Monday, July 15, 2024

मूठभर माती

युरोपला जाणार असल्याची चाहूल लागताच प्रत्येकाने काही ना काही आणण्यास सांगितले. पण आपल्याला कितीही काही वाटले तरी आपण सगळ्यांची इच्छा कधीच पूर्ण करू शकत नाही. पण तिथून आल्यावर मी ‘मूठभर माती’ चित्रकार मित्राच्या हातात देऊन हसऱ्या चेहऱ्याने आईला भेटायला जावे, असे मात्र नक्कीच वाटतेय!

प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ

बोलता बोलता बहिणीला म्हणाले,
“अगं मी युरोपला चालले.”
तिने मला विचारले,
“माझ्यासाठी काय आणशील?”
मी म्हटले,
“नक्की काहीतरी आणेन.”
“नाही, काहीतरी चालणार नाही, युरोपला चालली आहेस तर माझ्यासाठी एक ड्रेस, हॅन्डबॅग आणि परफ्युम या तीन वस्तू आण.”
“बर… बर… “ मी म्हटले

त्यानंतर ज्यांना ज्यांना ट्रीपबद्दल सांगत गेले प्रत्येकाने काही ना काही आणण्यास सांगितले किंवा अप्रत्यक्षपणे मी काही आणावे ही अपेक्षा व्यक्त केली. परदेशात किती सामान न्यायचे आणि तेथून किती आणायचे, याच्या वजनाचे गणित याचा काही मेळ जुळेना. इतक्यात मैत्रिणीचा फोन आला. तिने सांगितले की आम्ही पॅरिसला खूप सारे परफ्यूम सगळ्यांसाठी खरेदी केले. चकचकीत दुकान, परफ्यूमचा मनभावन सुगंध आणि त्यात आमच्या टुरिस्ट गाईडने सांगितले की, याच्याइतके चांगले आणि स्वस्त दुसरे कोणतेही दुकान नाही. पॅरिसला पहिल्यांदाच गेलो होतो. त्यामुळे जो गाईड नियमित जातो त्याच्यावर विश्वास ठेवून खरेदी केले आणि मुंबईत आल्यावर पाहिले की प्रत्येक बाटलीखाली बारीक अक्षरांमध्ये ‘मेड इन इंडिया’ लिहिलेले होते. त्यामुळे पंचायत अशी झाली की कोणाला द्यावे तर कसे द्यावे आणि न द्यावे तर इतक्या परफ्युमचे करावे काय?

मैत्रिणीच्या या वक्तव्यातून एक धडा घेतला की कोणासाठी काही आणायचे नाही!
याप्रसंगी मला एक महत्त्वाची गोष्ट आठवत आहे. आमचे लग्न झाले तेव्हा काश्मीरला गेलो होतो. तिथे गेल्यावर इतके ढिगाने अक्रोड पहिल्यांदाच पाहिले. आपल्या मुंबईत सर्वात स्वस्त पदार्थ म्हणून चुरमुऱ्यांचे पोते नाही का दुकानाच्या सर्वात बाहेरच्या बाजूला ठेवलेले असते. एखाद्याने एखादी मूठ खाल्ले तरी दुकानदाराला फारसा फरक पडत नाही. त्याप्रमाणे ही अक्रोडची पोती अगदी दुकानाच्या शेवटच्या खालच्या पायरीपर्यंत ठेवलेली होती. फक्त चौकशीसाठी गेलो तरी दहा पोत्यांमधले दहा अक्रोड तरी प्रत्येक दुकानदार खाऊ घालत होता. त्यामुळे साहजिकच आम्ही अक्रोडची दोन छोटी पोती विकत घेतलीच. बाजूच्या दुकानात अत्यंत आकर्षक असलेला अक्रोड फोडायचा अडकित्तासुद्धा विकत घेतला. घरी आल्यावर नवऱ्याने पहिलाच अक्रोड फोडला. अक्रोड फुटला की नाही आठवत नाही पण अडकित्ता मात्र तुटला. आता अडकित्ता काय फेव्हिस्टिक लावून जोडता येतो? त्याच्या पावतीसहित त्याच बॉक्समध्ये अडकित्ता छान ठेवून दिला.

वीस-पंचवीस वर्षे उलटून गेली. कश्मीरवरून जेवढे अक्रोड आणले होते त्याच्या अर्धेसुद्धा या पंचवीस वर्षांत खाल्ले नसतील. कोणतेही सामान शोधताना अडकित्ता दिसायचा आणि जीव हळहळायचा. या पंचवीस वर्षात अडकित्तावाल्याचे दुकान शिल्लक होते की नाही माहीत नाही पण आमच्याकडे मात्र तो तुटलेला अडकित्ता ठेवलेला होता. दरम्यान मुलगी मोठी झाली. घरातले बरेच सामान तिने कमी केले. तिच्या शब्दात ‘Please discard this’ करत एके दिवशी अडकित्ताचाही नंबर आला. असो. तेव्हा ठरवले अशा ठिकाणाहून वस्तू आणायच्याच नाहीत की ज्या तुटल्या-फुटल्या, खराब झाल्या तर बदलणे मुश्कील होऊन जाईल.

एका चित्रकार मित्राचा फोन आला. त्याला युरोप टूरबद्दल सांगितले तेव्हा तो पटकन म्हणाला,
“माझ्यासाठी एक गोष्ट करशील?”
इतके अनुभव पाठीशी असताना, ‘हो म्हणावे की नाही’ या संभ्रमात मी होते. तरीही त्याला म्हटले, “जमल्यास…”
तो शांतपणे म्हणाला,
“पॅरिसमध्ये Van Gogh (व्हिन्सेंट विल्हेम व्हॅन घो) ची कबर आहे. ऑव्हर्स-सुर-ओइस, पॅरिसच्या उत्तरेस ३० किलोमीटर अंतरावर त्याचे गाव आहे. येथून माझ्यासाठी मुठभर माती आणशील का?”
मी निशब्द झाले. मला माहीत नाही युरोप टूरमध्ये यासाठी आम्ही त्या ठिकाणाला भेट देऊ शकू की नाही.
युरोपला जाण्याआधी आईचा निरोप घ्यावा म्हणून तिच्याकडे गेले.
तिला विचारले,
“आई तुझ्यासाठी काय आणू गं?”
ती म्हणाली,
“नीट जा. खूप खूप मजा कर आणि आनंदाने आणि व्यवस्थित परत ये.
बस इतकंच!”
आपल्याला कितीही काही वाटले तरी आपण सगळ्यांची इच्छा कधीच पूर्ण करू शकत नाही. पण तिथून आल्यावर मी ‘मूठभर माती’ मित्राच्या हातात देऊन हसऱ्या चेहऱ्याने आईला भेटायला जावे, असे मात्र नक्कीच वाटतेय!

pratibha.saraph@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -