‘त्या’ दोन कारणांमुळे शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी
हरियाणा : हरियाणातील (Haryana) महेंद्रगडच्या उन्हानी गावात काल सकाळच्या सुमारास ४० विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली स्कूलबस उलटल्याने भीषण अपघात (School Bus accident) झाला. यामध्ये ६ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १५ विद्यार्थी जखमी झाले. या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या गाडीचा चालक गाडी चालवताना मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समजले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे स्थानिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच शाळेच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
स्कूलबसचा ड्रायव्हर हा दारुच्या नशेत धुंद होता, स्थानिकांनी त्याला अडवण्याचा, बसची चावीही काढण्याचा प्रयत्न केला पण शाळेच्या चुकीमुळेच हा अपघात घडला असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, शाळेच्या आवारातून जेव्हा ही बस निघणार होती तेव्हा बसचा ड्रायव्हर धर्मेंदर हा दारुच्या नशेत होता. त्यामुळं स्थानिकांनी त्याला रोखताना त्याच्या बसची चावीही काढून घेतली. पण शाळा प्रशासनाने ग्रामस्थांना चावी पुन्हा धर्मेंदरला देण्यास सांगितली तसेच पुढच्यावेळी नवा ड्रायव्हर पाठवू असं सांगितलं.
यानंतर बस काही अंतरावरच गेल्यानंतर ड्रायव्हरने बसवरील नियंत्रण गमावलं आणि ही बस वेगाने बाजूच्या झाडावर जाऊन आदळली. या बसमधून जीएल पब्लिक स्कूलचे ४० विद्यार्थी प्रवास करत होते. धडकेनंतर ही बस उलटली, त्यामुळे बसचा पार चक्काचूर झाला आणि या बसमध्ये असलेल्या ६ चिमुकल्यांना आपले प्राण गमवावे लागले.
‘त्या’ दोन कारणांमुळे शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी
दरम्यान, केवळ ग्रामस्थच नव्हे तर काही पालकांनी देखील या ड्रायव्हरच्या दारु पिण्याच्या सवयीबद्दल शाळा प्रशासनाकडे तक्रार केली होती. पण तरीही शाळेने ही बाब गांभीर्याने न घेता त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचं समोर आलं आहे.
याशिवाय, गुरुवारी देशभरात रमजान ईद निमित्त शाळांना सुट्टी होती. तरीही जीएल पब्लिक स्कूलनं शाळा सुरु ठेवल्याने या शाळेवर संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. याप्रकरणी महेंद्रगडच्या उपायुक्त मोनिका गुप्ता यांनी जल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला की, ईदची सुट्टी असतानाही ही शाळा सुरु ठेवल्याने राज्य सरकारने या शाळेची मान्यता रद्द करावी.
तिघांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये ड्रायव्हर धर्मेंदरसह शाळेच्या मुख्याध्यापिका दिप्ती आणि एक अधिकारी होशियार सिंह यांचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितलं की, अपघातस्थळावरुन धर्मेंदर याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्या वैद्यकीय तपासणीत तो दारुच्या नशेत असल्याचं स्पष्ट झालं आहे.