Share

आज अनेक स्त्रिया त्यांच्यातील सुप्त गुण, कौशल्य या माध्यमातून आपल्या आवडीच्या क्षेत्रात कामगिरी करत आहेत. तसेच उद्योगधंद्यातूनही स्त्रिया स्वावलंबी होऊ पाहत आहेत. त्यात त्यांच्या कुटुंबीयांनीही साथ दिली, तर सोन्याहून पिवळे. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ ही म्हणं प्रसिद्ध आहे. त्यामुळे क्रियाशील राहणे, स्वत:ला उद्योगी ठेवणे, कुटुंबाचा आर्थिक भार काही प्रमाणात का असेना पेलवण्याची जबाबदारी पार पाडणे हे महत्त्वपूर्ण आहे.

ओंजळ – पल्लवी अष्टेकर

आपली चिकाटी, जिद्द व संयम यांच्या सहाय्याने व्यक्ती असाध्य गोष्टीही साध्य करू शकतात. कित्येक वेळा समाजात आपण अशा स्त्रिया पाहतो की, त्यांच्यातील सुप्त गुण, कौशल्य या माध्यमातून त्या आपल्या आवडीच्या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करू शकतात. अनेकदा विविध क्लासेसमधून शिकूनही जे ज्ञान आपण मिळवू शकत नाही, ते ज्ञान स्वकर्तृत्वावर प्राप्त करून, त्याचा उपयोग त्या स्वतःचा आत्मविश्वास वाढविणे, घराला आर्थिक हातभार लावणे या गोष्टींमधून करीत आहेत. अशाच एका आत्मविश्वासपूर्ण, स्वभावाने प्रेमळ अशा स्त्रीची माझी अलीकडेच ओळख झाली. एकदा माझ्या मावशीने माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त केक पाठविला होता. त्या केकची चव इतकी अप्रतिम होती की, मी केक बनविणाऱ्या श्वेता यांच्याशी मनसोक्त बोलायचे ठरविले. श्वेता यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातूनही यास होकार दिला व त्यांनी मला माझ्या घरी येण्याचे आश्वासन दिले. मी त्यांना सांगितलेल्या ब्ल्यू बेरी केक व विविध प्रकारचे कप केक्स या खाद्य पदार्थांसहित त्या घरी आल्या.

“तुमच्या खाद्य करिअरला सुरुवात कशी झाली?” यावर श्वेता म्हणाल्या, “साधारण सव्वा वर्षांपूर्वी मी आवड म्हणून केक बनविण्यास सुरुवात केली. बेकिंगचे कोणतेही शिक्षण मी घेतले नाही. सुरुवातीला ‘यू ट्युबवर’ बघून मी रव्याचा केक बनविण्याचा प्रयत्न केला. पहिल्या प्रयत्नात तो काही जमला नाही; परंतु सराव करण्याची जिद्द मी सोडली नाही, त्यानंतर मात्र मला केक बनवायला जमू लागले.” त्यानंतर श्वेता यांनी आयसिंगचे केक बनवायला सुरुवात केली व घरच्यांना, शेजारी, मैत्रिणी व नातलगांना टेस्ट करायला दिले. त्यांनाही केक्स आवडू लागले व श्वेतांना त्यांच्याकडून ऑर्डर्स मिळू लागल्या. अशा प्रकारे त्यांची केक बनविण्याची सुरुवात झाली. त्यानंतर श्वेता विविध प्रकारच्या नानकटाई बनवून विकू लागल्या. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. श्वेता म्हणाल्या, “खरं तरं एखाद्या नवीन क्षेत्रात करिअर करायचे तर आपण उगीच घाबरतो; परंतु ‘कोशिश करनेवालों की हार नही होती’ या उक्तीप्रमाणे स्वत:चा आत्मविश्वास हळूहळू वाढवित जाणे जरूरीचे असते. नवीन गोष्टी शिकताना लाज वाटून घेऊ नये. त्यामुळे शिकताना कुठल्याही कलेत आपण हळूहळू पारंगत होत जातो.”

श्वेता केक, कप केक, नानकटाई, चॉकलेटस्, पेस्ट्रीज, ब्राऊनी असे पदार्थ बनवितात. दर महिन्याला त्या पंधरा ते सोळा केक, दहा ते बारा डझन कप केक, एक किलो चॉलेट्स व दहा ते बारा किलो नानकटाईच्या ऑर्डर्स घेतात. अनेकदा कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या मधल्या काळात भरपूर स्त्रियांना शिक्षण असूनही नोकरी करणे, करिअर करणे अशा गोष्टी सहजसाध्य नसतात. आपला संयम, सहनशीलता मनाशी बाळगून स्त्रीने स्वत:ला विविध उद्योगात व्यस्त ठेवणे जरुरीचे आहे, म्हणजे ती नैराश्याची शिकार होणार नाही. स्त्रियांनी आपल्यातील कला व कार्य कौशल्याचा विकास करून त्यायोगे आपला आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्याचा कल्पकतेने उपयोग केल्यास स्वावलंबनाचा मार्ग सुकर होईल व आंतरिक आनंद सुद्धा मिळेल.

आपल्यातील सुप्त गुणांचा अविष्कार साधण्याचे पाठबळ व प्रेरणा श्वेता यांना आपले पती व मुलगा हर्ष यांच्याकडून मिळत आहे. त्याचबरोबर श्वेता यांचा भाचा अंकित व त्यांची पत्नी अर्चना यांनी सुरुवातीच्या काळापासून श्वेता यांना प्रोत्साहन दिले. श्वेता म्हणतात, “एकदा मनाची कष्टं करण्याची तयारी झाली की, त्या दृष्टीने आपली वाटचाल सुरू राहाणे गरजेचे असते. काही वेळा खूप ऑर्डर्स असतील, तर त्यादिवशी सकाळी लवकरच मी कामासाठी सुरुवात करते व रात्री उशिरापर्यंत ऑर्डर्सचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. शिवाय दोन ऑर्डर्सच्या मधल्या वेळात घरची कामे करून घेते. अशा वेळेस ऑर्डर्ससाठी लागणारे साहित्य घेऊन येणे, पदार्थांचे वजन करून पॅकिंग करणे, तयार झालेल्या ऑर्डर्स यासाठी मुलाची व पतीची मदत घेते.’’

सुंदर, नाजूक मेहंदी कोणाला आवडत नाही? बहुतांशी महिला सणासुदीला, काही कार्यक्रमांना आवर्जून मेहंदी काढतात. अशाच एका मेहंदी कलाकार प्रजा पवार हिच्याशी मेहंदी काढण्याच्या निमित्ताने माझी ओळख झाली. प्रजाचे शिक्षण एम.कॉम.पर्यंत झाले असून, ती सध्या एका सी.ए.च्या फर्ममध्ये अकाऊंटट म्हणून नोकरी करते. तिला एक बहीण व भाऊ आहे. तिचे आई-वडील दोघेही नोकरी करतात. प्रजाचे वडील गारमेंट या व्यवसायात नोकरी करतात, तर तिची आई स्वयंपाकाची कामे करते. प्रजाने आपले आयुष्य उद्यमशील ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. कॉलेजमध्ये शिकत असताना प्रजा पार्ट-टाईम नोकरी करायची. ती म्हणते, “प्रत्येकाने स्वावलंबी असायला हवे. त्यासाठी शिक्षण घेणे आवश्यक आहे. घेतलेले शिक्षण कधी वाया जात नाही. तसेच आपल्या समाजात आजूबाजूला काय चालले आहे याची आपल्याला जाणीव व माहिती असणे जरुरीचे आहे”. प्रजा म्हणते, “माझ्या आईला मी माझी मैत्रीण मानते. कारण आपली आई आपलं कधी काही चुकलं तरी आपल्याला समजावून घेते. लहानपणापासून आई-वडिलांनी आम्हाला स्वावलंबनाची शिकवण दिली आहे. मी लहानपणी कधीतरी आईसोबत कामाला जायचे. तिचे कष्टं पाहून माझे मन भरून यायचे. मी तिला मदत करायचे.’’ प्रजा सरावाने स्वत: मेहंदी काढायला शिकली. मुळात तिला चित्रकलेची आवड होती. प्रजाचे वडील सुद्धा क्वचित या मुलांना शाळेतील प्रकल्प बनवून देण्यात मदत करायचे. चित्रकलेचा सराव वहीवर पेन्सिलने करायला लावायचे. त्यामुळे प्रजाला चित्रकलेचा छंद सहजतेने जोपासता आला.

खासकरून लग्नाचा सीझन असला की प्रजाला मेहंदी रेखाटण्यासाठी बोलावले जाते. कधी बारसे, कधी मुंज तर कधी विविध समारंभांच्या वेळीही तिला मेहंदी काढण्यासाठी निमंत्रणं येतात. भारतीय मेहंदी, वधू मेहंदी, अरेबिक मेहंदी असे मेहंदीचे विविध प्रकार ती गरजेनुसार रेखाटते. नव-नवीन डिझाईन्स शोधणे हे प्रजाचे आवडते काम आहे. आपले आयुष्यही नावीन्याने युक्त व उत्साहवर्धक असावे असे तिचे म्हणणे आहे. जीवनात कलात्मकता असल्याने जीवन आनंददायी होते असे ती सांगते. आपण सर्वांशी मिळून-मिसळून वागावे, म्हणजे लोकही आपल्या अडी-अडचणीला आपल्याला मदत करतात, असे प्रजा म्हणते. घरकाम, वृद्ध लोकांना सामान-सुमान आणून देणे, इतरांना मदत करणे, वृक्षारोपण, रक्तदान अशा कामात तरुणांनी सक्रिय राहिले पाहिजे, असे प्रजाचे म्हणणे आहे. एकूणच लहान-सहान उद्योगधंद्यातूनही स्त्रिया स्वावलंबी होऊ पाहत आहेत. त्यात त्यांच्या कुटुंबीयांनीही साथ दिली, तर सोन्याहून पिवळे. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ ही म्हणं प्रसिद्ध आहे. त्यामुळे क्रियाशील राहणे, स्वत:ला उद्योगी ठेवणे, कुटुंबाचा आर्थिक भार काही प्रमाणात का असेना पेलवण्याची जबाबदारी पार पाडणे हे महत्त्वपूर्ण आहे.

श्वेता व प्रजा यांना पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

Recent Posts

मेट्रो-७ अ दुसऱ्या बोगद्याचे भुयारीकरण मे अखेरीस पूर्ण होणार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…

47 minutes ago

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

6 hours ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

7 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…

7 hours ago

पहलगाममधील नरसंहार, हिंदू पर्यटकांना टार्गेट

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…

7 hours ago

SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…

8 hours ago