भालचंद्र कुबल – पाचवा वेद
गालिब हे नाटक बायोपिक प्राॅडक्ट नाही. आजवरच्या जवळपास प्रत्येक नाट्यसमीक्षकांनी या नाटकाची कथा सांगून या नाटकातला “चार्म” घालवून टाकला आहे. वाचकांना नाटकाचे कथानक समीक्षेमध्ये लागतेच असे या तमाम समीक्षावादी स्तंभलेखकांचा दावा आहे, अन्यथा “वाचकांचे रूपांतर प्रेक्षकांमध्ये होत नाही” हा अजून एक कुरवाळलेला गैरसमज. या वाचक टू प्रेक्षक, प्रक्रियेत छापून आलेली वृत्तपत्रीय नाट्यसमीक्षा मेजर रोल अदा करते, हा आणि एक अपसमज. एका ख्यातनाम समीक्षाकाराचे (समीक्षकाचे नाही) हे मत ऐकल्यानंतर या माझ्या तुटपुंज्या लिखाणाला मी नाट्यनिरीक्षण म्हणायचे ठरवलेलेच आहे. तर विषय असा आहे की, गालिब अद्यापही सर्वसामान्य मराठी लोकांपर्यंत पोचलेलाच नाही तर ते महत्कर्म पार पाडायला मराठी साहित्यात तो झिरपायला हवा, तसेही काही झालेले दिसत नाही. नव्या पिढीचे गज़लकार मात्र गालिबशी दोस्ती करून आहेत. शैक्षणिक पाठ्यपुस्तकातून जेवढा मिर्झा गालिब यायला हवा होता, त्याच्या एक शतांशही अभ्यासला जात नाही किंवा गेला नाही. तेव्हा अख्ख्या गालिबचा जीवनपट नाटकातून उभा करायचा म्हणजे तशी रिस्कच. पण असा पूर्वग्रह मनात ठेवून हे नाटक बघणे म्हणजे एक सुखद धक्काच आहे. तसे नाटकात अनेक सुखद धक्के आहेत; परंतु एका लेखकाच्या अपूर्ण लेखनकृतीची पूर्ततेकडे नेणारी इटरेस्टिंग वाटचाल म्हणजे “गालिब” ही नाट्याकृती होय.
एखाद्या साहित्यकृतीचा प्रवास नेमका कसा असतो, त्या लेखकाच्या प्रसूतीवेदना कशा असतात, त्याला समाज मान्यता जरी असली तरी त्यातल्या इनर डिफिकल्टीज तो लेखकच अनुभवत असतो. एकदा तो विषयात गुरफटला की तो केवळ आणि केवळ त्या विषयाचाच होऊन जातो. हा अनुभव ज्यांनी लेखन प्रवृत्ती जोपासलीय त्यांनाच येऊ शकतो. अशातच त्या लेखकाचे दुर्दैवी निधन झाले, तर सारी प्रक्रियाच थांबते. तो विषय त्या लेखकाबरोबरच लोप पावतो. परंतु त्याच्या पश्चात ती प्रक्रिया ज्याने कुणी जवळून पाहिलीय तो फ्रस्ट्रेट होतो आणि हे फ्रस्ट्रेशन सकारात्मकतेकडे नेण्याचा प्रवास म्हणजे “गालिब” आहे, हे पाहिल्यांतरचं माझं पहिलं निरीक्षण आहे. जवळपास अशाच एका धर्तीचं नाटक मागील वर्षी “३८ कृष्णा व्हिला” या नावाने मंचावर आले होते. वरवर बघता दोन्ही नाटकांची नाट्यबीजे भिन्न आहेत; परंतु लेखकाची मनःस्थिती व्यक्त करण्याचा डिव्हाईस मात्र स्त्रीच आहे. एकिकडे मुलगी तर दुसरीकडे बायको. दोन्ही लेखक आजारपणामुळे समाजाशी असलेला व्यवहार (काँटॅक्ट या अर्थी) गमावून बसलेले. त्यामुळे लेखकाची लेखन तळमळ व्यक्त करण्यासाठी वापरण्यात आलेले दोन्ही नाटकातील “स्त्री” डिव्हाईस अत्यंत चपखलपणे वापरले गेलेत आणि त्याबद्दल चिन्मय मांडलेकरांचे अभिनंदन लेखक म्हणून करायलाच हवे. सुखांशी भांडतो आम्ही किंवा बेचकी या दोन्ही नाटकांपेक्षा या नाटकाचा कॅनव्हास प्रचंड वेगळा आणि असिमित आहे. अगदी बारकाईने अभ्यासल्यास यातील भाष्य कधी अध्यात्माकडे घेऊन जाते तर कधी व्यावहारिक बनते. अशा दोन परस्पर विरोधी टोकांवर ज्यावेळी नाटकातील पात्रे वावरतात, त्यावेळी कथाबीजाचा केंद्रबिंदू सरकण्याची भीती असते. मांडलेकर संकल्पनेच्या केंद्रबिंदूला जराही सरकू देत नाहीत हे या नाट्यलेखनाचे वैशिष्ट्य आहे. नाटकात मराठी वाड्मयीन भाषेचा वापर इतका सहज सुलभ आहे की, मिर्झा गालिबचे शेर कळणार नाहीत; मात्र त्याच्या विश्लेषणातून गालिब आणि प्रकर्षाने मानव किर्लोस्कर नामक नाटकातील पात्र कळण्यास मदत होते. चिन्मय मांडलेकर हे अभ्यासू लेखक आहेत, जे त्यांनी या अगोदरच आपल्या साहित्यकृतींमधून सिद्ध केलेच आहे. प्लाॅट, कॅरेक्टरायझेन, कंन्फ्लिक्ट आणि क्लायमॅक्सच गणित; मात्र त्यांच्या इतर नाटकांच्या तुलनेत या नाटकात सरस ठरले आहे.
नाटकात पोस्टकोविड ट्रेंडनुसार चार पात्रेच आहेत. इला, रेवा, अंगद आणि मानव किर्लोस्कर. पैकी नाट्यमयता उलगडण्याची जबाबदारी अंगद आणि इला या दोन पात्रांची आहे. या दोघांची संवादातून इला व रेवाचा साहित्यिक बाप मानव किर्लोस्कर आणि त्याची ड्रीम प्रोजेक्ट असलेली “गालिब” नावाची चरित्रात्मक कादंबरी उलगडत उलगडत गुढतेकडे घेऊन घेऊन जाते. इलाची भूमिका करणाऱ्या गौतमी देशपांडे आणि अंगदची भूमिका साकारणारे विराजस कुलकर्णी आपली भूमिका पार पाडताना एनेस्डीयन दिग्दर्शकाला फाॅलो करतायत, हे सराईत नाट्यनिरीक्षणात कळून चुकते. अर्थात देशपांडे-कुलकर्णी जोडीचे हे पहिलेच नाटक असल्याने स्वतःचे असे सात्विक अभिनयाचे (एक्सप्रेशनिझमचे) दर्शन घडते, ते पहिल्या चार-पाच रांगापुरतेच सिमीत राहाते. मालिका करणाऱ्या कलाकारांचा हाच एक प्राॅब्लेम नेहमी अधोरेखित होत असतो. एक्सप्रेशन्स पोचवायला आंगिक अभिनयाचा वापर कसा करायचा याचा क्लास मांडलेकरांनी नक्की घेतला असणार; परंतु अंधूक प्रकाशरेषेतील अभिनय शेवटच्या रांगेतील तिकीट काढून नाटक बघणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत पोचला पाहिजे याचे भान सर्वच नटांनी बाळगावे म्हणजे “गालिब” पोहोचेल असे अजून एक नाट्यनिरीक्षण जाता नमूद करावेसे वाटते. गुरुराज अवधानी आणि अश्विनी जोशी यांची योग्य साथ नाटकाच्या प्रोटोगाॅनिस्टना मिळाली आहे. प्रकाश योजना आणि नेपथ्य हे रंगसंगतीनुसार लो की (Low key) फॅक्टर असल्याने नटांना आणि दिग्दर्शकाला प्रदीप मुळ्ये यांनी आव्हान पेरून ठेवले आहे. मध्यंतरी या नाटकाचे यु ट्युबवरचे “चलत नाट्यसमीक्षण” बघायला मिळाले. मुलाखत घेणाऱ्या अँकरने मांडलेकरांना आपल्या बौद्धिक कुवतेनुसार प्रश्न विचारला की, “या नाटकाचा यूएसपी काय सांगाल?” (म्हणजे लोकांनी हे नाटक का बघावं?) यावर मांडलेकरांनी जी कानशिलात लगावली आहे, ती माझेही डोळे उघडणारी आहे. ते म्हणाले “माझ्या या “गालिब” नाटकात नेपथ्यात असलेले कारंज, ते बघण्यासारखं आहे” इतके सुंदर उपरोधिक भाष्य एखाद्या सच्च्या रंगकर्मीलाच सुचू शकते. नमक हराम चित्रपटामधील एका गीतात एका शायराची व्यथा मांडताना गुलजार लिहितात, “मेरे घरसे तुमको एक दीवान मिलेगा” हा दीवान (ग्रंथ) कित्येक वर्षांनी या नाटकात मला सापडल्याचा आनंद होतो आहे. पोस्टकोविड काळानंतर जन्माला येणारी नाटकं अत्यंत आशयघन आहेत’. “गालिब” हे त्यापैकीच एक आहे असे माझे या लेखातील अंतिम नाट्यनिरीक्षण सांगते.