अब की बार... देशावर जादू

स्टेटलाइन - डॉ. सुकृत खांडेकर


अब की बार चारसौ पार, अब की बार मोदी सरकार, या घोषणांनी सर्व देशातील जनता मंत्रमुग्ध झाली असून २०२४च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी या दोन शब्दांचीच जादू सर्वत्र चाललेली दिसते आहे. भाजपाच्या विरोधात २६ राजकीय पक्ष एकत्र येऊन इंडिया नावाच्या बॅनरखाली निवडणुकीच्या मैदानात उतरले असले तरी मोदी हेच सर्वमान्य व सर्वात लोकप्रिय नेता आहेत. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले तर आपले भविष्य काय, या विचाराने विरोधी पक्षांना पछाडले आहे.


‘अब की बार’ या घोषणेबरोबरच मोदी की गॅरेंटी या घोषणेने भाजपाने प्रचारात मुसंडी मारली आहे. आकर्षक घोषणा करून जनतेला आपल्याकडे खेचून घेणे हे भाजपाच्या प्रचाराचे नेहमीच वैशिष्ट्य राहिलेले आहे. सन २०१४च्या लोकसभा निवडणुकीत ‘अब की बार मोदी सरकार’ या घोषणेने मतदारांवर जादू केली होती. सन २०१९ च्या निवडणुकीत मोदी हैं तो मुमकीन है या घोषणेने भाजपाच्या खासदारांची संख्या तीनशेच्या पुढे नेली होती. आता २०२४ मध्ये अब की बार ४०० पार या घोषणेने विरोधी पक्षांच्या प्रचारावर भाजपाने जबरदस्त मात केली आहे.


सन २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून घोषित केले आणि दुसरीकडे काँग्रेसप्रणीत यूपीएची दहा वर्षांची कारकीर्द कशी भ्रष्टाचाराने बरबटलेली होती हे मतदारांच्या मनावर बिंबवले. सन २०१३ मध्ये मीडियातून देशपातळीवर चाललेला भ्रष्टाचार, वाढलेली बेरोजगारी व राष्ट्रीय सुरक्षेकडे झालेले दुर्लक्ष यावरून काँग्रेसवर भडीमार चालू होता. काँग्रेसला मीडिया आणि भाजपा यांनी चालवलेल्या धारदार टीकेला उत्तर देता आले नाही किंवा यूपीए सरकारवर झालेल्या आरोपाबद्दल बचावही करता आला नाही. त्यातच नरेंद्र मोदी यांच्या फोटोंच्या फलकांवर अच्छे दिन आनेवाले है, अशी घोषणा झळकू लागली त्याचा जबर फटका काँग्रेसला बसला. ५४३ जागा असलेल्या लोकसभेत भाजपाचे २८२ खासदार निवडून आल्याने ऐतिहासिक जनादेशच भाजपाला प्राप्त झाला.


सन २०१९ मध्ये भाजपाला कसे रोखायचे असा गहन प्रश्न काँग्रेससह विरोधी पक्षांना भेडसावू लागला होता. भारत व फ्रान्स दरम्यान राफेल लढाऊ विमान खरेदीत भ्रष्टाचार झाला असा आरोप काँग्रेसने केला. या व्यवहारात झालेल्या सौदेबाजीत अत्यंत चुकीच्या पद्धतीने व्यवहार झाला असा आरोप राहुल गांधी यांनी केला. आंतरराष्ट्रीय पातळीवर खरेदी व्यवहारात पारंपरिक पद्धत डावलण्यात आली असे काँग्रेस सांगू लागली. देश का चौकीदार चौर है, असा राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करून देशात व विदेशात मोठे काहूर निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधानांनी आपल्या भांडवलदारी मित्रांना अशा करारांतून लाभ मिळवून दिला, असे राहुल गांधी सांगत होते. चौकीदार चोर है, या आरोपानंतर सारा भारतीय जनता पक्ष पंतप्रधानांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. मोदींच्या लक्षावधी समर्थकांनी सोशल मीडियावर आपल्या नावापुढे मैं भी चौकीदार... असे शब्द जोडून पक्षाने एक वेगळेच शक्तीचे प्रदर्शन केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचाराची सुरुवात केली तेव्हा, भाजपाच्या मैं भी चौकीदार या मोहिमेने देश ढवळून निघाला होता. राहुल गांधींनी थेट मोदींवर चौकीदार चोर है असा आरोप केल्यानंतर मोदी शांत बसतील अशी अपेक्षाही करणे चुकीचे होते. देशातील चौकीदारांना - सुरक्षा रक्षकांना - वाॅचमेन समुदायाला काँग्रेस पक्षाने तुच्छ लेखले, त्यांचा अवमान केला असा प्रचार भाजपाने सुरू केला व चौकीदार चोर है या आरोपाचे काँग्रेसवरच बूमरँग झाले.


सन २०१९ च्या निवडणुकीत प्रचाराला सुरुवात होण्यापूर्वीच मोदी हैं तो मुमकीन है, अशी घोषणा भाजपाने दिली होती. त्या घोषणेचा मतदारांवर जबदरस्त प्रभाव पडला. त्याच वेळी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून, भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले, त्या घटनेचा मोठा लाभ निवडणुकीत भाजपाला झाला. एकीकडे विकास आणि दुसरीकडे सर्जिकल स्ट्राईक या दोन मुद्द्यांनी भाजपाच्या खासदारांच्या संख्येने त्रिशतक पूर्ण केले. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाचे ३०३ खासदार लोकसभेत निवडून आले.


आपल्या आक्रमक व प्रभावी प्रचारातून विरोधकांवर हल्लाबोल करायचे ही तर भाजपाची कला आहे. २०२४ ची निवडणूक जाहीर होण्याअगोदरपासूनच विरोधी पक्षांतील घराणेशाहीवर मोदींनी आणि भाजपाच्या नेत्यांनी जाहीर सभांतून आणि कार्यक्रमातून हल्ला चढवायला सुरुवात केली. काँग्रेससह अन्य प्रादेशिक पक्षांत नेत्यांचे नातेवाईक व सगेसोयरे यांनाच नेहमी कसे सत्तेच्या परिघात ठेवले जाते, हे मतदारांच्या मनात ठसविण्यात भाजपाला यश मिळाले आहे. मोदींनी केलेल्या घराणेशाहीवरील टीकेला बिहारमधून लालू प्रसाद यादव यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मोदींना परिवार का नाही, हे त्यांनी सांगावे अशी त्यांनी जाहीरपणे विचारणा केली. त्यावर मोदी गप्प बसतील कसे? माझा परिवार भारत देशातील १४० कोटी जनता आहे, अशा शब्दांत मोदींनी लालूजींवर तोफ डागली. एवढेच नव्हे तर भाजपाने मोदी का परिवार असे अभियान सुरू करून विरोधकांची हवाच काढून घेतली. मोदी का परिवार, या देशव्यापी मोहिमेने भाजपाने विरोधी पक्षाला गारद केले.


सन २०२४ च्या निवडणुकीत मोदी की गॅरेंटी या मोदींच्या घोषणेने विरोधी पक्ष कमालीचा अस्वस्थ आहे. मोदी की गॅरेंटीला कसे उत्तर द्यावे या मुद्द्यावरून विरोधी पक्ष अजूनही चाचपडत आहेत. मोदी की गॅरेंटी म्हणजे दिलेला शब्द पूर्ण करण्याची गॅरेंटी असे मोदी प्रत्येक प्रचार सभेत ठासून सांगत आहेत. मोदी की गॅरेंटी हा निवडणुकीतील प्रचाराचा केंद्रबिंदू बनला आहे.


मोदींच्या कारकिर्दीतच अयोध्येतील राम मंदिर उभे राहिले व पाचशे वर्षांचे भारतीय जनतेचे स्वप्न पूर्ण झाले. जम्मू-काश्मीरला सात दशके विशेषाधिकार देणारे ३७० कलम मोदी यांनीच हटवले व सरहद्दीवरील राज्याला देशाच्या मुख्य प्रवाहात आणले. गेली चार दशके संसदेत केवळ वादविवादात अडकलेले महिला आरक्षण विधेयक मोदींच्या काळातच मंजूर झाले व संसदेत व विधिमंडळात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला. तिहेरी तलाख कायदा रद्द करून मुस्लीम महिलांना फार मोठा दिलासा देण्याचे काम याच सरकारने करून दाखवले. नवी दिल्लीत भव्य व अाधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध असणारे नवीन संसद भवनही मोदी यांनीच उभारून दाखवले. पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती व छत्तीसगडला पहिले आदिवासी मुख्यमंत्री मिळाले, तेही मोदींच्या कारकिर्दीत. महाराष्ट्र किंवा बिहारमध्ये भाजपाचे सर्वाधिक आमदार असूनही मित्रपक्षाला म्हणजेच एकनाथ शिंदे व नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपद देण्याचे औदार्य दाखवले तेही मोदींनीच. म्हणूनच मोदी है तो मुमकीन है...


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशभर होत असलेल्या प्रचार सभांना लक्षावधींचा जनसागर लोटतो आहे. केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या सभा किंवा रोड शो यांना विक्रमी गर्दी दिसून आली. देशाचे आश्वासक नेतृत्व म्हणून सर्वसामान्य जनतेचा मोदींवर विश्वास वाढला आहे. नरेंद्र मोदी हे एकच नाव देशभर लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.


भाजपाचा गेल्या दहा वर्षांत लक्षणीय विस्तार झाला तो केवळ नरेंद्र मोदी या एकमेव नेतृत्वामुळेच. भारतीय जनता पक्षाच्या चोवीस वर्षांच्या इतिहासात एवढे भरीव यश मोदींचा राष्ट्रीय पातळीवर उदय होण्याच्या अगोदर कधीच मिळाले नव्हते. राम जन्मभूमी आंदोलनापासून भाजपाचा देशात विशेषत: उत्तर भारतात आलेख उंचावू लागला. पण २०१४ मध्ये लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळविण्याची करामत मोदी यांनीच करून दाखवली. २०१९ मध्ये तीनशेपेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याची जादू मोदींमुळेच शक्य झाली. आता सन २०२४ मध्ये भाजपाचे ३७० खासदार व एनडीएचे मिळून ४०० खासदार निवडून आणण्याचा संकल्प भाजपाने जाहीर केला आहे. अब की बार ४०० पार हाच नारा सर्वत्र ऐकायला मिळतो आहे. ४ जून रोजी मतदान झाल्यानंतर मोदी हे भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेण्याची हॅटट्रीक करतील हे सांगायला कोणा ज्योतिष्याची गरज नाही.


sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in


Comments
Add Comment

ग्रंथ हेच गुरू

वैभववाडी : मंदार सदाशिव चोरगे ग्रंथ कोंडून ठेवू नका, कपाटात सुरक्षित... जिथे ग्रंथ कोंडले जातात तिथे राष्ट्र

लढाऊ रेवती

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे राजेशाही आयुष्य पाहिल्यानंतर सामान्य जीवन जगण्यास आले तर कोणीही आपल्या नशिबाला दोष

व्यक्तिमत्त्व विकास

मोरपिस : पूजा काळे व्यक्तिमत्त्व विकासाच्या टप्प्यात साहित्याच्या योगदानाचा विषय महत्त्वाचा ठरतो. भाषा

अनुवादातून संवाद

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर अनुवाद हा विषय भाषिक आदान-प्रदानाशी अत्यंत जवळचा विषय आहे. भारत हा या अर्थाने अतिशय

वृद्धांचा सन्मान आणि सुरक्षितता

माध्यमांनी वृद्धांचे सकारात्मक योगदान आणि त्यांचे अनुभव प्रदर्शित करून समाजातील वृद्धांविषयीचे नकारात्मक

चव, चिकाटी आणि चैतन्याचा स्वाद

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव. देवी अन्नपूर्णा हे त्या शक्तीचं एक रूप. अन्न देणं,