Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीUnseasonal Rain : यवतमाळमध्ये अवकाळी पावसाचा हाहाकार! वादळीवार्‍यामुळे ५८० घरांचे नुकसान

Unseasonal Rain : यवतमाळमध्ये अवकाळी पावसाचा हाहाकार! वादळीवार्‍यामुळे ५८० घरांचे नुकसान

वीज कोसळल्याने महिलेचा मृत्यू, तीन जण जखमी तर बैलजोडी देखील ठार

यवतमाळ : राज्यात सगळीकडे उन्हाच्या झळा बसत असताना विदर्भामध्ये (Vidarbha) मात्र उलट परिस्थिती आहे. या ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळ पासून वादळीवार्‍यासह मुसळधार पाऊस पडत आहे. काल पहाटे व संध्याकाळीही या ठिकाणी जोरदार पाऊस पडला. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले. वीज कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. तर यवतमाळ नजीक शेतात वीज कोसळल्याने बैलजोडी ठार झाली.

यवतमाळच्या अनेक भागात वादळी पाऊस व गारपीटीमुळे दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. आर्णी ते सावळी रोडवर असलेल्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजूर महिलेचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला. सिंधू सुभाष राठोड (४०, रा. अंतरगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेत धम्मपाल विष्णू भगत (४०), कल्पना धम्मपाल भगत (३५) आणि हर्षद धम्मपाल भगत (९) सर्व रा. डोळंबा हे तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींवर यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान यवतमाळ नजीक बरबडा शिवारात वीज कोसळून प्यारेलाल पातालबंसी यांची बैलजोडी ठार झाली.

अवकाळी पावसाने जिल्ह्यातील अडीचशेच्या वर गावांतील दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. केळापूर तालुक्यात सर्वाधिक ७८० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली. आंबा, टरबूज, खरबूज, गहू, तीळ, मका, भुईमूग आदी पिकांसह भाजीपाला व फळबागांचे मोठे नुकसान झाले. बाभूळगाव शहरात वादळी पावसाने अनेक घरांवरील छप्पर उडाले. तर तालुक्यात ५४४ घरांची पडझड झाली. जिल्ह्यात आतपर्यंत ५८० घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडे आली आहे. दोन दिवसांत जिल्ह्यात १५.९ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली.

आज गुरूवारी सकाळपासूनच ढगाळी वातावरण असून सोसाट्याचे वारे वाहत आहेत. त्यामुळे आज संध्याकाळी देखील जिल्ह्यास वादळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -