खुद्द बाबासाहेब आले तरी ते संविधान संपवू शकत नाहीत : पंतप्रधान मोदी
उधमपुर : जम्मू-काश्मीरमध्येही (Jammu Kashmir) विधानसभा निवडणुका (Vidhansabha Elections) होतील, केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका होतील, ती वेळ आता दूर नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले. त्याला राज्याचा दर्जा परत मिळेल. तुम्ही तुमची स्वप्ने तुमच्या आमदार आणि मंत्र्यांसोबत शेअर करू शकाल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Elections) जोरदार प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी प्रचारासाठी उधमपूरला पोहोचले. त्यावेळी झालेल्या सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते.
जम्मू-काश्मीरमध्ये दशकांनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे, जेव्हा दहशतवाद, फुटीरतावाद, दगडफेक, सीमेपलीकडून गोळीबार असे कोणतेही मुद्दे नाहीत, असे सांगत पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ‘कमकुवत काँग्रेस सरकारने शाहपूर कंडी धरण १० वर्षे प्रलंबित ठेवले. त्यामुळे जम्मूतील गावे कोरडी पडली होती. १० वर्षात आम्ही दहशतवादी आणि भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई केली आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जम्मू-काश्मीरचे मन बदलत असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.
काँग्रेस म्हणते की, राम मंदिर हा भाजपसाठी निवडणुकीचा मुद्दा आहे. राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा नव्हता, नाही आणि राहणारही नाही. भाजपचा जन्म होण्यापूर्वीपासून राम मंदिराचा संघर्ष सुरू होता. राम मंदिराचा संघर्ष ५०० वर्षे जुना आहे, तेव्हा निवडणुकांचा मागमूसही नव्हता. जम्मू-काश्मीरमध्ये आता शाळा जाळल्या जात नाहीत, त्या बांधल्या जातात, असे पंतप्रधान म्हणाले.
तुमच्या आशीर्वादाने मोदींनी ३७० चा ढिगारा जमिनीत गाडला आहे. मी काँग्रेसला ३७० परत आणण्याचे आव्हान देतो. जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेसाठी ३७० ची भिंत बांधण्यात आली आहे. आज दहशतवाद, सीमेपलीकडून गोळीबार, दगडफेक हे या निवडणुकीचे मुद्दे नाहीत. देशाच्या कानाकोपऱ्यात पुन्हा एकदा मोदी सरकार हाच आवाज येत असल्याचे सांगत मोदींनी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला
नवरात्रीत मासांहार करुन सर्वसामान्यांच्या भावना दुखविल्या
गेल्या वर्षी पवित्र श्रावण महिन्यात मटण खाल्ल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि लालू यादव यांच्यावर टीका केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, या नेत्यांना देशातील बहुसंख्य जनतेच्या भावनांची पर्वा नाही. जम्मू-काश्मीरच्या उधमपूर येथील निवडणूक रॅलीत बोलताना पंतप्रधानांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात व्हायरल झालेल्या एका व्हिडिओचा उल्लेख केला. त्या व्हिडिओत आरजेडी नेते लालू यादव आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी एकत्रित मटण खाताना दिसत आहेत. या दोन्ही नेत्यांचे नाव न घेता पंतप्रधान मोदींनी त्यांची तुलना थेट मुघलांशी केली.
मोदी म्हणाले की, नवरात्रीत मांसाहार करणे दर्शविते की, त्यांना सामान्य लोकांच्या भावना दुखवायच्या आहेत. हे सर्व करून कोणाला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहात? मुघलांना मंदिरे उद्ध्वस्त केल्याशिवाय समाधान मिळाले नाही. मुघलांप्रमाणे यांनाही देशातील जनतेला चिडवल्यशिवाय समाधान मिळत नाही, अशी टीकाही पंतप्रधान मोदींनी केली.
खुद्द बाबासाहेब आले तरी ते संविधान संपवू शकत नाहीत
जिथंपर्यंत संविधानाचा प्रश्न आहे. मोदींचे शब्द तुम्ही लिहून ठेवा की खुद्द बाबासाहेब आले तरी ते संविधान संपवू शकत नाहीत. सरकारसाठी संविधान हे गीता, रामायण, महाभारत, बायबल आणि कुराण आहे. भारताविरोधात इंडिया आघाडीवाले किती द्वेषानं भरलेले आहेत, ते पाहा, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. राजस्थानातील बारमर इथल्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीवर सडकून टीका केली. तसेच त्यांनी बाबासाहेब आणि संविधानाचा अपमान केला असा आरोपही केला.
मोदी म्हणाले, एससी, एसटी आणि ओबीसींसोबत अनेक दशकांपासून भेदभाव करणारा काँग्रेस पक्ष आज एक जुनी रेकॉर्ड वाजवत आहे. जेव्हा पण निवडणूक येते त्यानंतर संविधानावरुन खोटं बोलणं ही इंडिया आघाडीची फॅशन झाली आहे. असेही मोदींनी यावेळी म्हटले.