
लहान मोठ्यांना हसवायला 'आज्जीबाई जोरात' नाटक येणार रंगभूमीवर
अभिनय बेर्डे करणार व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण
मुंबई : उन्हाळ्याची सुट्टी (Summer vacation) पडली की पालक आपल्या मुलांना घेऊन मामाच्या गावी जाण्यासोबतच प्रदर्शने, संग्रहालये, गार्डन्स, बालनाट्य (Children's play) पाहणं अशा ठिकाणी जाणंही पसंत करतात. त्यातच आता उन्हाळ्याच्या सुटीत धमाल उडवायला पहिलं AI महाबालनाट्य प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लहान मोठ्यांना हसवायला 'आज्जीबाई जोरात' (Ajjibai Jorat) हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर (Commercial Theatre) येणार आहे. ३० एप्रिलला या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे होणार आहे.
सध्या या नाटकाच्या तालमी सुरु असून ३० एप्रिल २०२४ ला या नाटकाचा पहिला प्रयोग पार पडणार आहे. क्षितिज पटवर्धननने या नाटकाचं लेखन दिग्दर्शन केलं असून हे पहिलं AI महाबालनाट्य असणार आहे. या बालनाट्यात मुग्धा गोडबोले, जयवंत वाडकर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. तर अभिनेत्री निर्मिती सावंत या आजीच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेता पुष्कर श्रोत्री हा सुद्धा एका अतरंगी भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यासोबतच सिद्धेश पुजारे आणि सुकन्या यांच्याही या नाटकात भूमिका आहेत. शिवाय या नाटकात ११ नर्तक आहेत.
'आज्जीबाई जोरात' या नाटकातून अभिनेता अभिनय बेर्डे (Abhinay Berde) व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. सोशल मीडियावर या नाटकाचे पोस्टर शेअर करत त्याने ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. आताची तरुण पिढी आणि त्यांचे पालक यांच्यावर आधारित हे नाटक असल्याचं म्हटलं जात आहे. "तुम्हा प्रेक्षकांच्या प्रेमाने आणि आईबाबांच्या आशीर्वादाने आज नाटकात पहिलं पाऊल टाकतोय! माझं पाहिलं व्यावसायिक मराठी नाटक, आज्जीबाई जोरात!" असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे.
View this post on Instagram
३० एप्रिल २०२४ ला मंगळवारी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्लेमध्ये या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पार पडणार आहे. सकाळी ११ आणि दुपारी ४ वाजता असे दोन प्रयोग असतील. जिगीषा आणि अष्टविनायक यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. यानंतर १ मे, ३ मे आणि ४ मे रोजी या नाटकाचे प्रयोग होणार आहेत.