साळशी हे एक ऐतिहासिक, निसर्गरम्य आणि इनाम गाव आहे. देवगड – निपाणी महामार्गावरील शिरगाव बाजारपेठेपासून ६ कि.मी. अंतरावर धार्मिक महत्त्व प्राप्त असलेले देवगड तालुक्यातील साळशी या निसर्गरम्य गावाच्या मध्यभागी प्राचीन कलाकुसरीची साक्ष देत उभ्या असलेल्या वास्तूमध्ये साळशीचे पुरातन प्रसिद्ध इनाम देवस्थान श्री सिद्धेश्वर पावणाई आहे. खारेपाटणजवळच्या पियाळी नदीपासून कणकवली येथील गडनदीपर्यंत आणि सह्याद्री पायथ्याच्या कणकवली तालुक्यातील कुंभवडेपासून देवगड तालुक्यातील कुणकेश्वर या अरबी समुद्रापर्यंतची ८४ खेडी तथा देवस्थाने साळशी येथील ‘श्री देव सिद्धेश्वर आणि श्री देवी पावणाई’ या देवस्थानांच्या अखत्यारीत असायची. त्यामुळे या देवस्थानाला चौऱ्यांशी खेड्यांचा अधिपती म्हणून संबोधले जाते.
वाघोबा (फोंडा), नवलादेवी (नरडवे), पावणाई (दिगवळे), रामेश्वर (नाटळ), दिर्बाई-रामेश्वर (भिरंवडे), गांगो-महालिंग (कुंभवडे), पावणादेवी (हरकुळ-खुर्द), गांगो (घोणसरी), गांगो (लोरे), गांगो (पियाळी), गांगो (मठ-खुर्द), रासाई-सईम (वाघेरी), अनभवणी-गांगो (डांमरे), रामेश्वर (कोंडये), रामेश्वर (करुळ), गांगो (हुंबरट), लिंग रामेश्वर (करंजे), लिंगेश्वर (साकेडी), नागेश्वर (नागवे), रामेश्वर-दिर्बादेवी (सांगवे), लिंगेश्वर (कणकवली), रामेश्वर (हरकुळ ब्रु.), गांगेश्वर (आशिये), कलेश्वर (कलमठ), लिंगेश्वर (जानवली), चंडिकादेवी (वरवडे), भगवती (पिसेकामते), टेवणादेवी (तरंदळे), रवळनाथ (बिडवाडी), नवलादेवी (गोठणे), रामेश्वर (बेळणे बु.), रामेश्वर (श्रावण), जयंती (पळसंब), महालक्ष्मी (आडवली), रामेश्वर (रामगड), गणपती (कोळली), भराडी (बांदिवडे), रवळनाथ (वायंगणी), वाघोबा (वाडीतोंडवली), गांगो (त्रिंबक), माऊली (चिंदर), रामेश्वर (आचरे), गांगो (पोयरे), गांगो (कुडोपी), मार्लेश्वर (बुधवळे), बोभडेश्वर (मठबुद्रुक), रामेश्वर (कुवळे), गांगो (भरणी), धावगीर (माईण), गांगो (सावडाव), पावणाई (बेळणे खुर्द), गांगो (तिवरे), गांगो (बावशी), रामेश्वर (तोंडवली), रामेश्वर (असलदे), गारडी-गांगो (कोळोशी), गांगो (हडपीड), रामेश्वर (नांदगांव), भैरी (ओटव), नागेश्वर (आयनल), गांगो (चाफेड), सिद्धेश्वर-पावणाई (साळशी), पावणाई (शिरगांव), नवलाई (ओंबळ), गांगो (शेवरे), महादेव (वळिवंडे), ब्राह्मण (चांदोशी), पावणी (तळवडे), भावई (वरेरी), स्थानेश्वर (किंजवडे), आरेश्वर (आरे), भगवती (कोटकामते), महादेव (दहिबांव), गांगेश्वर (नारिंग्रे), भगवती (मुणगे), भैरी-काळभैरव (हिंदळे), रामेश्वर (मिठबांव), कुणकेश्वर (कुणकेश्वर), मुंबरेश्वर (मुंबरी), लक्ष्मी (इळये), संतपुरुष (दाभोळे), कवळादेवी (टेंबवली), दिर्बादेवी (जामसंडे), नारायण (मालडी). साळशी अशी ही ८४ गावे आहेत.
तत्कालीन ‘साळस महाल’ हे तालुक्याचे ठिकाण असल्याने मुख्य बाजारपेठही साळशी या ठिकाणी भरत असे. त्यावेळी या महालात दहा-पंधरा हजार लोकवस्तीचा समावेश होता. या महालात बारा बलुतेदार होते. मुख्य बाब म्हणजे या महालाच्या नावाने ओळखली जाणारी वजने, मापे आजही शाबूत आहेत. विशेषत: ‘साळशी पायली’ हा शब्दप्रयोग संपूर्ण जिल्ह्यात प्रचलित आहे. संपूर्ण साळशी गाव, येथील सदानंद गड आणि श्री देव सिद्धेश्वर-पावणाई देवस्थानांबाबत अनेक आख्यायिका आणि दंतकथा सांगितल्या जातात. सदानंद गडाचा इतिहास पाहता साळशी गाव इ. स. ७०० ते ९०० या सालात झाले असावे, कारण सदानंद गड इ. स. ११००च्या दरम्यान बांधला गेला असे उल्लेख सापडतात. साळशी गावातील वयोवृद्ध जाणकार आणि या देवस्थानचे अभ्यासक अनंत गोविंद गांवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार इ. स. १५०० दरम्यान पैठण येथून मिराशी घराणे कोकणात दाखल झाले. मिराशी घराण्याचे गांवकर आणि नाईक हे बंधू होत. या मिराशी घराण्याने आपली कुलदेवताही साळशी या ठिकाणी वसवली. छत्रपती शंभूराजे यांनी हा गाव या देवतेस इनाम दिला. श्रीयुत अमात्य यांना कोल्हापूरच्या राजांनी बावड जहागिरी दिली. यावेळी हा पूर्ण साळस महाल अमात्य यांच्या ताब्यात गेला. भगवंतराव अमात्य यांनीही साळशी येथील श्री देव सिद्धेश्वर पावणाईला सनद दिली होती. पेशवाई सन १८१८ मध्ये खालसा झाली. कोल्हापूरचे स्वामी छत्रपती शंभू राजे यांनी दिलेली सनद ग्राह्य मानून ब्रिटिश सरकारने ३० ऑगस्ट, १८६४ मध्ये ही सनद दिलेली आहे. ही सनद व्हिक्टोरिया राणीच्या वतीने त्यावेळच्या मुंबई इलाख्यातील गव्हर्नर इन कौन्सिल यांच्या हुकमाने व त्यांच्या सहीनिशी देण्यात आलेली आहे.
मुंबई येथील लेजिस्लेटिव्ह कौन्सिल यांनी मंजूर केलेल्या इ. स. १८३३ सालच्या अॅक्ट, ७ प्रमाणे सनदेमध्ये नमूद केल्याप्रमाणे संपूर्ण साळशी गांवातील जमिनींना ‘समरी सेटलमेंट’ लागू करण्यात आले. त्यानुसार विश्वस्त मंडळाने जमा केलेल्या जमिनीच्या महसुलापैकी १/८ महसूल सरकार दरबारी जुडी भरणा केला जातो. उर्वरित महसूल देवस्थानच्या देखभालीसाठी वापरण्यात येतो. आजही या देवलयांचा कारभार सनदांप्रमाणे चालतो.
ह्या सनदा इंग्रजी व मोडी भाषेत आहेत. यामुळे ब्रिटिशकालीन आणि संस्थान कालीन अशा प्रशासनाचा एक वेगळा नमुना आपणास पाहावयास मिळतो. शिरगाव येथून ‘साळशी’ गांवात प्रवेश करताच या देवस्थानच्या अनेक प्राचीन वास्तू आपले लक्ष वेधून घेतात. या प्राचीन वास्तूंमध्ये इनाम देवस्थान श्री देव सिद्धेश्वर व देवी पावणाई ही प्रमुख मंदिरे आहेत. श्री देव सिद्धेश्वर मंदिर भव्य असून या मंदिरात शिवाचे वाहन असलेल्या ‘नंदी’ याची महाकाय अशी दगडी मूर्ती आहे. या दगडी मूर्तीबाबत असे सांगण्यात येते की, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अन्यत्र कोणत्याही शिव मंदिरात एवढा मोठा नंदी पाहावयास मिळत नाही. या मंदिरात शिवाची मोठी पिंडी असून गाभाऱ्याच्या बाहेरील मंदिरासमोर चौकात एक चौथरा आहे यावर श्री गणेशाची पाषाणरूपी मूर्ती मंदिराच्या दिशेने तोंड करून स्थानापन्न आहे. त्याच्या डाव्या अंगाला दीपमाळ व दीपमाळेच्या समोर मोठे तुळशी वृंदावन दिसते. या देवतेच्या पूजाविधीसाठी ब्राह्मण किंवा लिंगायत गुरव यांच्या व्यतिरिक्त कोणीही पूजारी म्हणून काम पाहत नाही. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे विजयादशमी याच दिवशी फक्त भाविकांना गाभाऱ्यांपर्यंत प्रवेश मिळतो. अन्य वेळी बाहेरील चौकातून दर्शन घेता येते. या देवस्थानातील सर्वात मोठे व प्राचीन कलाकुसरीने सजवलेले आकर्षक असे मंदिर म्हणजे श्री देवी पावणाई मातेचे मंदिर. या मंदिराचा गाभारा, तरंग भाग व भव्य सभामंडप असे प्रमुख भाग आहेत. गाभाऱ्यात देवीची मूर्ती असून त्याचबरोबर शिव (बाबा), शक्ती काळकाय (कालिका माता) यांच्याही प्रतिमा आहेत. बहुधा देवीची मूर्ती राजस्थानी शिल्पांतील असावी असे गावातील वयोवृद्ध जाणकार सांगतात. सभामंडपाच्या दरवाजातून देवीचे मनोहारी दर्शन घडते. या मूर्तीबाबत कोल्हापूर येथील श्री देवी अंबाबाईची मूर्ती, तुळजापूरची भवानी माता आणि या ठिकाणची श्री देवी पावणाई या तिन्ही मूर्तींच्या जडणघडणीत साम्य आढळते. श्री देवी पावणाईची मूर्ती मात्र गावांतील कारागिराने घडविली असल्याचे गावातील जाणकारांचे मत आहे.
श्री देवी पावणाईचे हे प्राचीन मंदिर प्रचंड असून लाकडी खांबांनी तोललेली तक्तपोशी आहे. प्रत्येक खांबाचा वरचा निम्मा भाग कोरीव, नक्षीकामयुक्त आहे. तसेच दरवाजाच्या चौकटीवरही कलाकुसर लक्ष वेधून घेते. श्री देवी पावणाई व श्री देव सिद्धेश्वर या दोन्ही देवालयांत सततचा नंदादीप तेवत असतो व अंध:कार नाहीसा करण्याचा संदेशच तो देत असतो. दोन्ही मंदिरांना स्वतंत्र आवार असून येथील धार्मिक वातावरणात येणारा भाविक आपसूकच या दैवतांच्या चरणी नतमस्तक होतो. तत्कालीन ‘साळस महालातील व आताच्या देवगड, कणकवली व मालवण तालुक्यातील चौऱ्यांशी खेड्यातील भाविक आपल्या शुभ कार्याप्रसंगी तसेच सण समारंभावेळी या देवीला श्रीफळ ठेवून अभय मागतात.
पूर्वी या मंदिरात गावाचे न्याय होत होते. श्री देव सिद्धेश्वर व श्री देवी पावणाई मंदिराच्या चारही बाजूला तटबंदी आहे. तसेच मधला भाग चिऱ्यांनी फरसबंद केला आहे. या प्रशस्त आवारातून या देवीची पालखी फिरते. तसेच दोन्ही मंदिरांच्या एका बाजूला प्राचीन शिल्पांची आठवण करून देणाऱ्या भव्य दीपमाळा व प्रशस्त तुळशीवृंदावने आहेत. यात्रेकरूंसाठी धर्मशाळाही अस्तित्वात आहे. याच धर्मशाळेजवळ पुरातन दोन ऐतिहासिक तोफाही उभ्या असल्याची साक्ष देतात. तसेच पराक्रमी पुरुषांच्या स्मृतिप्रीत्यर्थ छोटी-मोठी स्मारकेही आहेत. धार्मिक कार्याप्रसंगी त्या स्थानांना वेगवेगळय़ा प्रकारे महत्त्व देण्यात येते. तसेच श्री देव रवळनाथ व श्री देवनाथ ही दोन नाथ संप्रदायातील मंदिरेही आढळतात. गावाच्या परिसरात जैन सांप्रदायातील मंदिरेही आहेत. पूर्वी जैन लोकांची वस्ती या भागात होती असे सांगितले जाते. या मंदिर परिसरात जैन मूर्ती येथेही आढळतात. तळखंबा-वशिक, गांगो, इटलाई, बाणकी देवी, धुरी ब्राह्मण देव, बांदा ब्राह्मणदेव, सत्पुरुष ठिकाण, हनुमान मंदिर, दत्त मंदिर, श्री देव वटेश्वर अशी लहान-मोठी मंदिरे या परिसरात आहेत. त्या त्या ठिकाणचे मानकरी त्या त्या देवांची पूजा-अर्चा करतात. श्री देव सिद्धेश्वर आणि श्री देवी पावणाई देवस्थानचा विजयादशमी उत्सव इतिहास कालीन राजवैभवाच्या थाटात पार पडतो.
घडशीवादनांसाठी नाशिकहून धुमाळ खास उपस्थित असतात. वाद्यांच्या गजरात निशाणे, मशाली, पालखी, चौरवी, तरंग, भालदार, चौपदारांसह भाविकांचा प्रचंड लवाजमा सीमोल्लंघनासाठी अरुंद चढणीतून जातो व सोन्याची लयलूट करून परततो. ही एक आनंदाची पर्वणी असते.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…