मनसेच्या भूमिकेने उबाठा सेनेला पोटशूळ

  86

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. तसेच लोकसभा निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा करून मनसैनिकांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आदेश राज यांनी दिले. राज ठाकरे यांच्या मनसेचा महाराष्ट्र विधानसभेत एक आमदार असला तरीही दिल्लीपासून गल्लीपर्यंत राज ठाकरे यांच्या रोखठोक भूमिकेची नेहमीच चर्चा असते. त्यामुळे शिवतीर्थावरील राज ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. गेल्या काही दिवसांत राज ठाकरेंनी भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेट यामुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. त्याचा तपशील राज ठाकरे जाहीर करणार याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता होती. शेवटी त्या भेटीत राज ठाकरे यांनी काय भूमिका निश्चित केली हे अखेर स्पष्ट झाले. राज ठाकरे यांच्या निर्णयावर महाविकास आघाडी आणि महायुतीतून राजकीय प्रतिक्रिया उमटल्या; परंतु ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीकाटिप्पणी करण्यास सुरुवात केली. राज ठाकरे यांची भूमिका महाराष्ट्रातली जनतेला निश्चितपणे पटणारी नाही. नरेंद्र मोदींना मनसेचा पाठिंबा घ्यावा लागतो याचा अर्थ महाविकास आघाडीची ताकद मान्यच करायला हवी.


कोल्ह्याला द्राक्षे आंबट, असे म्हणत ठाकरे गटाच्या एका महिला नेत्याने राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका करण्याची संधी सोडली नाही. 'देशाला आज समक्ष नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे फक्त नरेंद्र मोदी यांच्यासाठी महाराष्ट्रात मनसेने महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे,' असे जाहीरपणे सांगितले. आपल्या भावाची काळजी न घेणाऱ्या मातोश्रीतील ठाकरेंना राज ठाकरे यांनी स्वतंत्रपणे विचार करून जर भूमिका मांडली असेल, तर त्यावर टीका करण्याचे कारण काय?.


२०१४ साली लोकसभा निवडणुकीच्या आधी नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पदाचे लायक उमेदवार आहेत, अशी सर्वप्रथम जाहीर भूमिका राज ठाकरे यांनी मांडली होती. मोदी यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात गुजरातमधील विकासाचे मॉडेल त्यांनी पाहिले. राज ठाकरे यांना गुजरात सरकारने सरकारी पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते. त्यामुळे, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने नरेंद्र मोदी यांना जो पाठिंबा दिला आहे, त्यातही मोदींच्या नेतृत्व गुणांचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. गेल्या दहा वर्षांत मोदींच्या नेतृत्वाखाली गरीब कल्याणाचे स्वप्न साकार करत २५ कोटींपेक्षा अधिक गरिबांना दारिद्र्यरेषेबाहेर काढले आहे. मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया हे केंद्र सरकारचे
धोरण खेड्यातील शेवटच्या व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यात यश आले आहे.


मुंबईसह महाराष्ट्रात अनेक विकासकामांना गती मिळत आहे. येत्या काळात मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आहे, त्याचाही विकास होईल. मेट्रोचे जाळे मुंबई नव्हे तर एमएमआरडीए क्षेत्रात दिसेल. मोदी सरकार आणि महायुती सरकार सर्वसामान्य नागरिकांना केंद्रभूत मानून कार्य करत आहे. त्यामुळे ही निवडणूक सामान्य माणसाच्या विकासाची निवडणूक आहे. देशाची कमान मोदींच्या हाती गेली पाहिजे, असे राज ठाकरे यांना वाटत असेल, तर त्यात वावगे काय? खरं तर ज्या काँग्रेसच्या नादाला लागून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला तिलांजली दिली, त्या काँग्रेसबरोबर जागावाटपाचे घोगंडे अजून भिजत पडले आहे, त्याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवे. सांगलीची जागा ही परंपरागत काँग्रेसची होती, हे मागील लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतल्यानंतर लक्षात येईल; परंतु हिंदकेसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी परस्पर जाहीर करून उबाठासेनेच्या प्रमुखांनी काँग्रेसच्या जखमेंवर मीठ चोळण्याचे काम केले. म्हणे दोन वेळा सांगलीतून काँग्रेस हरली म्हणून तो मतदारसंघ आम्हाला हवा आहे, असे उबाठा सेनेचे म्हणणे आहे.


भाजपासोबत युतीमध्ये असतानाही उद्धव ठाकरे यांनीही युतीचा धर्म पाळला नव्हता. राज्यात आणि देशात नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मिळवायची आणि स्वत:चा टेंभा मिळवायचा ही उद्धव ठाकरे यांची जुनी सवय आहे. 'खिशात नाही दमडी तरीही रुबाब भारी' अशा वृत्तीतून उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघात स्वत:च्या पक्षाची उमेदवारी जाहीर करून सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांचा रोष ओढावून घेतला आहे.


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केलेला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निशाणी उद्धव ठाकरे यांना टिकवता आलेली नाही. आज हातात पक्ष नसताना मित्र पक्षांवर कुरघोडी कशी करायची हे उद्धव ठाकरे यांच्याकडून शिकावे लागेल. त्याच्या उलट, एखाद्या पक्षांना पाठिंबा देताना राजकीय तडजोडी कराव्या लागत असतात. असे असतानाही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देणे हा त्यांचा निर्णय धाडसी म्हणायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १० वर्षांत जे परिवर्तन केले, मजबूत भारत तयार केला, जगभरात भारताचे नाव आज अभिमानाने घेतले जात आहे, त्याचे श्रेय मोदी यांना जाते. त्यामुळे काजव्याच्या प्रकाशात चमकणाऱ्या उबाठासारख्या पक्षांनी नरेंद्र मोदी यांना कोण पाठिंबा देतो याच्या फंद्यात पडू नये.

Comments
Add Comment

भाषेच्या आग्रहापलीकडे...

दक्षिणेतल्या कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांनी आपलं म्हणणं खरं करून दाखवलंच. राज्याच्या शैक्षणिक

अतिरेक नको!

कबुतर हे खरं तर शांततेचे प्रतीक. पण, या शांततेच्या प्रतीकानेच सध्या मुंबईत अशांतता निर्माण झाली आहे. शांतता,

‘बेस्ट’ परवड

मुंबई शहरात ओला, उबेर, रिक्षा-टॅक्सीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत चालली असली तरी, आजही ३४ लाख प्रवासी

‘स्थानिक’ निवडणुकांचे बिगुल

शिमगा गेला अन् उरले कवित्व याच धर्तीवर कोरोना गेला तरी निवडणुका होईना, अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या

हास्याचा पेटारा!

अमेरिकेच्या यापूर्वीच्या कुठल्याच राष्ट्राध्यक्षांची झाली नसेल, एवढी टिंगल आणि निर्भर्त्सना सध्या डोनाल्ड

अपरिपक्व युवराज

'मी राजा नाही, मला देशाची सेवा करायची आहे’, असं दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील एका कार्यक्रमामधील लोकसभेतील विरोधी