Friday, December 13, 2024
Homeताज्या घडामोडीArvind Kejriwal : केजरीवालांच्या अटकेविरोधातील निदर्शनांमध्ये आपचे १० पैकी ७ खासदार अनुपस्थित!

Arvind Kejriwal : केजरीवालांच्या अटकेविरोधातील निदर्शनांमध्ये आपचे १० पैकी ७ खासदार अनुपस्थित!

केजरीवालांच्या अटकेचा ‘आप’ला धक्का

नवी दिल्ली : दिल्लीतल्या मद्य धोरण घोटाळ्यात (Liquor policy scam) आरोप असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अडचणी संपत नसल्याचे चित्र आहे. ईडीने (ED) मनी लॉन्ड्रिंगच्या (Money Laundering) आरोपाखाली २१ मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना अटक केली. त्यानंतर त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. याविरोधात दिल्ली व देशाच्या इतर भागांमध्ये ‘आप’च्या (Aam Aadmi Party) नेत्यांनी अनेक निदर्शने केली. पक्षासह इंडिया आघाडीतील (INDIA Alliance) मित्र पक्षांनीदेखील या निदर्शनांमध्ये आपला सहभाग दर्शवला. परंतु, आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील १० पैकी सात खासदार या निदर्शनांमध्ये अनुपस्थित राहिले.

संजय सिंह, संदीप पाठक आणि एन. डी. गुप्ता या तिघांना वगळता केजरीवाल यांच्या अटकेनंतर इतर सात खासदारांनी स्वतःला दूर ठेवले आहे. आपचे लोकसभेतील एकमेव खासदार सुशील कुमार रिंकू यांनीही नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला. संजय सिंह यांना आपच्या राज्यसभा खासदारांविषयी विचारले असता, “पक्ष यावर चर्चा करेल”, असे त्यांनी सांगितले.

संजय सिंह सध्या जामिनावर बाहेर आहेत. अरविंद केजरीवाल आणि संजय सिंह यांना एकाच प्रकरणात अटक करण्यात आली होती. संजय सिंह केजरीवाल यांच्या अटकेचा जोरदार निषेध करताना दिसत आहेत. आपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) संदीप पाठक आणि पक्षाचे सर्वात ज्येष्ठ खासदार आणि कोषाध्यक्ष एन. डी. गुप्तादेखील केजरीवाल यांच्या अटकेविरोधात परखड भूमिका घेताना दिसत आहेत. गुप्ता सोशल माध्यमांवर सक्रिय नाहीत, मात्र ते पक्षाच्या कामकाजात सक्रियपणे सहभागी होताना दिसतात. मात्र, बाकीचे ७ खासदार नेमके गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘ते’ सात खासदार आहेत कुठे?

१. राघव चढ्ढा : गेल्या महिन्यात राघव चढ्ढा डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी लंडनला रवाना झाले. मुळात मार्चच्या अखेरीस ते भारतात परतणार होते, परंतु त्यांना परतण्यास उशीर होत आहे. कारण- रेटिनल डिटेचमेंट शस्त्रक्रियेनंतर त्यांना डॉक्टरांनी उन्हात बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे सध्या ते पक्षांच्या कामांमध्ये दिसत नाहीत.

२. स्वाती मालीवाल : स्वाती मालीवाल यांची बहीण आजारी असल्याने त्या तिच्या जवळ सध्या अमेरिकेत आहेत.

३. हरभजन सिंग : भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग खासदार झाल्यापासून फार क्वचितच पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये दिसले. केजरीवाल यांच्या अटकेवर त्यांनी अद्यापही मौन बाळगले आहे. त्यांच्या सोशल माध्यमांवरील बहुतेक पोस्ट सध्या सुरू असलेल्या आयपीएलवर आधारित आहेत. २४ मार्चला त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री आणि आप नेते भगवंत मान यांचे त्यांच्या मुलीच्या जन्माबद्दल अभिनंदन केले होते. आपच्या निदर्शनांमध्ये सहभागी होणार का, असा प्रश्न केला असता, ते केवळ नाही म्हणाले. या विषयावर ते फार काही बोलले नाहीत.

४. अशोक कुमार मित्तल : खासदार मित्तल हे देखील पक्षाच्या कार्यक्रमांमधून गायब होते. त्यांनी सांगितले, “मला पक्षाच्या आंदोलनाबाबत बोलण्याचा अधिकार नाही. काय करायचे ते पक्षातील मुख्य नेते सांगतील.” मित्तल यांनी असा दावा केला की, पक्षाने नुकत्याच आयोजित केलेल्या आंदोलन कार्यक्रमाचे त्यांना निमंत्रण दिले नाही.

५. संजीव अरोरा : खासदार अरोरा म्हणाले की, केजरीवाल यांच्या अटकेनंतर त्यांनी २४ मार्चला सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली होती. रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या महासभेत सहभागी न झाल्याचेही त्यांनी मान्य केले. अरोरा म्हणाले की, ते लुधियानामध्ये पक्षकार्यात व्यग्र असल्याने उपस्थित राहू शकले नाही.

६. बलबीर सिंह सीचेवाल : खासदार सीचेवालदेखील पक्षाने केलेल्या आंदोलनांमध्ये दिसले नाही. त्यांच्या अनुपस्थितीबद्दल विचारले असता ते म्हणाले, “मी धर्माचा माणूस आहे आणि माझे मी कर्तव्य पार पाडत आहे. जर काही योजना असतील तर आम्ही नक्की कळवू.”

७. विक्रमजित सिंह साहनी : गेल्या काही दिवसांपासून साहनी हे आपच्या कार्यक्रमांमध्ये अनुपस्थित होते. त्यांनी केजरीवाल यांच्या अटकेबद्दल अद्यापही मौन बाळगले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -