Wednesday, July 24, 2024

नाच गं घुमा.

संवाद – गुरुनाथ तेंडुलकर

मंगळागौरीच्या जागरणात बायका एक खेळ खेळतात आणि त्यात एक गाणं असतं.
मैत्रिणी सांगतात नाच गं घुमा…
घुमा म्हणते,‘नाचू मी कशी, या गावचा, त्या गावचा शिंपी नाही आला, कपडे नाही मला नाचू मी कशी?’ पुन्हा मैत्रिणी म्हणतात, ‘नाथ गं घुमा’
घुमा पुन्हा म्हणते,‘या गावचा, त्या गावचा माळी नाही आला, गजरा नाही मला नाचू मी कशी?’
प्रत्येक खेपेला ही घुमा न नाचण्याबद्दल वेगवेगळे कारण सांगते. काय तर म्हणे चांभार नाही आला आणि चपला नाही मला… पुढच्या खेपेला काय तर सोनार नाही आला, पाटल्या नाही मला… वास्तविक हातातल्या पाटल्यांचा आणि नाचण्याचा तसा काहीही संबंध नसतो, पण तरीदेखील ही घुमा कारण पुढे करते. वास्तविक तिला स्वतःलाच नाचायचं नसतं. तिच्या मनात नाचायची इच्छाच नसते.

मंगळागौरीच्या या खेळामागे एक फार मोठी मानसिकता दडलेली आहे. ‘नाचू मी कशी?’ असं विचारणाऱ्या अनेक घुमा आपल्या आजूबाजूला रोजच्या व्यवहारात पाहायला मिळतात. एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या मदतीसाठी तुम्ही देणगी किंवा जाहिरात मागायला कुणाकडे गेलात तर समोरचा माणूस म्हणतो, ‘दिली असती हो जाहिरात पण… पण यंदाच्या बजेटमध्ये आमच्या डायरेक्टर बोर्डानं जाहिरातीवरचा खर्च कमी करायला सांगितलाय.
पुढचं आपण समजून घ्यायचं…

घुमा म्हणते,
‘माळी नाही आला…

एस. एस. सी. ला नापास होऊन पुढे शिक्षण अर्धवट सोडलेल्या माणसाला विचारा तो हमखास सांगेल, ‘परीक्षेच्या वर्षी वडील आजारी होते किंवा घरची परिस्थिती बिकट होती किंवा त्यावर्षी पेपर फुटल्यामुळे ऐनवेळी पेपर बदलले… म्हणून नापास झालो.’
‘बरं त्या वर्षी नापास झालास पण पुढच्या वर्षी अभ्यास करून पास झालास का?’
‘काय करू, घरची परिस्थिती…!’
पुढचं आपण समजून जायचं…
घुमा दुसरं कारण पुढे करते, म्हणते, ‘सोनार नाही आला…
कोणत्याही कामात यश का आलं नाही याचं कारण देताना बहुतेक जण रेडिमेड कारणं सांगतात. अनेकदा तर ही कारणं एका ठरावीक साच्यातलीच असतात.
‘उशीर का झाला?’
‘ट्रेन लेट होत्या…’
‘पैसे वेळेवर का नाही भरले?’
‘एकाकडून माझेच पैसे यायचे होते ते आले नाहीत म्हणून…
शिंप्याला विचारा, ‘कपडे अजून तयार का नाही झाले?’
तो उत्तर देईल, ‘काज बटनवाल्याचं दुकान बंद होतं.’
क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना विचारा, ‘हरलात का?
ते शंभर कारण सांगतील.

खटला हरल्यानंतर वकिलाला कारण विचारा. उत्तर मिळेल, ‘मी अगदी शर्थ केली. पण विरोधी पक्षाने ऐनवेळी न्यायाधीशाला पैसे देऊन… ज्याच्या वर्गातले बहुसंख्य विद्यार्थी नापास झालेत अशा शिक्षकाला त्याच्या वर्गाचा निकाल कमी लागण्याचं कारण विचारा. तो सांगेल, ‘आम्ही वर्गात जीव तोडून शिकवतो, पण ही हल्लीची मुलं हो… यांना अभ्यासच करायला नको असतो.’ नापास झालेल्या मुलाच्या पालकाला विचारा. उत्तर मिळेल, ‘हल्ली शाळेत पूर्वीसारखं शिकवतच नाहीत हो.” नापास झालेल्या त्या मुलाला विचारा. तो सांगेल, ‘मी अभ्यास केला होता पण… फक्त कारणं कारणं आणि कारणं… सगळे जण फक्त्त कारणं सांगतात. केवळ लंगड्या सबबी पुढे करतात. राजकारण्यांच्या बाबतीत तर काय विचारूच नका, निवडणुकांच्या वेळी दिलेली आश्वासनं का पाळली गेली नाहीत यासाठी ते चक्क त्यांच्या विरोधी पक्षाकडे बोट दाखवून मोकळे होतात. घरी, दारी, कचेरीत, खेळाच्या मैदानात, राजकारणांत कुठंही गेलात तरी लंगड्या सबबी सांगून आपली जबाबदारी टाळणारी माणसं आपल्याला आढळतात. फार लांब कशाला अगदी आपण स्वतः देखील अनेकदा अशाच प्रकारे नाही का वागत?

आईनं औषध आणायला सांगितलेलं असतं. आपण विसरतो आणि चक्क सांगतो, ‘दोन-चार दुकानं फिरलो पण कुठंच मिळालं नाही. उद्या रॉयल केमिस्टच्या दुकानात जाऊन बघतो…’

आपण मध्यमवर्गीय पांढरपेशी माणसं, आपण आपल्या अपयशाची डोळस मीमांसा न करता केवळ सबबी शोधण्यात धन्यता मानतो. म्हणूनच कदाचित आपण आयुष्यभर सामान्यच राहातो. जी माणसं अपयशाची खरी कारणं शोधतात त्यांचा प्रवास सामान्यत्वाकडून असामान्यत्वाकडे होत असतो. आपण इतिहासातल्या ज्या महापुरुषांचे गोडवे आज गातो, ज्यांची चरित्र वाचतो, अशा महापुरुषांच्या चरित्राकडे जरा डोळसपणे पाहिलं तर आढळेल की, या महापुरुषांची परिस्थिती आपल्याहून खूपच बिकट होती. पण त्यांनी कधी ‘माझ्याजवळ काय काय नाही… याची यादी दिली नाही.

आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी त्यांना त्या बिकट परिस्थितीचं भांडवल करणं सहज शक्य झाले असतं. पण तसं न करता त्यांनी प्राप्त परिस्थितीला तोंड देत धैर्यानं वाटचाल केली.

अंदमानच्या काळापाण्याच्या तुरुंगात बंदिस्त असतानाच सावरकरांनी कमला महाकाव्य लिहिलं. लोकमान्यांच्या गीतारहस्याचं लेखन देखील मंडालेच्या तुरुंगात अत्यंत प्रतिकूल स्थितीतच झालं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत विपरित परिस्थितीत शिक्षण पूर्ण केलं. घरच्या गरिबीशी दोन हात करीत लालबहादूर शास्त्रीजी शिकले. पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले.

आपल्या अपंगत्वावर मात करून हेलन केलर नावारूपाला आली.
अशी एक दोन नव्हे, तर शेकडो, हजारो उदाहरणं देता येतील…
भवभूतीचा एक श्लोक आठवला म्हणून सांगतो…

रथैस्यैकं चक्रं भुजगयमिताः सप्ततुरगाः ।
निरालम्बो मार्गश्चरणरहितः सारधिरपि ।।
रविर्षच्छत्यन्तं प्रतिदिनमपारस्य नभसः।
कियासिद्धिः सत्वे वसति महातां नोपकरणे ।।

सूर्यदेवाचं उदाहरण देऊन सुभाषितकार म्हणतात…
सूर्याच्या स्थाला केवळ एकच चाक आहे. घोड्याची संख्या सात म्हणजे विषम, त्या घोड्यांना आवरायचा चाबूक म्हणजे नाग, बरं प्रवासाचा मार्ग…? तो देखील अधांतरी आणि यात भरीस भर म्हणूनच की काय तर सूर्यदेवाच्या या रथाचा सारधी जो अरुण, तो पायानं पांगळा… एवढी प्रतिकूल परिस्थिती असून देखील सूर्यनारायण रोजच्या रोज या अथांग अाकाशाच्या दुसऱ्या टोकाला जाऊन परततो. कारण थोरांना त्यांच्या कार्यात जे यश मिळते ते त्यांच्या हिंमतीवर आणि जिद्दीवर, त्यांच्या हातात कोणत्या प्रकारची साधनसामग्री आहे याच्यावर त्यांच्या यशाचा फारसा संबंध नसतो.
सूर्याचं उदाहरण ही एक आपण कविकल्पना म्हणू शकतो. पण हिरकणी…? शिवाजी महाराजांच्या काळात घडलेली हिरकणीची कथा तर निखळ वास्तव आहे ना?

हिरकणी. अगदी तुमच्या आमच्यासारखीच सामान्य कुटुंबातली एक स्त्री. बाळाच्या ओढीनं रात्रीच्या मिट्ट काळोखात अख्खा गड उतरून गेली. त्यावेळी तिनं कोणतीही सबब सांगितली नव्हती. दोर नाही, टॉर्च नाही, पायात ट्रेकिंग बूट नाहीत वगैरे काय काय नाही याची यादी न करता निबर अंधारातही मोठ्या जिद्दीनं पाऊल टाकलं आणि दगड धोंड्यांना ठेचकाळत ठेचकाळत धावत-पळत घर गाठलं. तिच्या डोळ्यांसमोर त्यावेळी एकच ध्येय होतं. भुकेनं व्याकुळलेलं, आक्रोश करणारं तिचं तान्हं बाळ… त्या बाळाच्या भेटीसाठी धावताना इतर कश्शा कश्शाचाच विचार तिच्या मनात येत नव्हता.

कोणतीही सबब न सांगता प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कडा उतरणारी हिरकणी आणि नाचू मी कशी? असं म्हणून प्रत्येक वेळी सबबी सांगणारी घुमा… आपण कुणाचा आदर्श ठेवायचा हे आपलं आपणच ठरवायचं…!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -