Saturday, April 19, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीमूठभर पोह्यासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी

मूठभर पोह्यासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी

गजानन महाराज – प्रवीण पांडे, अकोला

भक्ताच्या रक्षणार्थ महाराज धावून येतात. माझ्या लहान बंधूंच्या सासूबाई पंचभाई या हृदयविकाराने त्रस्त झाल्या होत्या. त्यांना नागपूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. रीतसर सर्व तपासण्या करण्यात आल्या. त्यांच्या हृदयात जास्त प्रमाणात अडथळे असल्याचे निदान नक्की करून लगेच शल्यक्रिया (बायपास) करण्याचे ठरवले. ऑपरेशन मेजर स्वरूपाचे आहे आणि तीन ते चार तासही लागतील असे डॉक्टरांनी सांगितले होते. ही सर्व पंचभाई मंडळी श्री गजानन महाराजांवर अत्यंत भक्ती, श्रद्धा आणि निष्ठा असणारी आहेत. त्यांचे पती लक्ष्मीकांत पंचभाई ज्यांना आम्ही सर्वजण काका म्हणतो, हे ऑपरेशनच्या दिवशी सकाळीच सुचिर्भूत होऊन त्यांनी श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण घरी सुरु केले. मेजर ऑपरेशन म्हटल्यावर सर्वच स्नेही जन चिंताग्रस्त झालेले होते. जो तो आपल्या परीने जे सुचेल ते करीत होता. ऑपरेशन लगेच होणार असल्यामुळे माझे लहान बंधू सहपरिवार नागपूर येथे आदल्या दिवशीच पोहोचले.

माझी आई सायटीकाच्या आजाराने ग्रस्त असल्यामुळे तिचे चालणे, फिरणे अगदीच बंद झाले होते. ती एका आराम खुर्चीत हॉलमध्ये जप करीत बसली होती. ऑपरेशनची वेळ जस जशी जवळ येऊ लागली होती तसतशी माझ्या आईची तगमग वाढत होती. ती दर पंधरा-वीस मिनिटांनी भावाला फोन करून विचारपूस करत होती. शेवटी मी तिला सांगितले की, “वारंवार फोन करू नकोस. ती मंडळी दवाखान्यात आहेत. त्यांची धावपळ सुरू असेल.” पण कितीही झाले तरी आपल्या माणसाची काळजी ही वाटतेच. आईची तगमग कमी व्हावी म्हणून मी देखील हॉलमधील पलंगावर येऊन आईजवळ बसलो आणि तिला धीर देऊ लागलो. काही क्षणांत मला थोडी डुलकी लागली आणि मला अचानक दवाखान्यातील ऑपरेशन थिएटरच्या आतील भाग दिसला. पंचभाई या ऑपरेशन टेबलवर निजलेल्या असून त्यांच्याजवळच श्री सद्गुरू गजानन महाराज उभे असलेले मला दिसले.

त्यांच्या हातात एखाद्या विणकामाच्या मोठ्या सुईसारखे काहीतरी होते (ज्याला आधुनिक भाषेत प्रोब म्हणता येईल) श्री महाराजांनी ती वस्तू पंचभाई यांच्या हृदयाजवळ गोलाकार फिरविली आणि दोन्ही हात वर करून सर्व ठीक आहे अशी खूण करून मला आशीर्वाद दिले. त्या तीन-चार मिनिटांत घडलेला हा प्रसंग आहे. लगेच मी तंद्रिमधून भानावर आलो. हे सर्व मी माझ्या आईला सांगितले व आईला म्हणालो की सर्व सुरळीत झाले आहे. श्री महाराज स्वतः दवाखान्यात आहेत. त्यांनी सर्व सुरळीत केले आहे. त्यावर आई मला म्हणाली की “सदैव तेच विचार सुरू असल्यामुळे तुला असे भास झाले असावे” आणि काय आश्चर्य, मी हे सर्व आईला सांगून झाल्याबरोबर लगेच काही मिनिटांनी माझ्या लहान बंधू प्रशांतचा फोन आला. त्याने सांगितले की “ऑपरेशन सुरळीत पार पडले आहे. तब्येत ठीक आहे. मात्र रुग्ण शुद्धीवर येण्यास अवकाश लागेल. तरी काळजी नसावी.”

श्री महाराजांच्या भक्तवत्सलतेची खरी प्रचिती तर अजून सांगावयाची आहे. आमच्या शेजारी देशपांडे हे सद्गृहस्थ राहतात. त्याच दिवशी त्यांच्या दोन्ही मुली पहाटे शेगाव येथे दर्शनाला जाऊन नुकत्याच घरी आल्या होत्या. त्या दोघीही भगिनी आमच्या घरी आल्यावर शेगाव येथील पोळी-भाजीचा श्री महाराजांचा प्रसाद माझ्या हातावर ठेवला. हे सर्व वर्तमान अवघ्या वीस-पंचवीस मिनिटांत घडले. त्यावेळी माझी आई सद्गदित झाली होती आणि तिचे देखील डोळे श्री महाराजांच्या या प्रचितीने व कृपा प्रसादाने भरून आले होते. हा प्रसंग ज्यांच्या बाबतीत घडला, त्यांची शस्त्रक्रिया चांगली झाली, तब्येत देखील चांगली आहे. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेली खरी भक्ती परमेश्वराला निश्चितच पावते.

भगवान श्रीकृष्णाचे परम मित्र सुदामा यांनी श्रीकृष्ण राजा झाल्यावर देखील त्यांच्या भेटीला जाताना मित्राकरिता भेट म्हणून मूठभर पोह्यांची शिदोरी नेली होती. मित्र सुदामा भेटीला आल्याचे कळताच या आपल्या गरीब मित्राला भेटण्याकरिता श्रीकृष्ण राज महालातून धावत बाहेर आले. भेट होताच त्यांनी सुदामाला विचारलं “सुदामा, माझ्यासाठी काय आणलंस?” असं विचारताच सुदाम्याने दिलेली ती कोरड्या पोह्यांची शिदोरी उघडून महाराज श्रीकृष्णांनी ते पोहे मोठ्या आनंदाने ग्रहण केले. ही कथा सर्वांना माहीत आहे. कारण सुदामा यांनी ते पोहे अत्यंत प्रेमभावाने आणले होते आणि म्हणूनच भगवंताने ते ग्रहण केले. त्यामुळे सुदामा या प्रेमळ मित्राला, भक्ताला सुवर्ण नगरी बांधून दिली.
यावरून एक भजन आहे.

जगावेगळा याचक आणिक जगावेगळा धनी l
मूठभर पोह्यासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी ll

असेच संतांचे देखील असते. भक्ता जवळ काही नसले, तरी दोन हस्तक आणि एक मस्तक तसेच श्रद्धायुक्त अंतःकरण आणि भक्तिभाव एवढेच पुरे. खरंच महाराज भक्त वत्सल आहेत हे त्रिवार सत्य आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -