कावळ्याने खाल्ली खीर

कथा - रमेश तांबे


एकदा एक कावळा झाडावर बसला होता. तिरक्या मानेने इकडे तिकडे बघत होता. काय करावे बरे? काय खावे बरे? याच विचारात होता. मग तेथून तो उडाला. जंगल पार करीत एका गावात पोहोचला. गावाच्या चौकात भरपूर घरे होती. घरांमध्ये माणसेदेखील भरपूर होती. कावळ्याला वाटले येथे आपल्याला काही तरी खायला मिळेल म्हणून तो काव काव करू लागला. पण कोणीच त्याच्याकडे पाहिले नाही. थोड्या वेळाने एक आजी घराबाहेर आली. तसा घरातून खिरीचा मधुर सुगंध बाहेर पसरला. खिरीचा वास येताच कावळ्याच्या तोंडाला पाणी सुटले. त्याला वाटले आजी आपल्याला खीर खायला देईल. पण आजीने घराच्या ओट्यावर कावळ्यासाठी दहीभात ठेवला. ते बघताच कावळा आजीला म्हणाला, “आजी-आजी आज मला खीर हवी. तुझाच घरात बनवलीय भारी!” आजी म्हणाली, “नाही रे बाबा खीर माझ्या नातवंडांसाठी, कालचा दहीभात तुझ्यासाठी.” ते ऐकून कावळा म्हणाला,


आजी आजी खीर दे
गोड खाऊ मला दे
खीर खाईन चटाचटा
उडून जाईन पटापटा!


पण आजी तशीच घरात गेली. थोड्या वेळाने काका बाहेर आले. आकाशाकडे बघत पाया पडले. अन् कावळ्यासाठी त्यांनी चपाती ठेवली. ते बघून कावळा म्हणाला, “काका काका मला खीर हवी. तुमच्याच घरात बनवलीय भारी!” काका म्हणाले, नाही रे बाबा! खीर माझ्या पोरांसाठी. कालची चपाती तुझ्यासाठी. ते ऐकून कावळा म्हणाला,


काका, काका खीर द्या
गोड खाऊ मला द्या
खीर खाईंन चटाचटा
उडून जाईन पटापटा!


पण काका तसेच घरात गेले. थोड्या वेळाने काकू बाहेर आली. तिने ओट्यावर दूध ठेवले. ते पाहून कावळा म्हणाला, काकू मला खीर हवी. तुझ्याच घरात बनवलीय भारी! काकू म्हणाली, नाही रे बाबा खीर माझ्या पोरींसाठी!
शिळे दूध तुझ्यासाठी. ते ऐकून
कावळा म्हणाला,


काकू काकू खीर द्या
गोड खाऊ मला द्या
खीर खाईन चटाचटा
उडून जाईन पटापटा!


पण काकू तशीच घरात गेली. मग थोड्या वेळाने एक मुलगी बाहेर आली. तिच्या हातात खारीची वाटी होती. तिला बघताच कावळा म्हणाला,


सोनू सोनू इकडे ये
खारीची वाटी मला दे
खीर खाईन चटाचटा
उडून जाईन पटापटा!


मग सोनूने दोनदा खिरीकडे अन् कावळ्याकडे पाहिले. अन् मोठ्या आनंदाने कावळ्याला खीर दिली. कावळ्याने ती चटाचटा खाल्ली. अन् सोनूला म्हणाला, “सोनू तू माझी इच्छा पूर्ण केलीस. बोल तुला काय हवे.”


सोनू म्हणाली, “कावळेदादा, कावळेदादा रोज दुपारी येशील का? माझ्या सोबत खेळशील का?” कावळा म्हणाला, “हो गं सोनू नक्की येईन. मी तर येईनच पण सोबत चिऊताईलाही घेऊन येईन.” चिऊताईचं नाव काढताच सोनू हसत हसत टाळ्या पिटत घरात गेली. अन् आपल्याला एक चांगली मैत्रीण भेटली या आनंदात कावळादेखील रानात गेला.

Comments
Add Comment

चमक

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ दिवाळीमध्ये घरी भेटायला आलेल्या एका जवळच्या कुटुंबीयांनी अतिशय सुंदर रंगीत

परिवर्तन

कथा : रमेश तांबे “अरे विनू फटाके फोडताना जरा जपून” आईने घरातूनच आवाज दिला. पण उत्साही विनूपर्यंत तो आवाज पोहोचलाच

परिश्रमाशिवाय कीर्ती नाही

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर मनुष्याला जीवनात यश, मान-सन्मान आणि कीर्ती हवी असते. पण ही कीर्ती केवळ

हवेचे रेणू

कथा : प्रा. देवबा पाटील सीता व नीता ह्या दोन्ही बहिणींना वाचनाची अतिशय आवड होती. त्यांचे आई-बाबा दरमहा

मनाची श्रीमंती!

कथा : रमेश तांबे दिवाळी नुकतीच संपली होती. दिवाळीचे चार-पाच दिवस कसे संपले हे नमिताला कळलेच नव्हते. दिवाळी येणार

पारदर्शक पदार्थ

कथा : प्रा. देवबा पाटील सीता व निता या दोघी बहिणींना जशी अभ्यासाची गोडी होती तशीच वाचनाचीसुद्धा आवड होती. त्या सतत