
मुंबई गुन्हे शाखेचा दाट संशय; काय आहे प्रकरण?
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रेस्थित गॅलॅक्सी अपार्टमेंटच्या (Galaxy apartment) बाहेर गोळीबार (Firing) करण्यात आला. हा हवेतील गोळीबार सकाळी साधारण ४.५० मिनिटांच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी केला. दोन्ही हल्लेखोर बाईकवरून आले होते आणि चार राऊंड फायरिंग केल्यानंतर ते तेथून पळून गेले. दरम्यान, या हल्ल्यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सलमानच्या खानच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणात बिश्नोई समाजाचा हा असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराच्या तपासासाठी पोलीस आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. यापूर्वी सलमानच्या वडीलांना चिठ्ठीद्वारे धमकी देण्यात आली होती, त्यानंतर धमकीचा ई-मेलही आला होता. आता रविवारी १४ एप्रिल रोजी झालेल्या गोळीबाराचा संबंधही बिश्नोई गँगशी असल्याचं बोललं जात आहे.
सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारामागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. याचं कारण म्हणजे बिश्नोई गँग (Lawrence Bishnoi) सलमानला धमकी देत आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचे गांभीर्य पाहून महाराष्ट्र एटीएसनेही याप्रकणी तपास सुरु केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
१९९८ साली हम साथ साथ हैं चित्रपटाच्या शूटींगदरम्यान सलमान खान राजस्थानमध्ये होता. सलमान खानने दोन वेळा चिंकारा हरणांची शिकार केल्याचा आरोप आहे. लॉरेन्स बिश्नोई ज्या बिश्नोई समाजातून येतो, हा समाज निसर्ग पूजक असून त्या समाजात हरणांना देवासमान मानलं जातं. हरणांची शिकार केल्याचा आरोप असल्यामुळे अवघ्या बिश्नोई समाजाचा सलमान खानवर प्रचंड राग आहे. याच रागातून लॉरेन्स बिश्नोई वारंवार सलमान खानला धमक्या देत असल्याचं सांगितलं जातं.