Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीठाणे

Thane Railway Station: ठाणे रेल्वेस्थानकावर तुफान गर्दी; प्रवाशांचा जीव टांगणीला

Thane Railway Station: ठाणे रेल्वेस्थानकावर तुफान गर्दी; प्रवाशांचा जीव टांगणीला

दररोज तब्बल पाच लाखाहून अधिक प्रवासी


ठाणे : मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुख्य मार्गावरील ठाणे हे प्रमुख स्थानक आहे. ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या या ठाणे रेल्वेस्थानकावर दिवसेंदिवस गर्दीत वाढ होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवासी संख्येत ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कामाला येण्या-जाण्याच्या धावपळीत रेल्वे स्थानकावर लोकांची तुफान गर्दी झाली असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.


मध्य रेल्वेमधील ठाणे रेल्वे स्थानकावरून सीएसएमटी ते डोंबिवली, कल्याण, कसारा, खोपोली याकरीता धिमी व जलद लोकल या मार्गावरुन ये-जा करतात. अप-डाऊन दोन्ही मार्गावर मेल एक्सप्रेस धावतात. तसेच हार्बर मार्गावरील वाशी-नेरुळ-पनवेल दरम्यानही वाहतूक होते. त्यामुळे ठाणे स्थानकावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सीएसएमटी ते खोपोली-कसारा दरम्यान सर्वाधिक गर्दीच्या १० स्थानकात ठाणे हे पहिल्या क्रमांकावर आहे.


ठाणे स्थानकातील प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर उभे राहता यावे यासाठी रेल्वेने स्थानकावरील स्टॉल हटवण्यास सांगितले. मात्र तरीही प्रवाशांना धावपळीत तुफान गर्दीचा सामना करावा लागत आहे. रेल्वे पकडणे किंवा उतरण्यासाठी प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा लोकलच्या गर्दीचे लोक हकनाक बळी ठरत आहेत. याशिवाय लोकलमधील गर्दीमुळे तोल जाण्याच्या वाढत्या घटनांमुळे प्रवाशांची चिंता वाढत आहे.



कळवा-ऐरोली एलिव्हेटेड प्रकल्पात अजूनही खंड


ठाणे स्थानकातील गर्दीचे विभाजन करण्यासाठी मुंबई विकास महामंडळाने एमयूटीपी अंतर्गत कळवा-ऐरोली एलिव्हेटेड प्रकल्प मंजूर करुन घेतला होता. त्यामुळे कल्याणवरून थेट नवीमुंबईला पोहोचणे शक्य होणार होते. मात्र कळव्यातील प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे हा प्रकल्प अजूनही रखडला आहे.


Comments
Add Comment