Saturday, May 10, 2025

ताज्या घडामोडी

Mumbai Local News: मध्य रेल्वेतर्फे शून्य अपघाताचे नियोजन; घेतला 'हा' मोठा निर्णय

Mumbai Local News: मध्य रेल्वेतर्फे शून्य अपघाताचे नियोजन; घेतला 'हा' मोठा निर्णय

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर रूळ ओलांडणे आणि लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. तसेच रेल्वे रुळावर गाई-गुरे आल्याने अनेक अपघात घडले आहेत. विशेषत: गेल्या काही महिन्यांपासून वंदे भारत ट्रेनला कधी गाय तर कधी म्हैस धडकण्याच्या घटना घडल्या आहेत. अशावेळी प्राण्यांसह रेल्वे प्रवाशांचाही जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. तसेच या कारणांनी रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम पडला आहे. यामुळेच अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.


एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे गाड्या ११० ते १३० किमी ताशी वेगाने धावण्यासाठी आणि रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात थांबवण्यासाठी मध्य रेल्वेने रेल्वे मार्गिकेवर सुरक्षा कुंपण उभारण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत २०५० किलोमीटर सुरक्षा कुंपण उभारण्यात आले. आता १२८२ किलोमीटर रेल्वे मार्गावर सुरक्षा कुंपण उभारण्याचा निर्णय घेतला आहे. १२८२ पैकी ४०४ किलोमीटर मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर सुरक्षा कुंपण उभारण्यात येणार आहे. याकरिता ६२४ कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.


रेल्वेने हे प्रकार रोखण्यासाठी रुळांशेजारी संरक्षक भिंत बांधणे, दोन रुळांच्या मार्गामध्ये संरक्षक जाळी, स्थानकात पादचारी पूल बांधणे, प्रवेशद्वार बांधण्याचे काम केले. मात्र तरीही गेल्या काही वर्षांमध्ये हे अपघात कमी झाले नाहीत. त्यामुळे सुरक्षा कुंपण बांधून शून्य अपघाताचे नियोजन मध्य रेल्वेने केले आहे.



४०४ किमी रेल्वे मार्गावर सुरक्षा भिंत


मुंबई उपनगरत रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वेने ४०४ किलोमीटर मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर सुरक्षा भिंत उभारण्यात येणार आहे. याकरिता साधारण २०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. एप्रिल २०२५ पर्यत सुरक्षा भिंत बांधण्याचे नियोजन मध्य रेल्वेचे आहे.




  • मरेवर १२८२ किमी रेल्वे मार्गावर सुरक्षा कुंपण

  • मुंबईत ४०४ किमी रेल्वे मार्गावर सुरक्षा कुंपण

  •  सुरक्षा कुंपण उभारण्यासाठी ६२४ कोटींचा खर्च

  •  एप्रिल २०२५ पर्यत सुरक्षा कुंपण उभारण्याचे नियोजन


सुरक्षा कुंपणामुळे होणार हे फायदे :



  • मेल- एक्सप्रेस गाड्यांचा वेग वाढणार

  •  रेल्वे रुळावर येणाऱ्या गुरांना आळा बसणार

  •  रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रकार थांबणार

  •  रेल्वे रुळावर कचरा टाकण्याचे प्रकार थांबणार


Comments
Add Comment