Wednesday, March 19, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्सएका नाट्यसंस्थेचे ‘अभिजात’ पुनरुज्जीवित होणे...!

एका नाट्यसंस्थेचे ‘अभिजात’ पुनरुज्जीवित होणे…!

राजरंग – राज चिंचणकर

मराठी रंगभूमीवर गाजलेल्या, पण नंतरच्या काळात पडद्याआड गेलेल्या अनेक नाट्यकृती पुनरुज्जीवित होत रसिकांचे नव्याने मनोरंजन करण्यास सिद्ध होत असतात. काळाच्या ओघात अनेक नाट्यसंस्थांवरही पडदा पडल्याचे दिसते. बंद पडलेल्या अशा काही नाट्यसंस्था पुन्हा सुरू झाल्याची उदाहरणे तशी कमीच आहेत. पण एक काळ रंगभूमी गाजवलेले नाट्यनिर्माते अनंत काणे यांची ‘अभिजात’ ही नाट्यसंस्था मात्र रसिकांच्या सेवेत पुन्हा रुजू होणार असल्याचे आता संकेत मिळत आहेत.

‘गहिरे रंग’, ‘धुक्यात हरवली वाट’, ‘गुंतता हृदय हे’, ‘हसत हसत फसवूनी’, ‘सूर राहू दे’, ‘मन पाखरू पाखरू’, ‘गुलाम’, ‘मला भेट हवी हो’, ‘सुरुंग’, ‘वर्षाव’, ‘रेशीम धागे’ या आणि अशा अनेक नाट्यकृती देणारी संस्था म्हणून ‘अभिजात’ नाट्यसंस्थेची मराठी नाट्यसृष्टीत ओळख आहे. नाट्यनिर्माते अनंत काणे यांनी या संस्थेद्वारे अनेक रसिकप्रिय अशी नाटके रंगभूमीवर आणली आणि रसिकांनीही या नाटकांना उदंड प्रतिसाद दिला. अनंत काणे यांनी १३ ऑक्टोबर १९६९ रोजी या संस्थेची स्थापना केली होती. ही नाट्यसंस्था यंदा ५५ वर्षे पूर्ण करत आहे. अनेक गाजलेल्या नाट्यकृती या नाट्यसंस्थेने रंगभूमीवर सादर केल्या. पण, सन २००१ मध्ये अनंत काणे यांचे निधन झाले आणि या नाट्यसंस्थेवर पडदा पडला.

‘अभिजात’ नाट्यसंस्थेच्या बहुतांश नाटकांचे लेखक शं.ना.नवरे होते; तर नंदकुमार रावते हे या नाटकांचे दिग्दर्शक होते. ‘अभिजात’ नाट्यसंस्थेच्या नाटकांतून अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ रंगकर्मींनी भूमिका रंगवल्या आहेत. डॉ. काशिनाथ घाणेकर, सतीश दुभाषी, राजा मयेकर, आत्माराम भेंडे, बबन प्रभू, श्रीकांत मोघे, यशवंत दत्त, शंकर घाणेकर, रमेश देव, कमलाकर सोनटक्के, रवींद्र मंकणी, राजा बापट, कमलाकर सारंग, सुधीर दळवी, चंदू डेग्वेकर, अनंत मिराशी, श्याम पोंक्षे, शांता जोग, सुमन धर्माधिकारी, आशा काळे, सुहास जोशी, भावना, मालती पेंढारकर, रजनी जोशी, आशालता, नीना कुळकर्णी, आशा पोतदार, पद्मा चव्हाण, संजीवनी बिडकर या आणि अशा अनेक कलाकारांनी ‘अभिजात’ची नाटके गाजवली आहेत. ‘अभिजात’च्या सुरुवातीपासूनच सर्व नाटकांचे नेपथ्य व प्रकाशयोजना बाबा पार्सेकर यांनी, तर पार्श्वसंगीताची धुरा अरविंद मयेकर यांनी सांभाळली होती. ‘अभिजात’चा वर्धापनदिनही दरवर्षी उत्साहात साजरा व्हायचा. या सोहळ्यात पं. जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर, छोटा गंधर्व, शोभा गुर्टू, परवीन सुलताना अशा अनेक नामवंत गायकांची उपस्थिती असायची. मागच्या पिढीतील रसिकांनी ‘अभिजात’च्या अशा अनेक आठवणी हृदयात जपून ठेवल्या आहेत.

अलीकडेच, दादरच्या श्री शिवाजी मंदिरात ‘बोलीभाषा’ एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी आयोजित करण्यात होती. या स्पर्धेतले काही पुरस्कार अनंत काणे यांच्या नावाने देण्यात आले होते. यावेळी अनंत काणे यांचे सुपुत्र कैवल्य काणे आणि ‘अभिजात’ नाट्यसंस्थेचे व्यवस्थापक म्हणून दहा वर्षे ज्यांनी धुरा सांभाळली ते दीपक सावंत त्यावेळी तिथे उपस्थित होते. यावेळी कैवल्य काणे यांनी, ‘अभिजात’ नाट्यसंस्थेतर्फे नाट्यविषयक उपक्रम राबवण्याचे सूतोवाच दीपक सावंत यांच्याकडे केले. या पार्श्वभूमीवर, अनंत काणे यांची पत्नी सुनीती; तसेच त्यांचे सुपुत्र कैवल्य व आदित्य यांनी ‘अभिजात’तर्फे दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत, अशी इच्छा दीपक सावंत यांनी आता व्यक्त केली आहे. परिणामी, एक काळ मराठी रंगभूमी गाजवलेली ही नाट्यसंस्था पुन्हा रसिकांच्या दरबारात लवकरच रुजू होईल, अशी आशा आहे. नाट्यरसिकांच्या मनात ‘अभिजात’च्या नाट्यकृतींनी अढळ स्थान प्राप्त केलेले आहे आणि या नाट्यसंस्थेवरचा पडदा नजीकच्या काळात नक्कीच उघडला जाईल, अशी चर्चा नाट्यसृष्टीत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -