
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांची टीका; शरद पवारांना 'ते' वक्तव्य भोवणार!
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar) असा संघर्ष दिवसेंदिवस वाढीस लागला आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर दोन्ही गटांचे नेते एकमेकांवर सडकून टीका करताना दिसतात. त्यातच शरद पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे अजित पवार गटाचे नेते चांगलेच संतापले आहेत. 'मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे', असं वक्तव्य करून शरद पवारांनी वाद ओढावून घेतला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर 'शरद पवारांनी महाराष्ट्रातील सुनांचा अपमान केला!' अशी टीका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील (Anil Patil) यांनी केली आहे.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातर्फे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना बारामतीतून लोकसभेची (Baramati Loksabha) उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात बारामतीत शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) निवडणुकीसाठी उभ्या आहेत. त्यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. यासाठी बारामतीकरांसमोर सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना अजित पवार म्हणाले होते की, “तुम्ही आधी साहेबांना मतदान केलं, त्यानंतर मुलाला म्हणजेच मला मतदान केलं. नंतर मुलीला मतदान केलं. आता सुनेला मतदान करा म्हणजे तुम्हाला पवारांना मतदान केल्याचं समाधान मिळेल.”
अजित पवारांच्या या वक्तव्यावर शरद पवारांनी केलेलं वक्तव्य सध्या वादाचा विषय ठरलं आहे. 'मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे', असं शरद पवार म्हणाले. त्यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नसलं तरी त्यांचा रोख सुनेत्रा पवारांकडे होता असं म्हटलं जात आहे. याविषयी अनिल पाटील यांनी टीका केली आहे.
काय म्हणाले अनिल पाटील?
अनिल पाटील म्हणाले की, “मुळात या वक्तव्याचे समर्थन कोणीच करू शकत नाही. सुना या बाहेरून आलेल्या असल्या तरी त्यांना लेकीप्रमाणे वागवलं पाहिजे हे वक्तव्य अपेक्षित आहे. पुत्रप्रेम राहिलं नाही म्हणून सुनेला तिरस्काराची भावना येत असेल तर असं वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे कोणीच करू शकत नाही. त्यांनी महाराष्ट्रातील सुनांचा अपमान केला”, असंही अनिल पाटील म्हणाले.