. त्यांच्यासाठी ते खूप मूल्यवान आणि पवित्र आहेत. यांचे हिरवे, सोनेरी चमकदार पंख यांना अमूल्य समजत असल्यामुळे माया संस्कृतीत या पंखांना संपत्तीचे प्रतीक समजून यांचा उपयोग मुद्रांवर केला जाऊ लागला. ग्वाटेमालामध्ये आजही मुद्रांना क्वेत्झल असेच म्हणतात.

या घनदाट जंगलांमध्ये विविध जीवांच्या संख्या आपल्याला माहीतच नाही. वैज्ञानिकांनी त्यांच्या निदर्शनास आलेल्या संख्येप्रमाणे काही जाती आणि प्रजाती निश्चित केल्या आहेत. साधारणपणे सारखे दिसणारे सारख्या गुणधर्माचे पक्षी यावरून फक्त जाती आणि उपजाती ठरल्या आहेत. या देदीप्यमान क्वेत्झलला इंटरनॅशनल युनियन फॉर कंजर्वेशन ऑफ नेचर यांनी नुकतेच संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत समाविष्ट केलेले आहे. याचे कारण नेहमीप्रमाणेच आहे. जंगलतोड, शिकार, त्यांचा व्यापार, जंगलतोडीमुळे त्यांना न मिळणारा आहार. यामुळे या पक्ष्यांची संख्या कमी होत चालली आहे. ग्लोबल वार्मिंगच्या अंतर्गत या विश्वाच्या निर्मितीतच आता अनेक बदल होत जाणार आहेत. सजीव सृष्टीतील प्रत्येक घटकांत नामशेषांचा आकडा वाढला जाणार आहे. आत्ताच अनेक घटक नामशेष झाले आहेत. जे आपल्याला माहीतही नाहीत. कालांतराने पूर्ण विश्वाचे काय होईल माहिती नाही किंबहुना ती वेळ आपणच आपली जवळ आणली आहे. यावर सर्वांनी विचार करावा आणि त्या दृष्टीने निसर्गाचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करावा कारण निसर्गाचे संवर्धन तेच आपले संवर्धन एवढे कायमच लक्षात ठेवावे.

dr.mahalaxmiwankhedkar@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -