
नातं नात्याच्या जागेवर, राजकारण राजकारणाच्या जागेवर : सुनेत्रा पवार
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar) असा संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. बारामती (Baramati Loksabha) या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आता नणंद विरुद्ध भावजय असा सामना पाहायला मिळतो आहे. शरद पवार गटातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) तर अजित पवार गटाकडून अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) बारामतीची निवडणूक लढवत आहेत. दोघीही एकमेकांना तगडी टक्कर देत असतानाच शरद पवार यांच्या एका वक्तव्यामुळे दोन्ही गटांत वाद पेटला आहे.
'मूळचे पवार आणि बाहेरुन आलेले पवार यांत फरक आहे' असं वक्तव्य शरद पवारांनी केल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील सुनांचा अपमान केल्याचं राष्ट्रवादीचे अनिल पाटील (Anil Patil) म्हणाले. दरम्यान, या प्रकरणावर आता सुनेत्रा पवार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलताना त्या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावरुन सुनेत्रा पवार चांगल्याच नाराज झाल्या आहेत. त्यांचं वक्तव्य ऐकून सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर झाले. आज सुनेत्रा पवार पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी सुनेत्रा पवारांशी माध्यमांशी संवाद साधला. पवारांनीच मला सून म्हणून निवडलं असल्याचं सुनेत्रा पवार म्हणाल्या. त्यानंतर बाकी प्रश्न विचारताच हात जोडून निघून गेल्या.
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, घरातील सगळी मोठी माणसंच सुनेची निवड करतात. तशी माझी निवड शरद पवारांनीच केली होती. बारामतीत अटीतटीची लढत वगैरे काही नाही. नातं नात्याच्या जागेवर आहे, राजकारण राजकारणाच्या जागेवर आहे. ही विचारांची लढाई आहे नात्याची नाही. बारामती तालुक्यातील सगळ्याच भागात फिरले. सगळ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे. लोकांकडून मोठ्या प्रमाणात माझं स्वागत होत आहे. त्यामुळे मला सकारात्मक वाटत आहे. मला उमेदवारी मिळाली, ही बारामतीकरांची इच्छा होती. जनता हेच माझं कुटुंब आहे. जनता माझ्या पाठीशी उभी असल्याचं त्या म्हणाल्या.
काय म्हणाले होते अजित पवार?
बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत अजित पवारांनी बारामतीकरांना आवाहन केलं होतं. ते म्हणाले होते की, बारामतीकरांनी आतापर्यंत पवारांनाच मतदान केलं होतं. यावेळीही तेच करायचं आहे. आतापर्यंत वडिलांना म्हणजे पवारसाहेबांना, मुलाला म्हणजे मला, मुलीला म्हणजे सुप्रिया सुळेंना मतदान केलं. आता सुनेला मतदान करायचं आहे. यावर 'मूळचे पवार आणि बाहेरुन आलेले पवार यांत फरक आहे' असा टोला शरद पवारांनी लगावला आणि हाच मुद्दा घेऊन अजित पवार गटाने डाव साधला आहे.