दृष्टिक्षेप – अनघा निकम-मगदूम
नमस्कार वाचकहो, कसे आहात, हसताय ना, असेच हसत राहा,… मला माहितीय ही ओळ एका प्रसिद्ध कार्यक्रमातील अँकरची टॅगलाईन आहे. ती आजच्या लेखाच्या सुरुवातीला का हा प्रश्न पडला असेल तुम्हाला. तसं आज हास्य दिवस नाही की काही विशेष नाही. उलट बाहेर उकाडा प्रचंड वाढल्याने चेहऱ्यावर थकवा आणि उन्हाचा तापच जास्त दिसून येत आहे. तरीही आजच्या लेखाची सुरुवात अशी का?
तर वाचकहो आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमवेत आणखीन दोन महत्त्वाच्या व्यक्तींचा जन्मदिवस आहे. बाबासाहेबांनी जगण्याची पद्धत शिकवली तर या दोन विभुतींनी जगताना दिलखुलास तणाव विरहीत शैली जगाला दिली. त्यात दोघीही मराठी आहेत हे विशेष. मंडळी आज द. मा. मिरासदार आणि रामदास फुटाणे या दोन विनोदी लेखक कवींचा जन्मदिवस. आज आपण प्रत्येक दिवस तणावात घालवत आहोत. रोज झोपताना वाटतं उद्या हा तणाव संपेल पण दुसऱ्या दिवशी तेच तणाव सोबत घेऊन आपण जगत राहतो. अशावेळी या तणावातून दिलासा देतात ते असे विनोदी लेखक कवी! खरंतर आताच्या वाचन संस्कृतीच्या हरवलेल्या काळात आपण टीव्हीवरचे विनोदी कार्यक्रम पाहून आपली विनोदाची भूक शमवू पाहतो. पण याही आधी या लेखक कवींनी आपल्यासाठी किती भांडार पुस्तकांच्या रूपाने लिहून ठेवला आहे याची आठवण ठेवलीच पाहिजे. दत्ताराम मारुती मिरासदार अर्थात द. मा. मिरासदार यांचा जन्म १४ एप्रिल १९२७ चा. मराठी लेखक आणि मुख्यतः विनोदी कथांचे निवेदक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या कथा मुख्यतः ग्रामीण महाराष्ट्रावर आधारित होत्या. त्यांचे विनोदी लेखन तरल असे. जन्म अकलूजचा, शालेय शिक्षण पंढरपूरला, तर पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून एम.ए मिळवले. त्यांचा पेशा शिक्षकाचा, पुण्यातील महाविद्यालयात ते मराठीचे प्राध्यापक झाले.
मिरासदारांच्या काही कथा गंभीर, सामाजिक समस्या आणि खेड्यात राहणाऱ्या गरिबांच्या जीवनाशी संबंधित आहेत. पण त्यांना ओळख मिळाली ती अनेक विनोदी कथांनी. त्यांच्या या कथा महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाभोवती फिरतात. जाहीर कार्यक्रमात कथाकथन करून ते थेट वाचकांपर्यंत पोहोचत असत. त्यांच्याबरोबर शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर आणि मिरासदार यांनी संयुक्तपणे, महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये, त्यांच्या लघुकथांचे अत्यंत लोकप्रिय सार्वजनिक पठण सादर केले. मिरासदार हे महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्यवाह अध्यक्ष सुद्धा होते. १९९८ मध्ये, परळी, महाराष्ट्रातील ७१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. २०१५ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाकडून विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार मिळाला. २०१८ मध्ये त्यांना पहिला साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या माझ्या बापाची पेंड, भुतांचा जन्म, मिरासदरी, माकडमेवा, चकत्या, हसनवल, चुटक्यांच्या गोष्टी या आणि अनेक पुस्तकांची मिरासदारी त्यांच्या नावावर आहे. मिरासदार यांचे २ ऑक्टोबर २०२१ रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी पुण्यात निधन झाले.
असंच विनोदी साहित्यातील अजून एक आदराने घेण्याचं नाव म्हणजे रामदास फुटाणे होय. मराठी साहित्यातील कवी, विडंबनकवी, वात्रटिकाकार, चित्रपट दिग्दर्शक म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या सांस्कृतिक कार्याला अनेकविध स्वरूपाचे पैलू आहेत. नगर जिल्ह्यातील जामखेड या खेडेगावात जन्मलेल्या बेताचीच आर्थिक परिस्थिती असणाऱ्या शेती व कापडाच्या विक्रीचा आठवडी बाजार करणाऱ्या संयुक्त कुटुंबात जन्मलेल्या रामदास फुटाणे यांनी गोरगरीब खेडूत लोकांच्या मनात सलणारे दु:ख कवितेतून मांडले. अकरावी मॅट्रिक झाल्यावर चित्रकलेची पदविका पूर्ण करून वयाच्या अठराव्या वर्षी चित्रकला शिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली. चित्रकलेचे शिक्षक म्हणून फटकारे मारत असतानाच त्यांना आजूबाजूला दिसत असलेल्या सामाजिक, राजकीय परिस्थितीतील विसंगतीबद्दल ते व्यक्त होत होते. चित्रकला शिक्षणापासून लेखक, कवी, विडंबनकार ते चित्रपटांची निर्मिती हा त्यांचा कलात्मक प्रवास आहे. कटपीस, सफेद टोपी लाल बत्ती, चांगभलं, भारत कधी कधी माझा देश आहे, फोडणी, कॉकटेल, तांबडा पांढरा, कोरोनाच्या नाना कळा ही रामदास फुटाणेंची काव्यनिर्मिती होय. मूकसंवाद, जुनी-नवी पाने या दोन ललित विडंबन लेखसंग्रहातूनही फुटाणे व्यक्त झाले आहेत. विविध कार्यक्रम आणि ध्वनिफिती, दूरदर्शन आदींमधून फुटाणे यांनी कविता लोकप्रिय केली. हास्यधारा, भारत कधी कधी माझा देश आहे, कविसंमेलने अशा कार्यक्रमाचे त्यांनी कौशल्याने आयोजन केले.
जब्बार पटेलांच्या दिग्दर्शनाखाली रामदास फुटाणेंनी खेड्यातलं दडपशाहीचं राजकारण समाजासमोर सामना चित्रपटातून आणलं. सामनाबरोबर सर्वसाक्षी, सुर्वंता, सरपंच भगीरथ असे चार चित्रपट रामदास फुटाणेंनी पडद्यावर आणले. अंतर्बाह्य वास्तव उपहासात्मक व्यंगशैलीने समाजासमोर ठेवणं हेच रामदास फुटाणेंच्या काव्य-चित्रपट, कला माध्यमांचं केंद्रवर्ती सूत्र आहे. या दोन्ही विनोदी लेखक कवींनी महाराष्ट्रातील तत्कालीन वाचकांना समृद्ध केले. विनोद निखळ कसा असतो याची जाणीव करून दिली. माणसाच्या आयुष्यातील दुःख कधीच संपत नाही, अशावेळी तो या विनोद नावाच्या औषधातून स्वतःला बरं करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र गेल्या काही वर्षांत विनोदाची पातळी घसरलेली आहे.
शारीरिक व्यंग, हे विनोद निर्माण करण्याचे भाग झालं आहे. विकृतीतून विनोद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावरून तयार होणारे कार्यक्रम का बघायचे हा प्रश्न आहे. अनेकदा पर्याय नसल्याने मनुष्य त्यावरही हसत आहे. पण तो समाधानी नक्की नाही. अशावेळी फुटाणे, मिरासदार यांच्यासारख्या विनोदी लेखकांची आठवण प्रकर्षाने होते. त्यांनी दिलेला आनंद नक्कीच अवर्णनीय होता. आजही अशाच उच्च श्रीमंत विनोदी लेखकाची आपल्याला गरज आहे. तरच आपण निर्भेळ विनोदावर हसत राहू आणि या आयुष्यातील अनेक अडचणींचा सहज सामना करत राहू.