मोह सुमनांचा
सुमनांचा मोह मला
सांगू किती वेडावतो
गंधाळतो आसमंत
मला रोज खुणावतो
शुभ्र नाजुक पाकळ्या
जाई जुई सायलीच्या
अलगद उमलल्या
कुंदकळ्या चमेलीच्या
दरवळे श्वासातला
सोनचाफा सोनसळी
निशिगंध बहरता
गालावर खुले खळी
चिमुकल्या बकुळीला
गंध मोहक स्मृतींचा
मुग्ध केशरी आबोली
हसे मोगरा कळीचा
लाल जास्वंद लाजता
शुभ्र टगर डोलते
प्रेमवेडी रातराणी
जरा लपून बघते
गेले रंगून रंगात
सुमनांनी मोहविले
काय झाले उमजेना
गाली गुलाब फुलले..!!
– मनीषा शेखर ताम्हणे, बोरिवली
वेस
हृदयात सहस्त्रवार झेलत, उभी असते बाई,
तिची पार्श्वभूमी, तिचा प्रवास…
जगण्यासाठीचा संघर्ष,
माहीत असतो तिला
पण कधीतरी, केव्हातरी हिंदोळ्यावर जागरणं होत आठवणींचं..
तेव्हा
मळभं भरलेले आषाढ ढग झिरपू
लागतात तिच्या अंतर्मनात.
उचकटतात दोर शिवलेल्या मेंदूचे
अंगार फुलतो वेदनेचा
शिव्या शापांची पुण्याई घेऊन,
ती निघते…
डंका फुटतो तिच्या नावाचा, गावाच्या वेशीवर…
तेव्हा पछाडलेल्या इंद्रियांची गुंतागुंत अधिक घट्ट होते.
डोळ्याचा पदर भिजतो, पण थांबत नाही कोलाहल
आर्तता शोषतात वखवखलेल्या नजरा
ताशेरे ओढतात बेताल माणसं
बाई ढासळते… आणि आसवांची वाट मोकळी होते…
बांध फुटतो काठावरचा
गंगा जमुना मोकळ्या होतात पवित्र्य
अपावित्र्याच्या जंजाळातून.
स्वतंत्रपणाचं कळकट मळकट स्वरूप घेऊन… बाई वेस ओलांडते…
परिणामांची चिंता न करता
बाई वेस ओलांडते…
परिणामांची चिंता न करता…
– पूजा अ. काळे, मुंबई