Monday, July 15, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलमजेशीर रविवार : कविता आणि काव्यकोडी

मजेशीर रविवार : कविता आणि काव्यकोडी

‘की’ ची करामत

खेळ खेळूया शब्दांचा
शब्दांवर साऱ्यांची मालकी
तीन अक्षरी शब्दांची ही
‘की’ ची करामत बोलकी

दाराची बहीण कोण
तिला म्हणतात खिडकी
मातीची भांडी कसली?
ही तर आहेत मडकी

स्वतःभोवती फिरण्याला
घेतली म्हणतात गिरकी
कापसाच्या बीला येथे
सारेच म्हणतात सरकी

लावणीच्या ठसक्याला
घुंगरांच्या सोबत ढोलकी
झोप डोळ्यांवर आली की
जो तो घेतो डुलकी

ढोंगी मनुष्य दिसताच
आला म्हणतात नाटकी
एखाद्याची परिस्थितीसुद्धा
असते बरं फाटकी

नाकातला छोटा अलंकार
त्याला म्हणतात चमकी
छोट्याशा तालवाद्याला
म्हणतात खरं टिमकी

खेळात शब्दांची अशी
जेव्हा बसते अंगतपंगत
शब्दांचा वाढतो साठा
खेळाला चढते रंगत

काव्यकोडी – एकनाथ आव्हाड

१) आनंद झाला की
छानच खुलतो
लाज वाटली की
शरमेने पडतो

मुख, तोंड, चर्या,
सुरतही म्हणती याला
सांगा बरं एवढी नावं
देतात कोणाला?

२) माफी मागताना
जमिनीला घासतात
खोड मोडण्यासाठी
यालाच ठेचतात

नापसंती दाखवताना
लगेच मुरडतात
शहाणपणा दाखवून
कांदे कशाने सोलतात?

३) एकसारखे बोलून
ही पट्टा चालवते
सैल सोडले की
वाटेल तसे बोलते

हाड नसल्यामुळे
बोलते अद्वातद्वा
कोण बरं ही जी,
रसना, जबान, जिव्हा?

उत्तर –

१)जीभ

२) नाक

३) चेहरा

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -