४० विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती स्कूलबस
महेंद्रगड : गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताच्या घटनांमध्ये (Accident News) प्रचंड वाढ झाली आहे. हरयाणाच्या (Haryana) महेंद्रगड येथून एक अशीच अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज सकाळच्या सुमारास महेंद्रगडच्या उन्हानी गावात ४० विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली स्कूलबस उलटल्याने भीषण अपघात (School Bus accident) झाला. यामध्ये ६ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १५ विद्यार्थी जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने बसला सरळ केलं. हा अपघात कसा झाला याचा तपास पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, इदची शासकीय सुट्टी असूनही महेंद्रगडची जीएल पब्लिक स्कूल आज सुरु होती. ही मुलं स्कूलबसमधून शाळेत जात होती. ही बस उन्हानी गावात पोहोचताच उलटली. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच विद्यार्थ्यांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता, तर एकाची प्रकृती गंभीर होती. त्याला रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं मात्र काहीच वेळात त्याचाही मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि विद्यार्थ्यांचे पालक घटनास्थळी पोहोचले. सध्या रुग्णालयात जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत. उपचार ही प्राथमिकता असून त्यानंतर या घटनेचा संपूर्ण तपास केला जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.