हिंदू राष्ट्राच्या मागणीलाही जोर; शेकडो आंदोलक रस्त्यावर
काठमांडू : आम्हाला आमचा देश आणि राजा आमच्या जीवापेक्षा जास्त प्रिय आहे. प्रजासत्ताक रद्द करून देशात राजेशाही परत आली पाहिजे, अशा घोषणा देत नेपाळची राजधानी काठमांडू येथे नागरिक मोठ्या संख्येने बुधवारी रस्त्यावर आले. ते पंतप्रधान कार्यालय आणि इतर सरकारी कार्यालयांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. यासोबतच नेपाळमध्ये हिंदू राष्ट्राची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
या आंदोलनावेळी नागरिकांची पोलिसांशी झटापटही झाली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बांबूच्या लाठीचार्ज, अश्रुधुराचा आणि पाण्याच्या तोफांचा वापर केला. नेपाळच्या राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने होत होती. यावेळी लोकांनी राजेशाही परत आणण्याच्या घोषणा दिल्या.
नेपाळ २००७ साली हिंदू धर्मनिरपेक्ष देश बनला आणि २००८ साली २४० वर्षांपासून सुरू असलेली राजेशाही अधिकृतपणे संपुष्टात आली आणि निवडणुका झाल्या. तेव्हापासून नेपाळमध्ये १३ सरकारे झाली आहेत. नेपाळ गेल्या काही काळापासून राजकीयदृष्ट्या अस्थिर आहे.
यापूर्वी प्रजातंत्र पक्षाने फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान कार्यालयाला ४० कलमी निवेदनही पाठवले होते. यामध्ये भ्रष्टाचाराला आळा घालण्याची मागणी करण्यात आली. खरे तर नेपाळमध्ये २००६ मध्ये राजेशाहीविरुद्धचे बंड अधिक तीव्र झाले. अनेक आठवड्यांच्या निदर्शनांनंतर तत्कालीन राजा ज्ञानेंद्र यांना त्याग करून सर्व सत्ता संसदेकडे सोपवावी लागली. या सगळ्यात राजेशाहीशी संबंधित अनेक गट देशातील प्रमुख पक्षांवर भ्रष्टाचार आणि वाईट कारभाराचे आरोप करत आहेत. देशातील जनता आता भ्रष्टाचारी राजकारण्यांना कंटाळली आहे, असा त्यांचा दावा आहे. अलीकडेच नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी नेपाळी काँग्रेस पक्षासोबतची युती तोडली. त्यांनी केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (यूएमएल) सोबत नवीन सरकार स्थापन केले, ज्यांची चीन समर्थक भूमिका असल्याचे म्हटले जाते. अशा सर्व कारणांनी त्रस्त असलेली नेपाळी जनता अखेर रस्त्यावर उतरून पुन्हा राजेशाहीची मागणी करीत आहे.