Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीराजकीय

Sangli Loksabha : अखेर सांगलीत काँग्रेसला धक्का देत विशाल पाटलांची बंडखोरी!

Sangli Loksabha : अखेर सांगलीत काँग्रेसला धक्का देत विशाल पाटलांची बंडखोरी!

मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा ठराव; तर नाना पटोलेंच्या दौऱ्यावर बहिष्कार


सांगलीची जागा न मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक


सांगली : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) महाविकास आघाडीसाठी (Mahavikas Aghadi) सांगलीची (Sangli) जागा वादाचा विषय ठरली. या जागेवर ठाकरे गटाने (Thackeray Group) परस्पर उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेसमध्ये कमालीची नाराजी पसरली. या नाराजीतूनच काँग्रेस नेते वेगळी भूमिका घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. ही शक्यता खरी ठरली असून जागावाटप जाहीर झाल्यानंतर काही काळ नॉट रिचेबल असलेल्या विशाल पाटील (Vishal Patil) यांनी अपक्ष उमेदवारीचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे सांगलीत हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे.


विशाल पाटील यांच्या स्वीय सहायकाने त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडे वारंवार उमेदवारी मागणारे विशाल पाटील यांनी सांगलीमध्ये अखेर काँग्रेसविरोधात बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. विशाल पाटील हे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवणार आहेत. असे असले तरी देखील काँग्रेसकडून तिकीट मागण्यावर देखील ते अद्याप ठाम आहेत.


काँग्रेसने सांगलीत उमेदवारी न दिल्यास विशाल पाटील यांचे सर्व समर्थक राजीनामे देणार आहेत. तसेच, आता विशाल पाटील यांच्या स्वीय सहाय्यकाने पाच उमेदवारी अर्ज घेतल्याने विशाल पाटील यांची बंडखोरी निश्चित झाली आहे. तसेच, वसंतदादा आघाडी नावाने विशाल पाटील हे आघाडी देखील स्थापन करणार असून त्यांच्या नावाने देखील स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.



सोमवारी अर्ज दाखल करणार


विशाल पाटील हे आज अर्ज दाखल करणार होते. परंतु तांत्रिक कारणामुळे ते सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत. सांगलीची जागा ही ठाकरे गटाकडे गेल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी हे प्रचंड नाराज आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक लढायची असा निर्धारच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे.



मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा ठराव


सांगलीची जागा काँग्रेसला न मिळाल्याने काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी फेरविचार करण्याचा सल्ला महाविकास आघाडीला दिला असतानाच आता कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विशाल पाटील यांना काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यामुळे सांगली काँग्रेसमध्ये पहिली वादाची ठिणगी पडली आहे. मिरज तालुका काँग्रेस कमिटी आजपासून बरखास्त करण्याचा ठराव काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. सांगलीमधील विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या मिरज तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सर्व तालुक्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आक्रमक भूमिका काँग्रेस पदाधिकारी घेण्याची चिन्हे आहेत.



नाना पटोलेंच्या दौऱ्यावर बहिष्कार घालण्याची काँग्रेस नेत्यांची भूमिका


सांगलीमध्ये आज काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची तालुका न्याय बैठक आज पार पडली आहे. या बैठकीमध्ये लढण्याची भूमिका विशाल पाटील यांनी घ्यावी, अशी आग्रहाची मागणी काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचा दौरा आहे. या दौऱ्यावर काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी बहिष्कार घालावा. कारण, त्यांनी उमेदवारी मागण्यासाठी आग्रही भूमिका घेतली नाही, असा आरोप काँग्रेस पदाधिकारी करत आहेत.

Comments
Add Comment