Monday, January 13, 2025
Homeताज्या घडामोडीZapatlela 3: ओम फट्ट स्वाहा! तात्या विंचूची दहशत पुन्हा पसरणार

Zapatlela 3: ओम फट्ट स्वाहा! तात्या विंचूची दहशत पुन्हा पसरणार

दिग्दर्शक महेश कोठारेंनी केली ‘झपाटलेला ३’ सिनेमाची घोषणा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांना वेड लावले आहे. त्यातीलच लोकप्रिय चित्रपट म्हणजे झपाटलेला. दिग्दर्शक महेश कोठारे यांनी सादर केलेला तात्या विंचू या बाहुल्याची गोष्ट असलेला हा थरारपट चित्रपटाने ९०च्या दशकात मुलांची झोप उडवली होती. सर्वत्र दहशत पसरवणारा हा तात्या विंचू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनुसार, झपाटलेला व झपाटलेला २ या चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद आणि भरभरुन प्रेम दिले होते. तर आता लवकरच या चित्रपटाचा तिसरा भाग (Zapatlela 3) प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे महेश कोठारे यांनी सांगितले. झपाटलेला २ प्रमाणे याही सिनेमात अभिनेता आदिनाथ कोठारे प्रमुख भूमिकेत असेल पण त्याच्यासोबतच आणखी एक नवीन पात्र या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘झपाटलेला चित्रपटाच्या फ्रँचायझीमधील दोन सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर त्याच ताकदीचा किंबहुना त्याहून अधिक ताकदीचा पुढील चित्रपट देण्यासाठी आम्ही बांधील आहोत’, असे महेश कोठारे यांनी म्हटले.

महेश कोठारे यांनी या सिनेमाची घोषणा करताच अनेकांनी हा सिनेमा बघण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हंटलं. झपाटलेला २ मध्ये आदिनाथसोबत सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, मधू कांबीकर, मकरंद अनासपुरे, दिलीप प्रभावळकर आणि महेश कोठारे यांची मुख्य भूमिका होती. आता झपाटलेला ३ या सिनेमात नेमकं काय कथानक असेल? तात्या विंचू त्याची दहशत पसरवायला परत कसा येणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक झाले आहेत. तसेच झपाटलेला ३ च्या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -