Tuesday, August 12, 2025

Amit Shah : मोदींनी देशाचा विकास केला - गृहमंत्री अमित शाह

Amit Shah : मोदींनी देशाचा विकास केला - गृहमंत्री अमित शाह

नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडच्या दहा वर्षात जो विकास केला आहे तो देशासाठी अभिमानास्पद आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने तसेच उरल्या सुरल्या शरद पवार यांच्या पक्षाने महाराष्ट्राचा घात केला. या दोन्ही पक्षांनी काँग्रेसला संपविले. आता आपण सर्वांनी मोदींजींना साथ देऊन देशाच्या विकासाला हातभार लावावा, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केले. ते भाजप उमेदवार खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या नरसी येथील सभेत बोलत होते.


नांदेड पासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नरसी येथील विश्रामगृह समोरील मैदानावर भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा पार पडली. यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी देशाच्या विकासासाठी झटणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपला मतदान करावे असे आवाहन केले. कलम ३७०, राम मंदिर, युसीसी, सीएए यासारखी देशाच्या विकासाची कामे भाजपने केलेली आहेत. संपूर्ण जगात आता भारताची एक वेगळी ओळख झालेली आहे. केवळ विकासावर लक्ष केंद्रित करणाऱ्या भाजपने अल्पावधीत देशाचा विकास केला आहे. अनेक वर्षाच्या काळात जे काँग्रेसला जमले नाही ते भाजपने केवळ दहा वर्षात करून दाखविले.‌ अबकी बार ४०० पार हा नारा अमित शाह यांनी आज या ठिकाणी जाहीर सभेत दिला. विकासाच्या मुद्द्यावर भाजप पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्राचा व देशाचा विकास करण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नाही, असे मत यावेळी या मान्यवरांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला पिछाडीवर नेण्याचे काम झाले आता महाराष्ट्र व देश बळकट करण्यासाठी भाजपला मतदान करा असे आवाहन यावेळी उपस्थित नेत्यांच्यावतीने करण्यात आले.


हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या जाहीर सभेत नागरिकांचा प्रचंड उत्साह दिसून आला. भाजपा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा