
मुंबई ते थिवि दरम्यान ३२ अतिरिक्त रेल्वेची घोषणा; आरक्षणास सुरुवात
मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्ट्या (Summer Vacation) पडताच अनेक जण आपले कुटुंब आणि मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जातात. अधिकतर गावी कोकणात जाण्याचा बेत आखतात. सुट्टया सुरू झाल्यामुळे कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांमुळे होणाऱ्या गर्दीचा विचार करता मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवि दरम्यान ३२ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या (mumbai thivi summer special trains) चालविण्याची घोषणा केली आहे. उन्हाळी विशेष गाड्या चालू केल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तसेच गर्दीतून प्रवस करण्याची चिंताही दूर होणार आहे. यापूर्वी मध्य रेल्वेने २५८ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. त्यामुळे आता उन्हाळी विशेष गाड्यांची संख्या २९० गाड्यांवर पोहचली आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, एलटीटी -थिवि- एलटीटी वातानुकूलित साप्ताहिक विशेष १६ फेऱ्या असणार आहेत. ट्रेन क्रमांक 01187 वातानुकूलित साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून १८ एप्रिल २०२४ ते ६ जून २०२४ पर्यंत दर गुरुवारी रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९.५० वाजता थिवि येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01188 वातानुकूलित साप्ताहिक विशेष थिवि येथून १९ एप्रिल २०२४ ते ७ जून २०२४ पर्यंत दर शुक्रवारी संध्याकाळी ४.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी पहाटे ३.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01129 सेकंड सीटिंग विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून २० एप्रिल २०२४ ते ८ जून २०२४ पर्यंत दर शनिवारी रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.५० वाजता थिवि येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01130 सेकंड सीटिंग विशेष थिवि येथून २१ एप्रिल २०२४ ते ९ जून २०२४ पर्यंत दर रविवारी संध्याकाळी ४.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
आरक्षणास आजपासून सुरुवात
या उन्हाळी विशेष गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकांवर थांबणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवि दरम्यान ३२ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे गाड्याचे आरक्षण आजपासून भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उघडणार आहे.